वैदिक कालगणना
मनु! वैवस्वत मनु!
सध्या वैवस्वत मनु सुरू आहे. म्हणजे काय? आपल्या ऋषीमुनींनी (जे माझ्या मते वैदिक, पौराणिक काळातील संशोधक/वैज्ञानिक होते) केलेल्या कालगणनेतली एक युनिट/एकक म्हणजे मनु.
असे एकुण चौदा मनु असतात -1) स्वायंभू, 2)स्वारोचिष 3)उत्तम, 4)तामस, 5)रैवत, 6)चाक्षुष, 7)वैवस्वत, 8)सावर्णी, 9)दक्षसावर्णी,10)ब्रम्हसावर्णी,11)धर्मसावर्णी, 12) रुद्रसावर्णी, 13)देवसावर्णी, 14) इंद्रसावर्णी.
ह्यातले सहा मनु होऊन गेले आहेत सातवा सुरू आहे. हा संपल्यावर अजून सात होतील आणि मग सगळे चौदा मनु संपले की त्याला एक कल्प झाला असे म्हणतात. हा एक कल्प म्हणजे ब्रम्ह देवाचा एक दिवस. इतकीच मोठी ब्रम्ह देवाची कल्प रात्र होईल तेव्हां सगळी सृष्टी विनाश पावेल. असे 360 कल्प दिवस आणि 360 कल्प रात्र झाले की ब्रम्ह देवाचं एक वर्ष होतं.त्याच्या एका वर्षात ब्रम्ह देव 360 वेळा सृष्टी घडवतो आणि 360 वेळा नाश करतो. ब्रम्ह देवाचं आयुष्य 100 वर्षे आहे. त्यातलं 51 वं वर्षं सुरू आहे. ब्रम्ह देवाच्या ह्या 51व्या वर्षातला श्वेतवराह नावाचा दिवस/कल्प सुरू आहे. ह्या 14 मनु असलेल्या दिवसातला सातवा, वैवस्वत मनु सुरू आहे.
आता मनु किती मोठा असतो बघू…
एक मनु हा 71 महायुगांचा असतो. एक महायुग 4 युगांचा असतो. हे चार युग क्रमशः 1- कृतयुग (4,32,000 ×4 वर्षे), 2- त्रेता युग (4,32,000 × 3 वर्षे ), द्वापार युग (4, 32,000 ×2 वर्षे ), कली युग ( 4,32,000 वर्षे) असतात. चारी युगांचा एकुण काळ 43,20,000 वर्षे इतका होतो म्हणजे एका महायुगात इतकी वर्षे असतात. अशी 71 महायुगं म्हणजे 43,20,000 ×71 वर्षे झाली की एक मनु संपतो. सध्या वैवस्वत मनु च्या 71 महायुगांपैकी 28 वं महायुग सुरू आहे आणि ह्या महायुगातलं शेवटचं युग म्हणजे कलियुग सुरू आहे ज्यातल्या 4,32,000 वर्षांपैकी 5125 वर्षं संपली आहेत. हे कलीयुग संपलं की हे 28वं महायुग संपेल, असे अजून 43 महायुगं झाले की वैवस्वत मनु संपेल, नंतर पुढचे सात मनु संपले की हा कल्प/ब्र.दिवस - श्वेतवराह संपेल. मग इतकाच काळ( 14 मनुंचा) सृष्टीचा विनाश होईल.
तर अशी ही कालगणना करून ठेवणारे आपले वैदिकाळातले ऋषी मुनी जसे ह्या विषयात तज्ञ होते तसेच मानव जीवनोपयोगी सगळ्याच विषयांवर त्यांचा प्रगाढ अभ्यास, संशोधन होतं. जे आपल्या वेद आणि पुराणांमधे, पौराणिक ग्रंथांमधे संग्रहित आहे. माझी खगोल शास्त्रात आवड आणि थोडा अभ्यास असल्याने जेव्हां आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं वाचते तेव्हां थक्क होते.खूप अभिमान वाटावा अशी आपली ज्ञान संपदा आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर मानव जातीचं कल्याणच होईल. पण इतिहास बघितला तर लक्षात येईल वेळोवेळी आपली ही ज्ञानसंपदा संपवण्याचा प्रयत्न केल्या जातो… अजूनही सुरू आहे. आपण भारतीय जितक्या लवकर हे समजू तितकं आपलं भलं होईल… नाही तर काळ तर जसा पुढे जायचा तसा जाईलच. वैवस्वत मनु नंतर सावर्णी मनु येईलच… असो.
सोबत दिलेला फोटो 14 नोव्हेंबर 2024, कार्तिक शुक्ल त्रयोदशी, गुरुवार ला काढलेला गुरू ग्रहाचा आहे. त्याच्या सोबत त्याचे मुख्य चार चंद्र देखिल दिसताहेत. आपल्या भारतीय कालगणनेनुसार /पंचांगानुसार त्यावेळी गुरू वृषभ राशीत, मृग नक्षत्रात होता,आणि वक्री होता, म्हणजे मृग नक्षत्रा नंतर पुढच्या आर्दा नक्षत्रात जाण्या ऐवजी तो आधीच्या रोहिणी नक्षत्रात जाणार होता. थोडं झूम करून बघितलं तर मृग नक्षत्राचे तारे दिसतील. हा फोटो काढला तेव्हां गुरूची मृग ते रोहिणी अशी वाटचाल सुरू होती.
सई देशपांडे.
12.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
