"विसरणं एक दैवी वरदान!!!"

मूळ प्रकाशन: “विसरणं एक दैवी वरदान!!!” - सुरपाखरू साहित्य

*”विसरणं एक दैवी वरदान!!!”*

✍️हेमंत नाईक 
आज काहीतरी वेगळं, पण सर्वांच्या जीवनाशी निगडित कधी गुण तर कधी दोष वाटणाऱ्या विसरण्याबद्दल लिहितो आहे.
काही मंडळी अगदी व्यवस्थित निटनेटके असतात. कोणतीच गोष्ट ती कधीच विसरत नाहीत. त्या मुळे “मी विसरलो  आय एम सॉरी!!” अशी माझ्यासारखं म्हणायची वेळ यांच्यावर कधीच येत नाही. 
माझे एक डॉक्टर मित्र यांना व्यवस्थितपणाबद्दल मी त्यांना गुरु मानले असले तरी त्यांचा तो गुण अजूनही मला लागला नाही . केव्हाही त्याच्या ओपीडीला गेलो तर नेमक्या नेहमी असणाऱ्या पाच सहा वस्तू शिवाय कोणतीही अन्य वस्तू त्याच्या टेबलावर कधीच दिसली नाही. अगदी वेळेवर ओपिडी सुरु करणार… आणि वेळेवरच संपवणार!!
रोज मोजक्याचं पेशंटला अपॉइंटमेंट देणार. स्वतः साठी आणि कुटुंबासाठी खास वेळ राखीव ठेवून वर्क आणि फॅमिली लाईफ यांचा योग्य समतोल राखत होते. विसरणं हा शब्द त्यांच्या शब्दकोशांत नव्हता.
ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत नाही त्या लक्षात न ठेवण्याची वृत्ती बहुतेक सर्वांमध्ये असली तरी जाणारा काळ हाही विसर पाडण्यासाठी कारणीभूत ठरतो.
शाळेत असताना मित्र माझ्या विसराळूपणा मुळे विसराळू विनू म्हणायचे… पण अभ्यासात बऱ्यापैकी गती असल्याने काहींच्या मते मी मतलबी विसरभोळा असल्याचा दावा होता.माझ्या विसराळूपणाचे खूप किस्से आहेत.त्यावर एक पूर्ण लेखमाला होऊ शकते. मला मेडिकलसाठी एक मार्क कमी पडल्यावर माझा जवळचा मित्र मित्र मला म्हणायचा, “बर झालं,  तू डॉक्टर झाला नाही, नाहीतर कात्र्या पेशंटच्या पोटात विसरला असता! “
असो..
माझ्या या गुणामुळे अजूनही बँकेत लॉकर बंद खरच केल का?  हे बघण्यासाठी मी परत एकदा खाली बेसमेंटला जाऊन खात्री करतो.
खरं तर विसरणं हा दुर्गुण आहे  अभ्यास विसरलो तर परीक्षेत काय लिहिणार? मानवाची हुशारी त्याच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवरं ठरवली जाते. अगदी नव्वदीतील आजोबा त्यांच्यावेळी शिकवलेल्या दीडकी अडीचकी पाढा म्हणून दाखवायचे तेव्हा मला आश्चर्य वाटायचे.असं असतांना विसरणं हे वरदान कस? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल.
आयुष्यात सर्वच चांगलं तुमच्या मनासारखं घडेल असं नाही काही गोष्टी तुमच्या मनावर खोलवर आघात करून जातात आणि त्या आठवल्या की त्या  जखमा पुन्हा रक्तबंबाळ होतात. अशा वेळा मन निरोगी  आनंदी राहण्यासाठी विसरणं हाच एकमात्र मार्ग असतो.
देवाघरी गेलेल्या खाष्ट सासुने मला खूप त्रास दिला, माझे उमेदीचे वर्ष सर्व वाया गेलेत असे पासष्टव्या वर्षी एक गृहिणी तेच तेच आठवून उगीचच दुःखी होते आणि स्वतः बरोबर नवऱ्यालाही कारण नसताना त्रासून सोडत असताना बऱ्याच वेळा बघतो. त्यावेळी  विसरणं हे नक्की वरदान वाटते.
दुर्योधनाचा मय महालात अंधपुत्र म्हणून केलेला अपमान दुर्योधन विसरू शकला नाही… पुढे महाभारत घडलं आणि त्याचा सर्वनाश झाला पण ती झळ सर्वांनाच पोहचली.
याचा अर्थ सर्वच विसरा असे माझे म्हणणे नाही पण ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्या सर्व फक्त्त आणि फक्त्त विसरण्यासाठीच असतात.
हमदोनो या चित्रपटातील चित्रपट गीताच्या या साहिर लुधीयान्वी यानी लिहिलेल्या ओळी मला आठवतात..
” जो मिल गया उसे 
मुकद्दर समझ लिया..
जो खो गया उसे 
भुलाता चला गया “
आनंदी जीवन जगण्याचा मंत्रच या गीतात सांगितलेला आहे. मोहमद रफिंच्या  आवाजात आणि संगीतकार जयदेव यांच्या सुंदर चालीतील हे अजरामर गीत अजूनही ताजे स्फूर्तीदायक वाटते.
विसरण्याबद्दल मी रचलेल्या काही ओळी विसरण्याच्या आत त्या लिहून  थांबतो.
_पाटीला पुसण्याशिवाय_ 
_लिहिता पुन्हा येत नाही._.
_तैसेचि विसरण्याने फक्त्त_ 
_राज्य नव्याने सुरु होई.._
_आठवणी  दुःखी कष्टी_ 
_मना जाळे त्याहो नित्य.._ 
_विसरता त्यांना येते_ 
_नवा भिडू नवं राज्य.._
_संकट येतात अनेक_ 
_नित्य आहे त्यांचा फेरा.._ 
_लढता वा दुर्लक्षता_ 
_सुखाचाच मिळे ठेवा.._
_प्रियजन ते सोडून गेले_ 
_जातील अजून आणखी.._
_त्याचे शिवाय जगणे_ 
_जीवना तुझी कहाणी.._
_विसरतो त्यांनाही आपण,_
_काळ लागे थोडाफार.._
_विसरणं,दुर्गण जरी वाटे_ 
_*देवाने दिलेले ते वरदान..*_
✍️हेमंत नाईक 
सोमवार, ६. ०४. २०२६