मूळ प्रकाशन: एक्स्प्रेस वे की मृत्यूचा सापळा - सुरपाखरू साहित्य
१८ मार्चची सकाळ… साधारण ११:३० वाजता आमच्या भिशीच्या ग्रुपवर एकीने मेसेज केला. 'खोपोलीजवळ झालेल्या अपघातात सविताच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याचे ऐकले. बातमीची शहानिशा करायला हवी.' पायाखालची जमीन सरकली.
१३ तारखेला सविताने ग्रुपवर मोठ्या कौतुकाने व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. त्यात तिचे पती 'वेट्रन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'चे चेअरमन म्हणून बोलत होते. सगळ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
६ दिवसांपूर्वी माझ्याकडे भिशीला सगळ्याजणी आल्या. जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्या मैत्रिणींचा सन्मान करायचे ठरवले होते. प्रत्येकीतला एक गुण हेरून सगळ्या जणींना मानपत्र दिले. त्यात सविताला 'हौशी नृत्यांगना' म्हणून गौरविले. साठीच्या उंबरठ्यावरची अगदी उत्साही चिरतरुण बाला. तिच्यावर हा प्रसंग ओढवला हे स्विकारायला मन तयार होईना.
या संदर्भात टीव्हीवर काही बातमी असेल म्हणून बघितले तर टीव्हीचा पॅक संपलेला. youtube वर 'आजतक' वगैरे चॅनेल सर्च केले परंतु तिथेही काही दिसेना. जास्त माहिती जाणून घेण्यासाठी दोघी-तिघी मैत्रिणींना फोन केले. आमचीच भिशीतली एक मैत्रीण तिच्या जावई व मुलीसोबत मुंबईकडे निघाली होती. तिला रस्त्यात काळी इनोव्हा दिसली. नंबरप्लेटवरून तिने चटकन ओळखली. थांबून शहानिशा केली. गाडीचा चक्काचूर झाला होता. टपाकडून गाडी पूर्ण चेपली गेली होती. त्या गाडीतील तिघेजण जागच्या जागी गतप्राण झाले. मधल्या लेनमधून जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला. बाजूने कंटेनर व पुढे सिमेंट बल्कर यांच्या कचाट्यात गाडी सापडली होती. अपघातग्रस्त गाडी डावीकडच्या लेनमध्ये असल्याचे कळले.
साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की त्यांची गाडी डावीकडच्या लेन मध्ये का होती ?परंतु आपण एक्स्प्रेस वे वरून पुणे मुंबई प्रवास करत असाल तर आपल्या लक्षात येईल की ही जड वाहने डावीकडची लेन सोडून मधल्या व उजव्या रांगेत अतिक्रमण करताना दिसतात. त्यामुळे हलक्या वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी डावीकडच्या लेन मधून ओव्हरटेक करण्याशिवाय पर्याय नसतो. जड वाहनांनी वाहतुकीचे नियम पाळले तर हे अपघात निश्चितच टळतील. बैलगाडी किंवा दुचाकी या गाड्यांना इथे मज्जाव आहे. परंतु मध्यंतरी मुंबईहून पुण्याकडे येताना खंडाळ्याच्या घाटात २-४ मोटारसायकलस्वार बघून मी अवाक् झाले. नियम धाब्यावर बसवून केलेल्या मनमानीने त्यांचाही जीव धोक्यात येतो याची त्यांना जराही समज नसावी? की समज असूनही बेमुरवतखोरपणा म्हणायचा?
आजकाल एक्स्प्रेस वे वरची ट्राफिक कुठल्या ना कुठल्या कारणाने ठप्प झालेली असते. सध्या संस्थांचे, योजनांचे, शहरांचे नाव बदलण्याचा प्रघात आहे. तेव्हा 'Express way' हे नाव बदलून 'Supress way' ठेवावे असे खूप वाटते. एक्स्प्रेस वे म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे.
