नोकरी की नातं? आधुनिक स्त्रीसमोरचा गुप्त संघर्ष

मूळ प्रकाशन: नोकरी की नातं? आधुनिक स्त्रीसमोरचा गुप्त संघर्ष - सुरपाखरू साहित्य

काल व्ही आर मॉल मध्ये एक ओळखीचं जोडपं भेटलं. त्यांना साडे तीन वर्षाचा मुलगा आहे. MCA झालेल्या त्याच्या उच्चशिक्षित आईने त्याच्यासाठी नोकरी सोडली आणि घरी बसून आता घरकाम करते आहे. हे तिच्या तोंडून ऐकलं आणि मलाही माझे दिवस आठवले. माझे नोकरी सोडण्याचे दिवस आणि ही मला भेटलेली नवीन आई या लेखामागची प्रेरणा आहेत.

आजची स्त्री अनेक अर्थांनी स्वतंत्र, सक्षम आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे. शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन…या सगळ्या क्षेत्रांत तिने आपली ओळख निर्माण केली आहे. पण या प्रगतीमागे हलकासा अंधारही आहे , ज्या विषयी फारसं बोललं जात नाही. तो अंधार म्हणजे तिच्या मनात सतत चालणारा गुप्त संघर्ष नोकरी की नातं? हा प्रश्न वरवर पाहता साधा वाटतो, पण प्रत्यक्षात तो अतिशय गुंतागुंतीचा आहे. कारण इथे निवड फक्त दोन गोष्टींची नसते; इथे निवड असते स्वप्न आणि जबाबदाऱ्या, स्वतःचं अस्तित्व आणि नात्यांची अपेक्षा, स्वातंत्र्य आणि समाजमान्य चौकटी यांच्यामध्ये.

पूर्वीच्या काळात स्त्रीची भूमिका ठरलेली होती. घर सांभाळणं, कुटुंबाची काळजी घेणं. त्यामुळे तिच्यासमोर असे द्वंद्व उभे राहत नव्हते. पण आज परिस्थिती बदलली आहे. स्त्री उच्चशिक्षित आहे, करिअर घडवते आहे, स्वतःचे निर्णय घेते आहे. पण त्याच वेळी समाजाच्या अपेक्षा पूर्णपणे बदललेल्या नाहीत. अजूनही तिच्याकडून घर सांभाळण्याची, नात्यांना प्राधान्य देण्याची अपेक्षा तितकीच आहे.

यामुळेच हा संघर्ष निर्माण होतो.
एकीकडे तिची नोकरी ज्यात तिची ओळख आहे, आत्मसन्मान आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे. दुसरीकडे तिची नाती ज्यात प्रेम आहे, आपलेपणा आहे, पण अनेकदा अपेक्षांचं ओझंही आहे.

हा संघर्ष अनेक स्तरांवर दिसतो.

सर्वात पहिलं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन. नोकरी करणारी स्त्री दिवसभर काम करून घरी येते, पण तिचं काम तिथे संपत नाही. घरकाम, मुलांची जबाबदारी, कुटुंबीयांची काळजी…हे सगळं तिच्याकडेच अपेक्षित असतं. त्यामुळे ती सतत धावत असते. स्वतःसाठी वेळ काढणं तिच्यासाठी अवघड होतं. अशा वेळी जर ती थकलेली दिसली, तर अनेकदा तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. इतकं काय काम असतं?

दुसरा स्तर म्हणजे भावनिक संघर्ष.
स्त्रीला अनेकदा असं वाटतं की ती कुठेच पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही. ऑफिसमध्ये असेल, तर घराची काळजी वाटते. घरी असेल, तर कामाचं टेन्शन असतं. या दोन्ही जगांमध्ये संतुलन साधताना ती आतून थकून जाते. पण हा थकवा ती फारसा व्यक्त करू शकत नाही, कारण तिला सगळं सांभाळणारी असं पाहिलं जातं.

