टाइम बॅंक! (कथा भाग - 5)

टाइम बँक! (कथा भाग - 5)
मीराला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, किमान आठ-दहा दिवस पूर्ण विश्रांती.
“तू एकटी घरी जाणार नाहीस,” कात्यायनी ठामपणे म्हणाल्या. “तुझे आई-बाबा येईपर्यंत तू आमच्याकडेच राहणार.”
मीराने नकार द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आवाजात इतकी माया होती की ती फक्त हसून मानडोलावू शकली.
पहिले दोन दिवस विक्रांत नेहमीप्रमाणेच अलिप्त राहिला.
सकाळी व्यायाम, वर्तमानपत्र, फोन कॉल्स, काही अधिकृत मेल्स… आणि मीराशी फक्त औपचारिक बोलणं. तिनी कधी काही जास्त बोलायचा प्रयत्न केलाच तर फक्त ‘हो’ ‘नाही’ मधे उत्तरं…
मीराला हसू यायचं. हा माणूस खरंच कमांडर आहे ? टीमशी काही बोलतो की नाही?

पण तिसऱ्या दिवशी सगळं बदललं.
रात्री जोरदार पाऊस सुरू होता.
मीराला ताप चढला. कात्यायनी औषध आणायला खाली गेल्या होत्या. अचानक मीराचा तोल गेला आणि ती जवळजवळ पडलीच असती…
क्षणात कोणीतरी तिला धरलं.
विक्रांत!
त्याने तिला सावधपणे खुर्चीवर बसवलं.
“काय करतेयस? एकटी का उठलीस?”
पहिल्यांदाच त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती.
“पाणी घ्यायला…”
तो काही बोलला नाही. स्वयंपाकघरातून गरम पाणी आणलं, तापमान तपासलं, औषध दिलं आणि तिच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली.
मीरा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली.
“इतकं आश्चर्य वाटतंय?”
" हो… कारण तुम्ही दिवसभर ‘हो’, ‘नाही’, ‘ठीक’ एवढंच बोलता. मला तुमची भितीच वाटायची"
पहिल्यांदाच विक्रांत मोठ्याने हसला.
“सैनिक असलो तरी मन असतं आम्हालाही.”
“त्या मनात माझ्या साठी इतकी काळजी असेल वाटलं नव्हतं”
दोघांची नजरानजर झाली. क्षणभर दोघेही काहीच बोलले नाही.
त्या रात्रीनंतर विक्रांत मीराशी थोडा मोकळेपणाने बोलू लागला.
एका संध्याकाळी मीरा व्हरांड्यात बसून स्केच
काढत होती.
“काय काढतेयस?”
“तुमचं स्केच.”
“मला आधी विचारायला हवं होतं.”
“उशीर झाला.”
त्याने स्केच पाहिलं. स्वतःकडे इतक्या वेगळ्या नजरेने पाहिलं जाण्याची त्याला सवय नव्हती.
“मी इतका गंभीर दिसतो?”
“नाही… फक्त खूप काही मनात ठेवता.”
त्या वाक्याने तो थबकला. हिला माझं मन कसं कळलं?
विक्रांतमधे घडणारा बदल कात्यायनी च्या नजरेतून सुटला नव्हता.त्या रात्री कात्यायनींना झोप लागली नाही.
त्यांनी जुन्या कपाटातून एक फोटो काढला… नेव्ही युनिफॉर्ममधले त्यांचे दिवंगत पती आणि लहानसा विक्रांत.
“आज तुझ्या मुलाच्या डोळ्यांत पुन्हा आशे ची किरण दिसली,” त्या फोटोशीच पुटपुटल्या.
दुसऱ्या दिवशी मीराचे आई-वडील परदेशातून आले.
त्यांनी कात्यायनींचे मनापासून आभार मानले.
चहाच्या गप्पांमध्ये कात्यायनी म्हणाल्या,
“एक गोष्ट विचारू का?”
“नक्की.”
“तुमची हरकत नसेल… तर मला मीरा माझी सून म्हणून हवी आहे.”
क्षणभर शांतता.
मीराच्या हातातील कप थरथरला.
तिचे वडील हसले.
“आम्हीही तोच विचार करत होतो.”
मीराने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.
“बाबा!”
“अगं, तुझ्या डोळ्यांतलं आम्हाला दिसत नाही असं वाटतं का?” आई तिला हस्त विचारलं.

संध्याकाळी कात्यायनींनी विक्रांतला बागेत पाठवलं.
" जा मीरा तिथे तुझी वाट आहे."
पावसानंतरची ओली माती, रातराणीचा मंद सुगंध आणि संध्याकाळचे सोनेरी किरण…
मीरा झुल्यावर बसली होती.
विक्रांत तिच्यासमोर येऊन थांबला. ती उठली…
“आईने… सगळं सांगितलं.”
“माहितीय.”
तो काही क्षण शांत राहिला.
“मीरा, माझ्यापेक्षा तू दहा वर्षांनी लहान आहेस.”
“माहितीय.”
“माझं आयुष्य समुद्रावर जातं. सहा-सहा महिने मी घरी नसतो.”
“तेही माहितीय.”
“आणि… मी पुन्हा कधी कोणावर प्रेम करणार नाही, असं ठरवलं होतं.”
मीराने त्याच्या नजरेत नजर घालत हळूच विचारलं,
“मग आता?”
विक्रांतने खिशातून एक छोटासा डबा काढला.
त्यात एक लहानसं चांदीचं अँकर-आकाराचं पेंडंट.
“नेव्हीत अँकर म्हणजे स्थिरता. समुद्र कितीही अस्थिर असला तरी जहाजाला आधार देणारं… एकाठिकाणी बांधून ठेवणारं! "
तो तिच्या अगदी जवळ आला.
“मी आयुष्यभर समुद्रावर फिरलो… पण पहिल्यांदा कोणाच्या जवळ आल्यावर मला ‘घरी’ आल्यासारखं वाटलं.”
मीराच्या डोळ्यांत पाणी आलं.
विक्रांतने अलगद तिचा हात हातात घेतला.
मीरा… माझ्याशी लग्न करशील?”
ती डोळ्यातले अश्रू पुसत हसली.
“हो… पण एक अट आहे.”
“काय?”
"सहा महिने समुद्रावर असलात तरी रोज व्हिडिओ कॉल… "
तो हसला.
“ऑर्डर स्वीकारली, मॅम.”
त्याने तिच्या गळ्यात अँकर पेंडंट घातलं.
त्याच क्षणी हलक्या सरी पुन्हा सुरू झाल्या.
मीराने हसत विचारलं,
“पावसात भिजायला आवडतं?”
विक्रांतने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं.
“जर सोबत तू असशील… तर समुद्र, पाऊस, वादळ काहीच कठीण नाही.”
व्हरांड्यात उभ्या कात्यायनींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते.
त्यांना जाणवलं मीराने टाइम बँकेत काही तास दिले होते… पण नियतीने त्या बदल्यात तिला आयुष्यभरासाठी प्रेम, कुटुंब आणि तिच्यावर जग ओवाळून टाकणारं हृदय दिलं होतं!

सई देशपांडे
17.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026