मरण स्पर्श भाग पहिला

स्वत:च्या मरण डोहात डोकावून आल्यावर मृत्यू या विषया वरील माझे चिंतन जरा वाढलेच आहे.

जन्माला आल्याबरोब्बर ‘मरण’ म्हणजे काय हे लगेच कुणाला कळत असेल का? कुणास ठाऊक.

मी जन्म घेण्याची कहाणी मला हळू हळू कानावर आसपास बोलणाऱ्यांकडून उमगत होती. मी सर्वात धाकटा. त्याकाळी असे, तसे आम्हा चारी भावंडात दीड -दोन वर्षांचं अंतर. “अरे आपल्याला एक छोटा भाऊ आलाय, आपण जाऊ त्याला बघायला” असे माझ्या बहिणीने माझ्याहून मोठ्या भावाला सांगितले असे ती गप्पा मारताना एकदा सांगत होती. वडीलधारी माणसे लहान पोरं आसपास खेळत आहेत याचे भान विसरून बऱ्याच गप्पा मारतात. त्या कानावर पडतात आणि कच्च्या मनात घर करून बसतात. त्यांचे संदर्भ बालवयात अनाकलनीय असतात हे खरे, पण त्यातून स्वतःची आयडेंटिटी तयार होत असते. नात्यातले भावबंध विणले जात असतात. माझ्या सोबत आईच्या पोटात आणखी एक भाऊ वाढत होता असे काहीसे कानावर पडले होते. मात्र ‘भाऊ’ असा उल्लेख करून सारे हसत असत. हळू हळू उमगले तो भाऊ म्हणजे एक ट्युमर होता. त्यामुळे आईचे बाळंतपण कठीण झाले होते. तो एक मरण स्पर्श होता का? मला किंवा आईला झालेला?

माझी आजी, जिजी, वडिलांची आई मी सात वर्षांचा असताना गेली. आजोबा तर वडील, आम्ही त्यांना दादा म्हणत असू, लहान असतानाच गेले. जिजी आमच्याच घरी रहायची. तिची आठवण म्हणजे हिवाळ्यात ती आम्हाला गोष्ट सांगायची तेंव्हा आम्ही तिच्या दुलईत शिरायचो. त्या दुलईला तपकिरीचा वास यायचा. तिला पक्षाघात झाला होता. ती गेली त्या सकाळी मी आणि माझ्याहून मोठा भाऊ, मुकुंद दोघांना आजोळी पाठवले गेले. आमचे आजोळ जवळच होते. वहिनी (आजी)ने आम्हाला पोळीचा गोड कुचकरा खायला दिला. ‘ना’ म्हणजे आईचे वडील, गेले त्यावेळी आम्ही मुले घरीच होतो. त्या काळात मला वाटते मुलांना अंत्य दर्शन देत नसत. मरण या संकल्पने पासून दूर ठेवत. त्यामुळे रस्त्याने जाताना एखादी शवयात्रा जात असली तर हात जोडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जात असू.

मी पहिला मृत देह पाहिला तो सातवीत शिकत असताना. शाळा सुटली की मागच्या ग्राउंडवरून मी घरी जात असे. त्या ग्राउंडवर एक विहीर होती. एका दिवशी पाहिले त्या विहिरीभोवती माणसांचा गराडा पडला होता. कुतूहलाने मीही पोहोचलो तिथे आणि विहिरीत डोकावून पहिले तर एक मृत देह तरंगत होता, तो बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. मी तिथून सूं बाल्या केला आणि घरी पोहोचलो. आईने माझा चेहरा पाहून विचारले, काय रे काय झालं? मी काहीच बोललो नाही. हातपाय धुतले आणि देवाजवळ जाऊन नमस्कार केला.

