अनिश्चितता सांगणारा कॅसिनो!!

मूळ प्रकाशन: अनिश्चितता सांगणारा कॅसिनो!! - सुरपाखरू साहित्य

*अनिश्चितता सांगणारा कॅसिनो!!*
✍️हेमंत नाईक 
अनिश्चितता म्हणजे काय? हे समजावणाऱ्या येथील स्काय टॉवरच्या स्कायसिटीतील कॅसीनो बद्दल लिहीताना,पसायदानातील, “जो जे वांछील तो ते लाहो” ही विश्वरूप प्रार्थना आठवली.
*”प्रत्येकाच्या सर्वं इच्छा  खरंच पूर्ण होतात का? अपूर्णते कडून पूर्णतेकडचा माहित नसलेला आणि फक्त्त शेवटास संपणारा अनाकलनीय प्रवास म्हणजेच जीवन..”*
हीच अनिश्चितता कॅसिनोमध्ये पुन्हा एकदा कळली.
न्यूझीलंडची आर्थिक राजधानी असलेल्या ऑकलंड शहरांत स्काय टॉवर, कन्व्हेन्शन सेंटर आणि कॅसिनो हे सर्व इथल्या ख्यातनाम फ्लेचर कन्स्ट्रक्शनने बांधले आणि १९९७ पर्यंत पूर्ण केले.
स्कायसिटीचा कॅसिनो हा या देशातील दुसरा कॅसिनो होता. त्याच्या बांधकामाच्या वेळी, तो वादग्रस्त होता . शहराच्या वरती दिसणाऱ्या आयकॉनच्या विपरीत, ऑकलंडचे माजी महापौर डिक हबार्ड सारख्या प्रमुख व्यक्तींनी कॅसिनोची सुरवातीस टीका केली होती. शेवटी त्यातून मिळणारे उत्पन्न व दिला जाणरा रोजगार पाहून त्यांनी हे कबूल केले की हे कॉम्प्लेक्स शहरासाठी सकारात्मक आहे.  
कॅसिनो न्यूझीलंड मध्ये जवळजवळ दोन हजार नोकऱ्या  रोजगार प्रदान करतो आणि पर्यटकांचे आकर्षण ठरते,  हे सकारात्मक चित्र बघून कॅसिनो अजूनही सुरु आहेत.
” बाबा यावेळी तुम्ही इथला झगमगता कॅसिनो नक्की पहा आणि खेळापण  तुमचे नशीब चांगले  आहे. ” असे सौरभ घरून निघताना म्हणाला होता..आणि मला जिज्ञासाही होती,
म्हणून स्काय टॉवर पाहून उतरल्यावर 
मी पाहण्यास नक्की जाईन  गंम्मत म्हणून खेळेलही कदाचित!!
ऑकलंडचे विहंगम दृश्य पाहून स्काय टॉवरहून खाली आलो आणि कियानला त्याच्या आईच्या हवाली केले लहान मुलांना इथे प्रवेश नसल्याने मी स्वाती व सौरभ याचा अनुभव घेण्यास निघालो पहिल्या माळ्यावर भल्या मोठ्या हॉल मध्ये छतावरून येणाऱ्या चमचमत्या प्रकाशात अनेक टेबल्स आणि वेगवेगळे कॅसिनोचे अनेक प्रकारचे मशिन्स होते. मागे मंद म्युझिक  सुरु होते.
एखादा नवखा जसा बावचळतो तशी स्थिती झाली होती.
मी फक्त्त ५० डॉलर्स खिशातून काढले त्याचे टोकन्स घेतले हे संपले की बाहेर पडायचे असं मनाशी पक्के करून आत पाऊल ठेवले.
सिनेमांत दाखवतात तसें नाण्यांचा खणखण आवाज करीत पडणारे डॉलर्स गोळा करणारी खुशीतली मंडळी आणि खुपदा पैसे वाया गेलेली आणि चेहेऱ्यावर निराशा असलेली मंडळी दिसत होती.
COEP त हॉस्टेलला फेमस असलेला तिन पत्ती हा खेळ स्टुडंट लाईफ मध्ये खेळलो नसलो तरी एकदा सीमेंट कंपनीने इंजिनिअर्स ला सापुतारा येथे आयोजिलेल्या कॉन्फेरंसच्या निमित्ताने गेलो असताना सहकारी अभियंताच्या आग्रहास्तव खेळलो होतो. ती रात्र पूर्ण माझीच होती चक्क दोन वेळा तिन एक्क्यांचे डाव माझ्या नशिबात होते..बरीच रक्कम आली पण विशेष आनंद वाटत नव्हता. परत घरी येतांना सर्वं खेळणाऱ्या मित्रांना पार्टी देऊन तिचा विनियोग केला.
जुगारात कुणी हरतो म्हणूनच कुणी जिंकतो.. त्या जिंकण्यास कुणाच्या  तरी दुखाची नकळत सोबत असते. त्यात कष्ट नसतात, मनोरंजन वा लवकर कमाईचे साधन म्हणून बघता बघता आहारी जाउन उध्वस्त झालेले अनेक मंडळी आपण बघतो.
