मूळ प्रकाशन: २३ एप्रिल… - सुरपाखरू साहित्य
*२३ एप्रिल…*
(२३ तारखेला पुस्तकं दिन साजरा झाला.. त्या निमित्त हा लेख लिहिला.)
माझी आई ९२ वर्षाची आहे तिला अजूनही वाचण्याची खूप आवड आहे त्यामुळे पुस्तकं बदलण्यासाठी भुसावळ येथे सार्वजनिक वाचनालयात जाण्याचं काम नेहमी सौभाग्यवती करते. काल मात्र मला वाचनालयात जाण्याचा योग आला. तेथील वाचक वर्ग आज फार मोठ्या संख्येने कमी झालेला आहे.आमच्या लहानपणी कधीकाळी वाचकांनी ओसंडून वाहणारे भुसावळचे सार्वजनिक वाचनालय आता उंन्हाळ्यातील कोरड्या नदीप्रमाणे शुष्क झाले आहे.
खरंतर वाचन अजूनही खूप सुरु आहे पण ते मोबाइलवर व्हाट्सअप, ईबुकद्वारे किंवा वेब साईटवर.वाचनालयात पुस्तकावर बसलेली धूळ आणि भितीवर असलेले उधईचे जाळे बघवत नाही.
पुस्तकं बंद कपाटात
बंदिस्त ज्ञान इतिहास
वाचायला ना कुणी हो
एकटा मी वाचनालयात!!
शास्त्राची झाली प्रगती
मोबाईल पुस्तके आजची
नविन पुस्तकाचा गंध
मोबाइलला कसा हो!
कधी वाचकाची गर्दी
सर्व होते ते रसिक दर्दी
भितीवर आज उधई
अनमोल पुस्तकं वाचवा हो!
बदल म्हणजे जीवन
पुस्तकाला तेही लागू
रूप त्याचे आज डिजिटल
वाचून ज्ञान हो मिळवू!!l
आजकाल मोबाईलवर वृत्तपत्रे उपलब्ध आहेत त्यामुळे लहानपणी प्रत्येकाच्या घरी आवर्जून येणारे वृत्तपत्राची संख्या रोडावली आहे.पूर्वी कोपऱ्या कोपऱ्यावर असणारे वृत्तपत्रविक्रेतेही कमी झाले आहेत.
दिवाळीला दिवाळी अंक म्हणजे वाचनाची मेजवानी असायची आता फारच कमी दिवाळी अंक बाजारात येतात.. दिवाळी अंकासाठी खास वर्गणी घेऊन सुरु होणारे वाचनालये आता इथं नाही.
सर्वत्र असे निराशाजनक चित्र दिसत असल तरी परवा भुसावळला शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात एक बॅनर बघितले त्यावर मोठ्या अक्षरांत लिहिले होते *”शांतता राखा.. भुसावळ वाचत आहे!”* आणि तिस पस्तीस अबालवृद्ध मंडळी आपल्या हातात आपापले पुस्तकं घेऊन वडाच्या झाडाच्या सावलीखाली वाचनाचा आस्वाद घेत होती.दर रविवारी बागेत स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे वाचन संस्कृती आणि पुस्तकं जपण्याचा हा वाचन वर्गाचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.
चांगला वाचक झाल्याशिवाय लेखक होऊ शकत नाही.. हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
या शतकात टीव्ही इंटरनेट असे नविन क्रांतिकारी शोध लागले आणि वाचून मिळणारा अनुभूती जर प्रत्यक्ष समोर स्पष्ट दृकश्राव्य माध्यमातून आज सहज उपलब्ध होत असल्याने, ती समजण्यास सोपी वाटत असल्याने नविन पिढी पुस्तकापेक्षा या डिजिटल माध्यमाना प्राधान्य देतात.
पूर्वी जेव्हा प्रिंटींग नव्हती तेव्हा भ्रूजपत्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले.. नंतर पुस्तकं आली.. आताच्या ईबुकच्या जमान्यात ती मागे पडता की काय? ही मनात शंका आहे.
असो.
*आपला इतिहास संस्कृती आणि भाषेचे सौंदर्य जपणारे, आणि सदैव ज्ञान देणारे पुस्तकं नक्की कात टाकतेय, नविन रूप धारण करतय, हे मात्र नक्की.*
*ll झरे संस्कृतीचे ll*
“वाचाल तरच वाचालं”
सांगून अनेक थोर गेले
राहिले फार कमी आता
ज्यांचे वाचनाशी वैर आहे..१
वाचता ती फक्त्त येते
लिहिण्याची कला हो,
लेखक ते निघून गेले
लेखनाने अमर झाले..२
ईश्वर आम्हास देतो
जगण्यास सर्वं काही
वाचण्याची ती भूक
संस्कार देत आहे.. ३
वाचण्या ज्ञान lवर्धक
अनेक सुंदर पुस्तकं ते
त्यासी वाचा नित्य तेथे
शारदेचा निवास आहे..
रिझवता अनेक आले
हे वाचनाचे प्याले..
लेखानाचे जीवन्त झरे
लेखणीस ओपोआप सुरु झाले..
✍️हेमंत नाईक
२७.०४.२६