तिसरा स्तर म्हणजे समाज आणि कुटुंबाच्या अपेक्षा.
अनेक ठिकाणी अजूनही असा विचार आहे की स्त्रीची नोकरी ही दुसरी गोष्ट आहे, आणि घर ही पहिली जबाबदारी. त्यामुळे करिअरमध्ये मोठं पाऊल उचलताना…जसं की बदली, बढती, जास्त वेळ देणं. तिला नात्यांमध्ये तडजोड करावी लागते. काही वेळा तिला स्वतःचं स्वप्न मागं ठेवावं लागतं, फक्त नातं टिकवण्यासाठी.

विशेषतः विवाहानंतर हा संघर्ष अधिक तीव्र होतो.
घर की करिअर? हा प्रश्न थेट विचारला जात नाही, पण तो अनेक छोट्या छोट्या अपेक्षांमधून पुढे येतो. सासरचं वातावरण, पतीचा दृष्टिकोन, कुटुंबाची मानसिकता या सगळ्यांचा तिच्या निर्णयांवर प्रभाव पडतो. काही स्त्रिया नातं टिकवण्यासाठी नोकरी सोडतात, तर काही जणी करिअर निवडतात आणि त्यासाठी नात्यांमध्ये ताण सहन करतात.

या सगळ्यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिचं स्वतःचं मन.
तिला काय हवं आहे?
ती स्वतःला कसं पाहते?
हे प्रश्न अनेकदा मागे पडतात. कारण ती सतत इतरांच्या अपेक्षांमध्ये गुंतलेली असते.

पण खरं पाहिलं तर नोकरी की नातं? असा प्रश्नच चुकीचा आहे.
कारण दोन्ही एकमेकांच्या विरोधात नसावेत.
नातं हे आधार देणारं असावं, अडथळा नाही. आणि नोकरी ही ओळख देणारी असावी, ताण वाढवणारी नाही.

यासाठी बदलाची गरज आहे. फक्त स्त्रीमध्ये नाही, तर संपूर्ण समाजात.

सर्वप्रथम, घरात जबाबदाऱ्यांचं वाटप होणं आवश्यक आहे. घर हे फक्त स्त्रीचं नसून सगळ्यांचं आहे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. पती, मुलं, कुटुंबीय सगळ्यांनी सहभागी झालं, तर स्त्रीवरचं ओझं कमी होईल.

दुसरं म्हणजे मानसिकतेत बदल.
स्त्रीची नोकरी ही ऐच्छिक नसून महत्त्वाची आहे, हे मान्य करणं गरजेचं आहे. तिच्या करिअरकडे तितक्याच गांभीर्याने पाहिलं पाहिजे, जितकं पुरुषाच्या करिअरकडे पाहिलं जातं.

तिसरं म्हणजे स्त्रीने स्वतःला दोष देणं थांबवणं.
ती सगळं परफेक्ट करू शकत नाही, आणि तसं करणं गरजेचंही नाही. काही गोष्टी अपूर्ण राहतील, काही चुका होतील. पण त्यातच तिचं मानवीपण आहे.

शेवटी, नातं आणि नोकरी यामध्ये निवड करण्यापेक्षा संतुलन साधणं महत्त्वाचं आहे.
आधुनिक स्त्री हा संतुलनाचा प्रवास करत आहे. कधी यशस्वीपणे, कधी अडखळत. पण हा प्रवास तिच्या अस्तित्वाचा एक भाग आहे.

नोकरी की नातं? हा प्रश्न तिच्यासाठी फार बुचकळ्यात टाकणारा आहे. नेमकं काय करावं ? या प्रश्नाला वारंवार अधोरेखित करणारा आहे.
खरं तर या प्रश्नाचं उत्तर दोन्ही गोष्टी हव्या असंच असायला हवं
नातंही हवं, आणि नोकरीही… पण त्यासाठी समजूत, साथ आणि समानतेची गरज आहे.

जेव्हा समाज तिच्या या संघर्षाला समजून घेईल, तेव्हा हा प्रश्न तिचा एकटीचा राहणार नाही. तो घरातील सगळयांमिळून सोडवला जाईल. आणि तेव्हाच स्त्री खर्‍या अर्थाने मुक्त होईल. निवडीच्या ओझ्यातून नव्हे, तर समतोलाच्या सामर्थ्यातून.