मी आदिवासी पाहिलेत चित्रात. त्यांच्या कलात्मक कलाकृती पाहिल्या आहेत दर हिवाळ्यात भरणाऱ्या आमच्या शहरातल्या मेळाव्यात.
बस्तर ठाऊक झालं भूगोलात, आमच्या मध्य प्रदेशाच्या.
माझा मोठा भाऊ गेला होता बस्तरला. तो नोकरीत असताना. त्याने तिथून दोन बाण आणलेले, आमच्या घरातल्या भिंतीवर लावून ठेवलेले होते. मी त्याला विचारले, काय मारतात ते याने. तो म्हणाला उंदीर. मला हसूच आले. तो म्हणाला खरंच. मी म्हटले आपण तर काठीने पळवून लावतो घरात आलेल्या उंदराला. मग त्याने सांगितले, तिथे मोठे उंदीर असतात, आदिवासी त्यांना मारतात, भाजतात आणि खातात.
*
बस्तर नंतर नक्षलवादग्रस्त झाले. मी त्या बद्दल लिहिणार नाही. हा जिल्हा आता छत्तीसगड प्रदेशात येतो.
इथले आदिवासी गोंड या नावाने ओळखले जातात. त्यांच्या देवी देवता निसर्ग म्हणायला हरकत नाही. त्यात काही वृक्ष आहेत, सुरक्षेच्या दृष्टीने काही उग्र चेहर्याच्या मूर्ति असतात. हे आपण चित्रपटात पहात आलो आहोत. मी आदिवासींचा अभ्यासक नाही. आज लिहितोय त्याला कारण आहे .
**
अलीकडेच आमच्या घरात दोन आदिवासी महिला राहून गेल्या. महिला एवढयासाठी म्हणतोय कारण तीन तीन मुलांच्या माता आहेत. दोघी छत्तीसगढ प्रांतातल्या. घरात सौ स्वातीसाठी केअर गिव्हर हव्या होत्या. या दोन दोन महिने होत्या. अतिशय नम्र. पडेल ते काम बिनबोभाट करणाऱ्या. आल्या होत्या एका एजंसी कडून.
ममता आणि तिचा नवरा केअर गिव्हरचे काम करतात. ते नसले तर कुठे तरी छोट्या कारखान्यात मजुरी. ती जशपूर जिल्ह्यातील. हा जिल्हा जंगल आणि सुरक्षित वनांचा. तिचे घर आत वनात. ती सांगत होती कधीमधी हत्तीचे कळप येतात, घरांची नासधूस करून जातात. तिची तीन मुलं मिशनरी शाळेत शिकतात. तिच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे, त्यामुळे शिक्षण फुकटात तसेच अन्न -धान्य मिळते. थोडी शेती करतात पण फारसे काही मिळत नाही. विचारले सगळा गाव ख्रिश्चन झालाय का? नाही. काही नाही झाले, तिच्या काकांचे कुटुंब अजून 'आदिवासी’च आहेत. ती एकटी महिनाभर आमच्या इथे काम करून ती मुलांना भेटायला नवऱ्याबरोबर गावी गेली, दोन दिवसांचा रेल, बस,असा प्रवास करत. मी आले कि फोन करेल म्हणाली, परत काम असेल तर. ती एकटी प्रवास करत नाही फार. मुंबईच्या गर्दीची भीती वाटते. जंगली हत्तीची नाही.
दुसरी जिज्ञासा. ती सुद्धा छत्तीसगढ मधलीच. मागे एकदा काम करून गेली होती. तिला परत बोलावले होते. पहिले आली होती तेंव्हा मी म्हटले "आपक नाम जिग्यासा
है?" हसून म्हणाली, अंकल ने मेरा नाम बराबर लिया. तिचा चेहरा प्रसन्न आणि हसरा. स्वतः:हुन मागून कामं करायची. ती आता मुंबईतच राहते. तिला बोलावले तेंव्हा ती एका फॅक्टरीत रोजंदारीवर काम करत होती. म्हणाली छुट्टी लेकरं १५ दिन आऊंगी. तिथे फार कमी पैसे मिळतात. एका दिवशी म्हणाली आज लौकर काम संपवून मी जाईन, बांद्र्याला. स्वातीने विचारले , चर्चला जायचे आहे? म्हणाली नाही,आठवड्यातून एक दिवस बांद्र्यात एका मोठ्या सोसायटीत पूर्ण अंगण झाडायचे काम करते. पाच हजार मिळतात.
जंगलच्या मुली आता शहराकडे वळू लागल्या. शहरं त्यांना सामावून घेऊ लागली. चणचणीत रहायची सवय असल्याने घरी पैसे पाठवू शकतात.
माणसांची रोजगारासाठी अशी वणवण सुरूच रहाणार. त्यांना परके न मानता आपल्यात सहज सामावून घेण्याचा शहाणपणा कधी येणार?
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक ३० जानेवारी २०२६