आयुष्याची गोळाबेरीज करायची तर व्यसनाचा कप्पा रिकामा सोडून चालणार नाही. तिथे वर आपल्या आयुष्याचे चित्र गुप्तपणे रेखांकित करण्यारा कुणी असणारच.
आता वाचन, लेखन, नाटक, गायन, वादन, चित्रण, यांना व्यसन म्हणण्याची मखलाशी कुणी करत असेल, पण या नाना कळा व्यवसाय देखिल असु शकतात. तसं नसेल तर यात पार्टटाईम टाईम पास करणाऱ्याचे आप्त याला *वेड* म्हणतात आणि सोडून देतात.
व्यसन लागायचं वय होतं त्या काळी सुपारी व्यसनयादीतून बाद झाली होती पण तंबाखू आणि नशा यांना मात्र स्थान होते. ग्रॅज्युएशन पर्यंत हे करून पाहावे असे कधी वाटले सुद्धा नाही. पहिली सिगारेट कधी आणि कुठली ओढली हे आठवत नाही, मात्र कुठे हे आठवते. रामबागेतल्या एव्हरग्रीन बेकरीच्या समोर पोस्ट ऑफिस बाहेरच्या कट्ट्यावर. नाटकात काम करताना सिगारेट ओढायची संधी(?) मिळाली. खोकला न येता आणि धूर आत न ओढता सिगरेट कशी फुंकायची हे शिकलो.
मी आणि अविनाश गोखले एका द्विपात्री एकांकिकेत काम करत होतो, साहित्य सभेतील एका स्पर्धेत. ४५ मिनिटांच्या एकांकिकेत नुसत्या भकाभका सिग्रेटी ओढयाच्या होत्या. कधी नव्हे ते दादा एकांकिका पहायला आलेले. मला ठाऊक नव्हते. घरी पोहोचलो तर दादांनी एकांकिकेवर भाष्य केले. प्रयोगाचे कौतुक केले. मग म्हणाले, “माझ्या शेजारी ते अमके तमके उभे होते, ते म्हणाले, पहा वकील साहेब चिरंजीव जोमात सिगरेट ओढतात. मी त्यांना म्हणालो नाटकात भूमिका वठवताना ओढतोय. कधी रस्त्यावर ओढताना दिसला तर सांगा मला.” त्यांच्या ह्या विश्वासाला मी इंदौर सोडे पर्यंत तडा जाऊ दिला नाही. (उद्याच्या संसार मध्ये भाऊने बहुदा पाईप हातात घेतला होता हे आठवले. )
बँकेत नोकरीला लागलो तरी मी मग सिगारेट ओढली नाही. लखनौत रूममेट स्मोकर असून नाही.
मग कशी नियमित ओढायला सुरुवात झाली? हं … अगदी ठरवून सुरुवात केली. हिंदीत सांगायचं झालं तर वो एक ज़ाती मामला है. तो एक भावनिक आघात होता. इंदौरहून जबलपूरला परत जाताना, इटारसी स्टेशन वर उतरलो, एक विल्स शिलगावली आणि स्वतःला सांगितलं “व्यसन वाईट नसतं व्यसनाधीन होणं वाईट!”
लग्नानंतर स्वातीनं सांगितलं “घरात पाकीट ठेवायचं नाही.” ती सूचना नव्वद टक्के पाळली.
डनहिल ब्रॅण्डबद्दल एक आठवण आहे. दिल्लीत भाऊचे साहेब होते, मिस्टर हैदर. त्यांनी परदेशातून येताना हा ब्रँड आणला होता. त्यांनी भाऊला कसे काय विचारले माहित नाही, पण भाऊ त्यांना म्हणाला मेरा छोटा भाई स्मोकिंग करता है उसके लिये एक पॅकेट रख लेता हूं" मीही ते पॅकेट आरामात घेऊन आलो.
सिगरेट हळू हळू आयुष्यातून निस्तेज झाली.
फटाक्यांच्या दारूला फार आधी मनातून हद्दपार केले. मला वाटत, एक कविता होती मराठी पाठयपुस्तकात. “हवे कशाला चिनी फटाके, बार तयांचे निघती फुसके” तिचा परिणाम होता की वत्सला मावशीच्या एका लहानग्या भाच्याचे प्राण त्या रॉकेटने घेतले होते त्याचा मनावर परिणाम होता, पण फटाके सुटलेच. मुलींनी देखील फार लौकर समजूतदारपणा दाखवला.
बाटलीतली दारू मी कधी चाखेन असे वाटले नव्हते. त्याचे असे झाले.
प्रोबेशनच्या काळात मी सहा महिने अलाहाबादला होतो. रॉयल हॉटेल मध्ये एक खोली घेतली होती. डिसेंबर मध्ये हॉटेलच्या मॅनेजरने त्याच्या घरी पार्टी ठेवली होती, मलाही बोलावणे होते. गेलो. सोबत हॉटेलमध्येच राहणारे दोन MR होते. थोडयाच वेळात ट्रेमध्ये ठेवलेले पेले फिरू लागले. रंग सोनेरी नव्हता हलका चॉकलेटी होता. मी ग्लास उचलता उचलता मित्राला विचारले, ये क्या है? तो म्हणाला, रम ! मी मग खूप वेळ ग्लास हातात ठेऊन उभा होतो. मॅनेजर जवळ येऊन विचारू लागले, मी म्हणालो मी पित नाही, तर विश्वास ठेवायला तयार होईनात. मी कसे बसे अर्ध्या तासात दोन घोट घेतले. आणि ग्लास ठेऊन दिला. अलाहाबादहून लुधियानात गेलो तिथे थंडीचा अतिरेक होता. पण एका बैठकीत एका पेगच्या वर घेतली नाही. एक खरे मला ती हलकी चव आवडू लागली होती. जिभेवरचा ताबा सुटायच्या आधी थांबविण्याचे तंत्र जमले होते. रम, व्हिस्की, बिअर मधला फरक कळू लागला होता. एका मित्राला तर किंगफिशर सुद्धा चढत असे!! ठराविक मित्रांसोबतच मी घेत असे. प्रत्येक गावात असे विश्वासू मित्र भेटत गेले. बँक कस्टमर सोबत कधीच दारू प्यायची नाही हा दंडक कसोशीने पाळला. उपाशी पोटी घेतलेली दारू उलटते असे सुद्धा अनुभवाला आले. हवेत उडताना झोप येण्याचे औषध इतकेच टॉनिक घ्यायचा संकेत पाळला. परदेशातून परत येताना ड्युटी फ्री ची भेट कधी मामाला दिली, कधी आणखी कोणाला.
एक पटले, वारुणीशी जुळवून घेतले तर ती आनंद देते. तिच्याशी सलगी केली तर … बट्ट्याबोळ ठरलेला.
आता मात्र इतकेच सांगतो:
असु दे पेला हातामध्ये, मद्य बदल तू,
‘नाद’ असू दे, गाण्यामधले शब्द बदल तू,
सुरावटीला तू वेळेची, जाण असू दे ,
विझतानाही अंगाराची आण असू दे!
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक २५ जानेवारी २०२६
#सूरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६