आपला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी

​२६ जानेवारी, आज आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन ७७ वर्षाचा झालेला आहे. प्रजासत्ताक म्हणा, गणतंत्र म्हणा, रिपब्लिक म्हणा, या दिवशी आपलं संविधान स्वीकृत झालं हे सगळ्यांना माहित आहे. संविधानातील मुख्य भाग आहे " कुठलाही भेदभाव न करता" हे प्रजासत्ताक प्रजेने निवडून दिलेले प्रतिनिधी चालवतील.

​संपूर्ण दिवसावरती निबंध न लिहिता आता ७७ वर्षांनंतर मला वाटतं हा विचार करायला हवा की ती जी घोषणा आपण केली होती प्रजासत्ताकाची, भेदभाव न ठेवण्याची, त्याची आज स्थिती काय आहे? आणि मला वाटतं त्या दृष्टीने आपण प्रजा म्हणून कुठेतरी कमी पडतोय.

​कारण काय? साधा पेपर उघडला किंवा सोशल मीडिया पाहिलं तर “आम्ही” आणि :ते" या स्वरूपाचे भेदभाव वेगवेगळ्या प्रकारांनी अधोरेखित होऊन दिसताहेत. जातिवाद आहे, आरक्षण आहे, धर्म आहे, या सगळ्यामध्ये आम्ही आणि ते.

​अगदी प्रत्येक क्षेत्रात असं आहे असं मी म्हणणार नाही. काही ठिकाणी, विशेषतः लिंगभेद खूप कमी झालेला आहे कारण आता महिला आपल्याला सैन्यामध्ये दिसतात, मेडिकलमध्ये दिसतात, फार्मसीमध्ये दिसतात राजकारणात दिसतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी स्वतंत्रपणे त्या कार्यरत आहेत यात काही शंका नाही. पण त्या ठिकाणी होणारा लिंगभेद अजूनही कमी झालेला नाही. कारण पुरुषांच्या नजरेमध्ये आजही महिला या पूर्णपणे सक्षम नाहीत असंच आपल्याला आढळून येतं.

​मला असं वाटतं की आज आपण प्रजा म्हणून प्रत्येकानं काही गोष्टी पुढाकार घेऊन त्याच्याकडे इंगित करावं ही अपेक्षा आहे. रस्त्यावरती एखाद्या महिलेवरती जेव्हा हल्ला होतो त्यावेळेला आम्ही त्याचा व्हिडिओ करण्यात व्यस्त असतो मात्र पुढे जाऊन त्या हल्लेखोरांना थांबवण्यासाठी क्वचितच कुठेतरी कुणी पुढे आलेलं आपल्याला जाणवतं.

​हीच गोष्ट ऑफिसेसमध्ये सुद्धा आहे. पुरुष मंडळी एखाद्या महिलेच्या विरुद्ध काही घडत असेल तर त्यासाठी आवाज उठवताना आढळत नाहीत. मला वाटतं ही परिस्थिती बदलण्यासाठी आता आपण पुढे आलं पाहिजे.

​सरळ साधं काम स्वच्छता. स्वच्छता हा आपला मूलमंत्र आहे याची घोषणा करून सुद्धा आता जवळ जवळ १२-१४ वर्ष झालेली आहेत. पण आपण वैयक्तिकरीत्या ती किती पाळतो हा प्रश्न मला विचारावासा वाटतो. अगदी घरात देखील आपण सुका कचरा, ओला कचरा, मेडिकलवाला कचरा वेगळा वेगळा करून ठेवतो का? नाही. कारण काय? आपणच का करायचं बाकी कोणी करत नाही तर? ही आपल्यापासून सुरुवात आपण कधीपासून करू शकू याचा प्रामुख्याने विचार जर का झाला तर मी म्हणेन की हो आम्ही दमदार पाऊल उचलली आहेत, आमच्या प्रजासत्ताकाला कायम ठेवण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी.

​नुसती शपथ घेऊन चालणार नाही, कृती करण्याची वेळ आहे ही.

लेखक श्रीधर जहागिरदार

दिनांक २६ जानेवारी २०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६