मी थोड्या वेळापूर्वीच एका व्हिडीओ कॉल मधून बाहेर आलोय . तो अनुभव मी इथे शब्दांकित करत आहे.
ही गोष्ट आहे कियाराची. कियाराला कँसर आहे. कँसर म्हटलं की दचकायला होतं. पेशंटलाच नाही तर त्याच्या वर्तुळातल्या कुणालाही. नातेवाईक लगेच सल्ले द्यायला सुरुवात करतात. अंगारे धूपाऱ्यापासून तर “माझे एक नातेवाईक होते, आता नाहीत ते…” असे बरेचसे. कियारा आणि तिचे आई-बाबा याला अपवाद नाहीत.
कियारा आता आठ वर्षांची आहे.तिसरीत शिकते. ती दोन वर्षांची असताना तिच्या मानेवर हलकी गाठ जाणवली. डॉक्टरने अँटिबायोटिक दिले. फरक पडला नाही. आणखी एक गाठ जाणवल्यावर बायोप्सी वगैरे झाले. तिला ताप यायला. लागला. कफ झाला कॅन्सर आहे हे निदान पक्के झाले.
आज व्हिडीओवर ती गोड मुलगी हसत खेळत बोलत होती. तिचा आजपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कुठल्याही कँसर पेशंटचा नसतो. सर्वात अधिक त्रास किमोथेरपीचा असतो. किमो औषधं खूप स्ट्रॉंग असतात. त्यांचा शरीरावर परिणाम होतो. केस गळतात. तिच्या आईने कियारा विचारले, तुझा बॉयकट करायचा ? ती लगेच तयार झाली. लहान मुलं निरागस असतात. जगाचा अनुभव नसतो. जगाबद्दल माहिती कमी असते. त्यामुळे सकारात्मक असतात. कँसर मधून बाहेर पडायला सकारात्मक मानसिकता खूप मदत करते. हे मी छातीठोक पणे सांगू शकतो.
कियाराची आई सांगत होती, औषधोपचारादरम्यान ती खूप सहकार्य करायची. "धीरे से करना " एवढच म्हणायची.
कियाराने शाळेत जायला सुरुवात केली. ती केजीत असताना कँसर रिलॅप्स झाला. शाळा बंद केली नाही. एक आठवडा हॉस्पिटल, एक आठवडा शाळा. शाळेने आणि टीचर्सने खूपच सहकार्य दिले. तीला थकल्या सारखे वाटले तर आराम करायला एक खोली दिली होती. शाळेत कौन्सिलिंगची सुविधा आहे - हार्ट टू हार्ट.
कॉल वर कुणीतरी विचारले, तुला कुठला विषय आवडतो, ती म्हणाली मॅथ्स. पण लिहिणे तिला बोअरिंग वाटते. तिला तू मोठी झाली की कोण होणार विचारले, तिने यादी दिली.. सिंगर, डान्सर, ऍक्टिंग, सेलिब्रिटी.
कँसर पेशंटला (रोगी शब्दापेक्षा मला पेशंट शब्द आवडतो. खूप सहनशील असावे लागते त्यांना. हे मला माझे डॉक्टर आशिष जोशी म्हणाले होते,) आत्मीयतेची गरज असते. घरातल्या मंडळींना बरीच आव्हाने पेलावी लागतात. पेशन्टला सतत तू बाहेर पडणार या साऱ्यातून हा दिलासा द्यावा लागतो. तसेच हे स्वतःलाही समजवावे लागते. त्यांनाही उमाळे येतात. रडावेसे वाटत असते. त्यांनी घरातल्यांसमोर मोकळे व्हायला हरकत नसते, वाटल्यास कौन्सेलिंग घ्यावे.
बाहेरची आव्हाने आणखी वेगळी असतात. कँसर बद्दल बरेच गैरसमज आहेत समाजात. पहिल्या क्रमांकावर आहे - कँसर म्हणजे मृत्यू! आज वैद्यकीय जगात रोज नवीन नवीन उपचार शोधले जात आहेत, आपल्याही देशात ते उपलब्ध आहेत.
कियाराची आई, जेनी वीरमानी सांगत होती, कियारा घराबाहेर खेळायला जाऊ लागली, तसे एका शेजारणीने विचारले, “हिला काय झालंय” कियाराच्या आईने सांगितले- कँसर. शेजारणीने लगेच विचारले, हा संसर्गजन्य तर नाही ना? स्ट्रॉंग औषधामुळे कियारा काळवंडली होती, थकत होती, आवाज घोगरा झाला होता. तिच्याकडे मुले जरा वेगळ्या नजरेने बघायची. कियाराला शरम वाटायची. " ममा त्यांना सांगू नको" असे म्हणायची. आईने तिला समजावले. तुला याची लाज वाटायची गरज नाही. जेनी सांगत होती, आम्ही तिचा आजार कुणापासून लपवला नाही.
आता खुद्द कियारा फॉलोअप साठी हॉस्पिटलला जाते तर तिथल्या कँसर पेशंट्सला भेटते, त्यांच्याशी बोलते.
कियाराची आई कँसर जनजागृतीचे काम करते.
कॉल बंद होण्या आधी मी कियाराला म्हणालो, आओ डान्स करें.
***
मी cancer survivors group in India चा सक्रिय सदस्य आहे.
(https://www.facebook.com/groups/1299269840151942)
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक २५ जानेवारी २०२६