एका नाटकाची गोष्टं!
“सगळ्या इच्छा, हौस जवळपास पूर्ण झाल्यात आता फक्त अॅक्टिंग करण्याची हौस राहिली आहे” असं सारखं मनात येत होतं…
2018 सालची गोष्टं आहे आमच्या रामनगर महिला समाज नागपूरचा त्या वर्षी हीरक महोत्सव (60 वर्ष पूर्ण) सुरू होता. दर महिन्यात एक कार्यक्रम सुरू होता. एका महिन्यात नाटक करायचं ठरलं.
शारदोत्सवात मुख्य कार्यक्रमात अतिशय तज्ञ आणि नावाजलेल्या कलाकार प्रभा ताई देउस्कर ह्याच नाटक बसवत असतात. पण त्या महिन्यात इतर काही कार्यक्रम नसल्याने नाटक बसवायचं काम माझ्या कडे आलं. झालं! मन में लड्डू फूटा! मनात होतीच अभिनय करायची इच्छा. म्हंटलं आपल्या सारखीच अजूनही बऱ्याच महिलांना इच्छा असेल अभिनयाची. ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना घ्यायचं ठरवलं, आणि मीटिंग मधे जाहिर केलं ‘ज्यांना नाटकात काम करायचं आहे त्यांनी नावं द्या’.
16 नावं आली! मी सतरावी. आता 17 पात्रं असलेलं नाटक शोधायचं कुठे? वेळ कमी. मग काय, नाटक लिहायला घेतलं! विषय असा हवा होता ज्यात वाटेल तितके पात्र वाढवता येतील. मग घेतला बायकांच्या आवडीचा विषय. ‘ती नसते तेव्हां’! म्हणजे नायिका -’ अदिती’ 26/11 च्या आतंकवादी हल्ल्यात घायाळ होऊन हॉस्पिटल मधे अॅडमिट असते, ती घरात नसते तेव्हा घरातल्या माणसांना तर तिची आठवण येतेच पण घरातल्या वस्तूंना, झाडांना देखिल तिची आठवण येते. आणि प्रत्येक वस्तू, झाडं आमच्या नाटकात मुखर झाली. खूप मजा आली. स्क्रिप्ट रायटिंग, डायरेक्शन, अॅक्टिंग, बॅकग्राऊंड संगीत, स्टेज डिझायनिंग, स्टेजला सीन्स प्रमाणे बदलायला जो सीन मधे नसेल त्याने स्टेज बदलणे असं टीम मॅनेजमेंट हे सगळं त्या एका नाटकात मला अनुभवायला मिळालं. आमची टीम पण खूप छान होती. काही सदस्य वयाने मानाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या पण माझं पूर्ण पणे ऐकायच्या. प्रत्येकाला दिलेले रोल्स त्यांनी उत्तम प्रकारे हाताळले. त्यामुळे नाटक खूप छान झालं. प्रॉम्टिंग आणि माइक, संगीत वगैरे हातळणारी असे आम्ही सगळे मिळून 19 महिलांची टीम होती.
लहानपणी नंतर बऱ्याच महिलांनी पहिल्यांदाच नाटकात काम केलं होतं. सगळ्या जाम खुष होत्या.न्यूजपेपर मधे एका सीनचे फोटो आले. त्या सीन मधे ज्या होत्या त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. एकतर नाटकात कधी काम करू हाच त्यांनी विचार केला नव्हता. त्यात पेपर मधे फोटो आल्याने तर आनंदी आनंद होता. अॅक्टिंग च समाधान!
महिलासमाजाकडून आमच्या टीमला जे मानधन मिळालं त्यात आम्ही सगळ्यांनी नागपुरात नवीनच सुरू झालेल्या मेट्रो ची बर्डी ते खापरी आणि परत अशी मस्त गप्पा गोष्टी, भेंड्या खेळत पहिली राइड घेतली. खाण पिणं करून ‘ती नसते तेव्हां’ च्या अद्वितीय आठवणी घेऊन आपापल्या घरी परतलो.
फोटोत नागपूरच्या ‘द हितवाद’ ह्या समाचार पत्रात आलेली ह्या नाटका बद्दलची बातमी.
सई देशपांडे
08.07.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026