मग तो सट्टा असो, शेअर्स असो वा कमॉडिटी… सर्वं आम्ही अभ्यास करून खेळतो असेच सर्वंच म्हणतात पण लोभात असे अडकतात की घरदार विकण्याची पाळी येते. शेअर्सशी पण फक्त्त इन्व्हेस्टर्स हेच आपले नाते असावे. ट्रेडिंग मध्ये भावाच्या वर खाली होण्यावर पैसे कमावताना फटका बसण्याचाच योग जास्त असतो.
म्हणूनच आधीच पन्नास डॉलर्सचे नुकसान गृहीत धरून चार पाच जण असलेल्या टेबल जवळ जाऊन बसलो.
काळा आणि लाल रंगा पैकी एक आणि दोन आकडे सिलेक्ट करायचे असा काहीसा गेम होता.. मी मनोमन दहा डॉलर्सचे पाच गेम खेळायचे आणि पैसे गेले तर गेले निमूटपणे उठायचं आणि बाहेर पडायचं असा निग्रह मनाशी केला होता.
बघता बघता चार डाव उलटे पडले होते चाळीस डॉलर्स संपले होते आणि  शेवटचे उरलेले दहा डॉलर्स नविनआकडे आणि रंगावर लावले आणि रिझल्ट काय आला ते न बघता पाठ फिरवून निघालो.. 
तेवढ्यात सौरभचा आवाज आला, “बाबा, तुमचा नंबर आणि रंग दोन्ही आला तुम्हाला दोनशे पन्नास डॉलर्स मिळालेत.. आपण पुन्हा खेळूया की!!”
मी त्याचा हात धरला आणि सौं. स्वाती सह मी बाहेर त्या मायाजालातून पडलो, फक्त्त गंम्मत म्हणून पाच गेम खेळण्याचा माझा विचार पक्का होता पैसे मिळो अथवा जावो… कॅसीनोचा एक अनुभव घेण्यासाठीचा हा खटाटोप त्या दिवशीचा  खर्च देऊन गेला.
तस बघितलं तर आयुष्यही एक मोठा जुगार आहे!!
काहीही शिकलो पण नोकरी योग्य मिळेल का? त्यात समाधान मिळेल का? लग्न तर  केले पण बायकोचे आणि आपले जमेल का? वडिलांनी लोन घेऊन MS करायला पाठवले पण तेथे जॉब मिळेल का? पी आर मिळेल का?…..असे अगणित अचूक उत्तर माहित नसणारे अनेक प्रश्न असतात आणि प्रत्येक जण आपापला डाव वेगवेगळ्या पर्यायावर खेळत असतो..
हे सर्वं अनुत्तरित प्रश्न भविष्यात उलगडतात पण तो पर्यंत अमुल्य वेळ मुठीतल्या वाळू प्रमाणे निघून गेला असतो. 
काहींचे निर्णयाचे आकडे नियतीची साथ असल्याने बरोबर निघाले असतात तर काहींना  मात्र दगा दिला असतो..ते  केलेल्या कर्माला दोष देत असतात.
आयुष्यात कुठे थांबावे हे सुद्धा नक्की कळले पाहिजे.अगदी नवरा बायकोचे क्षुल्लक भांडणही वेळवर न थांबवल्यास संसार उध्वस्त होतो. 
जुगारात ब्लाईंड मध्ये खेळताना अनेकदा दैव साथ देत असले तरी कष्टाविना जेव्हा काही मिळते ते गोड लागत नाही… किंवा त्याची किंमत रहात नाही.
अगदी धर्मराज युधीष्टीराची मती द्युतात भ्रष्ट होताना महाभारतात बघीतली आहे. हरलेलं परत जिंकण्याच्या लालसेने धर्म शास्त्रात विद्वान धर्मराजानेही अगदी सर्वस्व त्याने डावाला लावले होते!!  आपण तर सामान्य माणसं आहोत.
कमी वेळात शॉर्ट कट ने मिळालेलं बहुतेक वेळा घातक, फसवं असत..एक तर ते तुम्हास आळशी बनवत नाहीतर तुमचा मिळवण्यातला आनंद तरी नष्ट करत.
असो..
हे विचार भलेही  खूप उंचावर नेणार नाहीत पण खालीही आणणार नाही,
आणि 
खूप पुढे जाण्याची सातत्याने शिखरावर राहण्याची इच्छा असणाऱ्या वा नव्या पिढीला पटणारही नाही, तरी ऑकलंडाच्या कॅसीनोतून बाहेर येतांना हेच मनात घोंघावत होते.
मी साठीच्या पुढे गेलो याचेच ते द्योतक असावेत.
_जुगार खेळतांना_ 
_मती भ्रष्ट ती होते_ 
_विवेक दूर पळतो_ 
_नीति ती नष्ट होते_ 
_हाव खूपखूप वाढे_ 
_कष्ट नकोसे वाटते_ 
_आनंद अन सुख_ 
_दूर दूर ते पळते_ 
_अति तेथे होते माती_ 
_जाणुनि हा तो मंत्र_ 
_सुवर्णंमध्यावरी राहता_
_यशस्वी जीवन चित्र_ 
_शिखरावरी राहण्या_ 
_धाव धाव धावतो तो.._ 
_अनेक सुंदर क्षणाना_ 
_वंचित नकळत रहातो_ 
_सर्वं खेळ मांडला हा_
_फक्त त्या  पोटासाठी.._
_एकच जन्म हा आहे_
_उगा सातजन्माची कमाई.._
✍️हेमंत नाईक