मूळ प्रकाशन: मानवी वर्तणुकीचा भविष्यवेध - सुरपाखरू साहित्य
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, वायूच्या रेणूंची हालचाल इतकी अनियंत्रित (random) मानली जात असे की तिचे गणिती सूत्रांत रूपांतर करणे अशक्य वाटायचे.
परंतु व्हॅन'ट हॉफ (van't Hoff), अरहेनियस (Arrhenius), व्हॅन डर वाल्स (van der Waals), बोल्ट्झमन (Boltzmann) आणि अर्थातच सर्वव्यापी आइन्स्टाइन (Einstein) यांसारख्या प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या कार्यामुळे वायूविषयक नियम मांडणे शक्य झाले.
इथे गंमत अशी की हे नियम एखाद्या विशिष्ट क्षणी एखादा विशिष्ट रेणू नक्की काय करेल, हे सांगू शकत नाहीत पण ते वायूसमूहाच्या सरासरी वर्तणुकीबद्दल बऱ्यापैकी बिनचूक अंदाज वर्तवू शकतात.
हे झाले नमनाला घडाभर तेल… आता प्रतिपाद्य विषयाकडे वळूयात !
एखादी विशिष्ट व्यक्ती केव्हा काय करेल ते आपण सांगू शकत नाही … पण ठराविक लोकसंख्येचा एखादा मानवसमूह कसा वागेल, याचे आपण आता बऱ्यापैकी आराखडे मांडू शकतोय. पोलीस, शासन, अर्थतज्ञ, मिलिटरी यासारख्या संस्था असे अंदाज वर्तवणारे सॉफ्टवेअर सर्रास वापरत असतात.
तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की गणिती समीकरणे ही केवळ रेणूंसारख्या निर्जीव घटकांसाठीच असू शकतात, मानवांसाठी नाही; कारण मानवांना स्वतःचे मन असते. पण थोड्या निरीक्षणाअंती तुमच्या लक्षात येईल की, ज्या कृती किंवा विचार केवळ आपणच करू शकतो असे आपल्याला वाटत असते त्या बऱ्याच अंशी इतरांसारख्याच असतात. एखाद्या विशिष्ट परिस्थितीतील आपल्या प्रतिक्रियांचा अंदाजही चांगल्याप्रकारे बांधता येतो.
या संपूर्ण विषयाला 'गेम थिअरी' (Game Theory) असे म्हणतात. याची सुरुवात जॉन फॉन न्यूमन (John von Neumann) यांनी केली आणि जॉन फोर्ब्स नॅश (John Forbes Nash) यांनी त्यात मोलाची भर घातली (तुम्ही यांच्या जीवनावर आधारीत A Beautiful Mind हा चित्रपट पाहिलाय का?)
मानवी टोळ्या, मोठे समूह… यापुढे एक पाऊल पुढे जाऊन संपूर्ण मानवजात, मानवी विचार आणि कृतींचे वर्णन करणारा गणिती सिद्धांत एक न एक दिवस नक्कीच अस्तित्वात येईल. तुम्ही आयझॅक ऍसिमोव्हची Foundation ही विज्ञान-कादंबरी मालिका वाचली असेल तर त्यात हॅरी सेल्डन आणि त्याची Psychohistory ही याच संकल्पनेवर आधारीत आहे.
या एकूणच प्रकाराबद्दल मला फार औत्सुक्य असल्याने या विषयावरील प्राथमिक पुस्तकें, लेख अधूनमधून चाळत असतो.
मानवी वर्तनाचा संपूर्ण सिद्धांत मांडला जाण्यासाठी कदाचित एक दशक लागेल किंवा एखादे शतकही लागेल, पण तो नक्कीच येईल याची मला खात्री आहे.
माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, हे काम एखाद्या भारतीयाच्या हातून घडावे.








































