अपराजिता! - ललित लेख

अपराजिता!

किती सुंदर नाव आहे! ही फुलं खूपच सुंदर आकाराची आणि देखण्या रंगाची असतात. माझ्या कडे निळी आणि पांढरी आहेत. ह्याचा वेल पण खूपच लडिवाळ असतो. जे त्याच्या जवळ असेल त्याला प्रेमाने बिलगत त्याला आपलंस करून टाकतो. कधी कधी वाटतं काही अपवाद सोडले तर स्त्रीहृदय नैसर्गिक असंच नसतं का? सगळ्यांना प्रेमाने आपलसं करून टाकणारं. ह्याच्या नावा सारखीच प्रत्येक स्त्री एक अपराजिता असते. तिला निसर्गाने सृजनत्व ओटीत घालूनच जन्माला घातलेलं असतं. त्या सृजनशील स्वभावा मुळे तिच्यात एका आईचं प्रेम जन्मापासूनच असतं. तिथूनच प्रत्येक परिस्थिती वर मात करत आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घेणं त्यांना सुरक्षित ठेवणं ह्याच्या साठी तिची धडपड सुरू होते.

घरच्या इतर सदस्यांच्या आधीच तिचा दिवस सुरू होतो आणि रात्री सारे निवांत झोपल्यावरच तिच्या दिवसाचा शेवट होतो. या दोन क्षणांच्या दरम्यान ती किती भूमिका जगते, किती संघर्ष सहन करते आणि किती स्वप्नांना आधार देते, याचा हिशोब कुणाकडेच नसतो.

निसर्गाने तिच्या ओटीत सृजनाचे अमूल्य वरदान ठेवले आहे. ती जाईल तिथे नाती, संस्कार, विश्वास आणि आशा घडवत असते. तिच्या मनातलं मातृत्व हे आई झाल्यावरच निर्माण होतं असं नाही, ते तिच्या अस्तित्वाचाच अविभाज्य भाग असतं. म्हणूनच ती नवरा आणि मुलां शिवाय लहान भावंडांची काळजी घेते, मैत्रिणीचे अश्रू पुसते, वृद्ध आई-वडिलांचा आधार बनते आणि कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात गुंफून ठेवते.

तिचा प्रवास कधीच सोपा नसतो. समाजाच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या, आर्थिक संघर्ष, स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि अनेकदा न बोलता सहन कराव्या लागणाऱ्या वेदना… या सगळ्यांवर ती रोज मात करत असते. तिचे सामर्थ्य तिच्या शांतपणे पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीत असते.

वादळ कितीही मोठे असले तरी झाडाच्या मुळांसारखी ती आपल्या माणसांना घट्ट धरून ठेवते. स्वतः थकलेली असली तरी इतरांना धीर देते. स्वतःचे अश्रू लपवून दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवते. तिचा त्याग हा तिचा कमकुवतपणा नसून तिच्या सामर्थ्याचा प्रतीक असतो.

आता तर स्त्रिया कुठल्याच बाबतीत अबला राहिल्या नाहीत. स्त्री ही प्रेमाची मूर्ती आहे,आणि प्रसंगी दुर्गाही आहे. ती कोमल आहे, पण तितकीच कणखरही आहे. प्रत्येक संकटावर नव्या उमेदीनं मात करणारी, नवजीवनाला आकार देणारी आणि जगात माणुसकीची धुरा सांभाळणारी प्रत्येक स्त्री म्हणजेच अपराजिता!

सई देशपांडे

04.07.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026