पुस्तक परिचय 'ट्रिगर्स' - मार्शल गोल्डस्मिथ

प्रत्येकाच्या मनात काही नाजूक चाप (ट्रिगर्स ) असतात, अगदी हलक्याश्या धक्क्याने देखील ते साट्कन ओढले जातात. त्या मुळे घडणारे आपले वर्तन सहसा परिणामकारक नसते. किंबहुना ते नुकसान कारक असते, आपल्याला ध्येयापासून दूर ढकलते. कारण असे चाप आपल्या नकळत ओढले जातात, आपण ध्येयपूर्तीच्या कामात व्यग्र असताना असे प्रसंग अगदी रोजच्या जीवनात देखील घडू शकतात.

आता हेच पहा सुरपाखरू प्रकल्पाचे ३०दिवसात ३० हे ध्येय गाठण्यात दर रोज काही तरी अडचण येत होती. कधी विषय न सुचणे, कधी लिहीत असताना नातवाचे मध्ये मध्ये करणे, कधी हे कधी ते. तर कधी चक्क कंटाळा करणे.

आपले व्यक्तिगत किंवा व्यावसायिक ध्येय गाठण्यात आपल्याला अडचणी येत असतील तर ट्रिगर्स Triggers हे २३३ पानांचे पुस्तक जरूर वाचावे.

मार्शल गोल्डस्मिथ हे जगप्रसिद्ध लेखक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी या पुस्तकात आपल्या बाहेरील वातावरणात आणि मानसिक 'ट्रिगर्स’चा अभ्यास केला आहे, जे आपल्याला आपल्या कामात किंवा वैयक्तिक आयुष्यात ध्येयापासून भरकटवू शकतात.

आपण अचानक का बदलतो?

तुम्हाला कधी असे वाटले आहे का की:

  • आपण स्वतःला खूप शांत आणि समजूतदार समजतो, पण अचानक आपला संयम सुटतो?

  • एखादी विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर तुम्ही नको इतके चिडचिड करता?

  • रस्त्यावर गाडी चालवताना एखाद्याने मध्येच गाडी घातली की तुमचा पारा अचानक चढतो?

आपल्या या प्रतिक्रिया विनाकारण नसतात. आपल्या आसपासची माणसे आणि परिस्थिती आपल्याला असे वागायला प्रवृत्त करतात, जे आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असते. हे ‘ट्रिगर्स’ सतत आणि सर्वत्र असतात. जरी परिस्थिती आपल्या हातात नसली, तरी गोल्डस्मिथ यांच्या मते—त्या परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा, याची निवड आपण नक्कीच करू शकतो. ३०दिवसाते ३० कंटाळा / आळस,तर मग हाच विषय निवडायचा लिहायला. नातू मध्ये मध्ये करतोय तर त्यालाच चार शब्द सांगायचे टंकायला.

आपल्यात बदल घडवून आणायचा असेल तर स्वतःला ‘सक्रीय प्रश्न’ (Active Questions) विचारा

स्वतःचे रोज परीक्षण करणे हा एक मार्ग पुस्तकात सुचवला आहे.

ते यासाठी काही ‘सक्रीय’ (Active) प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात. हे प्रश्न तुमच्या निकालापेक्षा (Result) तुमच्या प्रयत्नांवर (Effort) भर देतात. यश मिळवणे आणि प्रयत्न करणे यात फरक आहे; आपल्याला नेहमीच यश मिळेल असे नाही, पण प्रयत्न करणे कोणालाही शक्य आहे.

पुस्तकात असे सहा महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत जे आपल्याला स्वतःच्या प्रगतीची जबाबदारी घ्यायला आणि आपण कुठे कमी पडतोय हे ओळखायला मदत करतात.

मार्शल गोल्डस्मिथ यांनी पुस्तकात दिलेले हे ६ सक्रीय प्रश्न अत्यंत प्रभावी आहेत. हे प्रश्न विचारताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची सुरुवात “आज मी… यासाठी पूर्ण प्रयत्न केले का?” अशी होते.

हे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:

१. आनंदी राहण्यासाठी

बहुतेक वेळा आपण आपल्या आनंदासाठी परिस्थितीला किंवा इतरांना जबाबदार धरतो. हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की—बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी, आज मी स्वतःहून आनंदी राहण्यासाठी मनापासून प्रयत्न केले का?

-हो आज मी एक कठीण विषय निवडला लिहायला - मरण स्पर्श !

२. जीवनात अर्थ शोधण्यासाठी

आपल्याला आपल्या कामात किंवा आयुष्यात रस वाटत नाही, अशी तक्रार आपण अनेकदा करतो. पण आज जे काही मी केले, त्यात काहीतरी अर्थ किंवा उद्देश शोधण्याचा मी प्रयत्न केला का?

- नक्कीच ! एका लहान मुलीचा कॅन्सरशी चाललेला लढा या बद्दल लिहून कँसर बद्दल जागरूकता आणण्याचा यत्न केला.

३. सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी

आज मी माझ्या कुटुंबाशी, मित्रांशी किंवा सहकाऱ्यांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी किंवा ते चांगले टिकवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले का?

- आज एका सह लेखिकेला लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले.

४. पूर्णपणे गुंतलेले राहण्यासाठी

मी जे काही काम केले, मग ते ऑफिसचे असो किंवा घरचे, ते करताना मी पूर्ण लक्ष देऊन (Focus) केले का, की माझे लक्ष भरकटलेले होते?

-आज मन भरकटले. उदास झाले. एका मित्राच्या सहचरीच्या अचानक निधनाने.

५. ध्येयाकडे प्रगती करण्यासाठी

माझे जे काही वैयक्तिक किंवा प्रोफेशनल ध्येय आहे, त्या दिशेने आज एक छोटे पाऊल टाकण्यासाठी मी मेहनत घेतली का?

-आज मागे पडलेले दोन लेख लिहून काढले.

६. स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी

आज मी योग्य आहार, व्यायाम किंवा पुरेशी झोप यांद्वारे माझे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला का?

- हो. पहाटेचा व्यायाम आणि चालणे सुरूच ठेवले.

हे प्रश्न महत्त्वाचे का आहेत?

प्रयत्नांवर लक्ष : तुम्ही यशस्वी झालात की नाही, यापेक्षा तुम्ही “प्रयत्न केले का?” यावर हे प्रश्न भर देतात. कारण प्रयत्न करणे पूर्णपणे तुमच्या हातात असते.

स्वतःची जबाबदारी : जेव्हा आपण स्वतःला विचारतो “मी प्रयत्न केले का?”, तेव्हा आपण इतरांना दोष देणे बंद करतो आणि स्वतःची जबाबदारी घेतो.

लेखक श्रीधर जहागिरदार

दिनांक २९ जानेवारी २०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० #प्रायोग२०२६

1 Like