मध्यंतरी एक्स्प्रेस वे वरच्या रासायनिक द्रव्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या गळतीची आठवण सगळ्यांच्या मनात ताजी आहे. तेव्हा वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना जवळजवळ 36 तास वाट बघावी लागली होती. या काळात त्यांचे खाण्यापिण्याचे, नैसर्गिक विधीसाठीचे किती हाल झाले ह्याची चर्चा वर्तमानपत्रातून आपण वाचत होतोच.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक या अपघातांना जितके जबाबदार आहेत तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई न करणारे प्रशासन जबाबदार आहे असे वाटते.
लांबच्या प्रवासाला निघालेल्या ह्या जड वाहनांची, मालक पूर्वतपासणी करून घेतात की नाही हा संशोधनाचा विषय आहे.
आजच वृत्तपत्रात एक बातमी वाचली. घरासमोर खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीला भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. केवढी ही बेपर्वाई! गावातील मध्यवर्ती भागातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवायला नको का? जिने अजून पुरते जग देखील पाहिले नाही त्या अगोदरच तिची जीवनयात्रा संपवली गेली.
अपघातग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळेल, शासन नुकसानभरपाई देईल हे सगळं ठीक आहे, परंतु त्या कुटुंबाचे काय? ज्या घरातला कर्ता सवरता कुटुंबप्रमुख गेल्यावर त्या कुटुंबाच्या मानसिक अवस्थेचं काय? जाणारा जातो पण त्याच्या मागे राहणारा जोडीदार आतून तुटतो. निवृत्तीनंतर एकमेकांसाठी वेळ देऊ, आयुष्यभर राब राब राबलो आता जरा निवांत होऊ ही उराशी बाळगलेली स्वप्ने जेव्हा विखुरतात तेव्हा खूप धक्का बसतो. त्या धक्क्यातून सावरायला, बाहेर पडायला लागणारा वेळ व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतो. एकुलत्या एक मुलाचे ऐन तिशीत पितृछत्र हरवले. या मुलाने आपल्या वडिलांना वाढदिवसानिमित्त ही इनोव्हा गाडी भेट दिली होती असे कळले. आपण संपूर्ण आयुष्यभर केलेल्या कष्टाला नुकतेच आलेले फळ चाखण्याची उसंतही त्यांना मिळाली नाही, याची खंत नक्कीच तुम्हा-आम्हा सर्वांना राहील.
दरवर्षी मोठ्या उत्साहाने दीपोत्सव साजरा करणाऱ्या सविताने येणाऱ्या नवीन वर्षाचे, गुढीपाडव्याच्या स्वागताचे काही तरी आयोजन केले असणारच ना! आजूबाजूला सर्वजण आनंदाने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात गुंतले होते तेव्हा सविता सहचाऱ्याच्या आठवणींच्या गदारोळात अश्रूंना थांबवू शकत नव्हती.
खरंच माणसाच्या आयुष्याचा काही भरवसा नाही ह्याची प्रचिती येते. माणूस घरातून बाहेर पडल्यावर तो परत घरी सुखरूप येईल याची शाश्वती नाही.
सध्या एक आश्वासक गोष्ट होऊ पाहत आहे. 'मिसिंग लिंक'. खोपोली ते कुसगांव असा आठ पदरी १३.३ कि. मी. लांबीचा रस्ता १ मे २०२६ पासून सुरू होणार आहे. ज्यामुळे ३० मिनिटं वेळेची बचत होणार आहे. शिवाय या रस्त्यावर जड वाहनांना मनाई असल्यामुळे हलकी वाहने जऽऽरा मोकळा श्वास घेतील, वाहतूक सुरळीत चालू होईल, अपघातात घट होईल अशी आशा आहे. खंडाळ्याच्या वळणदार घाटाला बायपास असणारा हा रस्ता तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या जीविताची आबाळ होऊ देणार नाही ही माफक अपेक्षा.