रविवार १८ जानेवारीला फोन आला माझ्या मित्राच्या मुलाचा.
“अंकल, कसे आहात? मी आलो होतो मुंबईत. घरी येणार होतो भेटायला. पण उद्या सकाळी हैद्राबादला परत जायचे आहे.”
तो कां आला होता मुंबईत ते लक्षात आले. मुंबई टाटा मॅराथॉन साठी. दरवर्षी येतो. " कशी झाली मॅरेथॉन?" मी विचारले.
“चांगली झाली. या वेळी मार्ग बदलला होता. चार ऐवजी सहा चढाव होते. परत येताना तितकेच उतार. पण पूर्ण केली”
मी त्याचे अभिनंदन केले.“धावलास, थकलास, पण पूर्ण कापले अंतर. हे महत्वाचे.”
**
माझी आज तशीच भावना आहे. माझ्या शब्दांचे सुरपाखरू उडाले होते १ जानेवारीला.आज आता विसावले आहे. खरं तर मन तयारच नव्हतं या प्रवासाला.. पण मित्र तुषारने प्रोत्साहित केले. सुरु तर करा. पाहू मग. चाललो, मंदावलो, फडफडलो, चरफडलो, पण झाले ३०दिवसात३०.
आता आढावा घ्यायला हवा.
- काय मिळवले ३०दिवसात??
एक प्रयोजन, उद्देश, प्रत्येक नव्या दिवसासाठी. मी सकाळी का उठावे याचे उत्तर.
थोडी शिस्त. नियमित पणा. रोज बसायचो लॅपटॉप समोर. काही नवे सुचले नाहीच तर अर्धवट लिहून ठेवलेले पूर्ण करत.
गद्य लेखनाचे काही धडे. इतरांचे वाचून.
नवीन तंत्रे लिखाणासाठी. वेळ वाचवण्यासाठी.
धाडस स्वतःचे व्यक्तिगत अनुभव लिहिण्याचे .
शेवटचे पण महत्वाचे - पुनर्शोध स्वतःचा !
- आणखी काय करायला हवे?
वाचन वाढवायला हवे. हातात पुस्तक धरून नाही जमले, तर ऑडिओ पुस्तके ऐकायला हवी.
तुझं काय चाललंय असे विचारू शकणारे मित्र जोडायला हवे. (आज सकाळी श्री रवींद्र लाखे सरांनी फोन केला तसे.)
नवीन विषय निवडून लिहिण्यासाठी टिपणे काढायला हवी.आळस वाटला तर लगेच मोबाईल वर बोलून रेकॉर्ड करून ठेवायला हवी, जसे तुषार ने सांगितले तसे. हा माणूस जीवघेणा कोच आहे!
)
ते फोरम सुरपाखरू वापरायला शिकायला हवे. त्या साठी कडक मराठी शिकायला हवे.
- आनंद कशाचा झाला? उर्फ डोपामिन कसे मिळाले?
काही लिहिणाऱ्यांना मित्र बनवून. सुषमा ठाकूर यांना या उपक्रमात जोडून. तुषारला अधून मधून त्रास देऊन.
साऱ्या लेखकांचे अभिनंदन.
व्यक्तिगत अडचणींवर मात करत नियमित दर दिवशी लिहिणारे बरेच या प्रवासात भेटले, त्यांना कडक सलाम. त्यांची ही स्वतःशी वचनबद्धता, जबाबदारीची जाणीव मला खूप शिकवून गेली.
जून मध्ये भेटूच पुन्हा.
श्रीधर जहागिरदार
३१ जानेवारी २०२६