रामबाग स्मशान भूमी घरापासून लांब नव्हती. ती इंदूरच्या एकमेव नदी किनारी होती. रामबागेत आणि आसपास बरेच नातेवाईक होते. त्यांना भेटायला जायचे तर नदीच्या पुलावरून जावे लागायचे. नकळत नजर स्मशानाकडे वळायची. एखादे सरण जळताना दिसले तर मन घाबरायचे. विशेषतः एक लहान पूल होता बिना कठड्याचा, तिथून जाताना जर पेटते सरण दिसले तर फारच भीती वाटायची. मोठे कुणी बरोबर असले तरी. तो पूल आता मोठा करण्यात आलाय. तरी कधीतरी ती वाट स्वप्नात येते.

पुस्तके वाचू लागल्यावर ‘मरणे’ उमगू लागले. त्याची अनेक रूपे - विरूपे ठाऊक होत गेली. शव यात्रेत जाऊ लागलो. सांत्वनाला जाऊ लागलो. सरण रचण्यात मदत करू लागलो.

माझा एक शाळेतला मित्र होता. जयंत. भलताच हुशार. तो रामबागेत रहायचा. बीएस्सी करून मुंबईत आला. पीएचडी केले. मी मुंबईत मुक्काम ठोकला त्यावेळी माझा पत्ता मिळवून भेटायला आला. कामा निमित्ताने त्याचे मुंबईला येणे होत असे. एकदा मुंबईतल्या एका मित्राचा, चंद्रशेखरचा फोन आला. “श्रीधर, अरे जयंत बद्दल सांगायला फोन केला.” मग कळले जयंत नेहमी सारखा मुंबईत आला, नेहमीच्या हॉटेल मध्ये उतरला. खोलीत जेवण मागवून जेवला. त्याला भेटायचे म्हणून एक मित्र गेला. त्याने खोलीची बेल वाजवली. पुन्हा पुन्हा वाजवली. दाराला धक्का दिला तर दार उघडे … जयंत हार्टफेलने गेला होता. हे असे परक्या गावात मरणे म्हणजे अनेक सोपस्कार करावे लागतात. मी जे जे हॉस्पिटलला पोहोचलो. शवचिकित्सा झाली होती. जयंतच्या मोठ्या भावाला कळवले होते, त्याची वाट पाहत बसून होतो. गाडीची व्यवस्था झाली होती. भाऊ आल्यावर जयंतचा मृतदेह गाडीत चढवला आणि घरी परतलो. माणसाला हे असे मरण कां यावे? आप्तांपासून दूर … परक्या ठिकाणी, जिथे मृतदेहाची, सरणावर चढण्याआधी, चिरफाड व्हावी…

रवी तर मनाला एक बोच ठेवून गेला. इंदौरला माझा मित्र परिवार मोठा. त्यातले काही फारच निकटचे. रवी, सुभाष आणि मी, असे एक त्रिकुट होते. त्या दोघांनी मिळून इंजिनीअर झाल्यावर पोलोग्राउंड इंडस्ट्रिअल एरियात कारखाना टाकला. पुढे ते वेगळे झाले. रवीने शेती, दूध डेरी असा व्यवसाय सुरु केला. मी इंदौरला गेलो कि दोघांना स्वतंत्रपणे भेटत असे. २५ वर्षांपूर्वीही सप्टेंबर मधे गेलो होतो. रवीच्या घरी जाणार होतो. त्याने सकाळी फोन केला " का रे, आज येणार आहेस न?" मी म्हटले “आज नाही रे, उद्या येतो. जेवायला येईन. नक्की.” तो म्हणाला “ठीक आहे. मग मी माझे एक काम आहे ते उरकून घेईन.”

दुपारी ३ वाजता सुधीर बापटचा फोन आला. “श्री, रवीचा कार ऍक्सीडेन्ट झाला. वाईट स्थिती आहे.” मी सुन्न झालो. पहिला विचार आला, मी आज त्याच्या घरी जायचा बेत रद्द केला नसता तर…? लगेच रवीच्या घरी गेलो. कळले समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. रवी त्याच ठिकाणी…

त्याच्या देहाला दुसऱ्या दिवशी हाॅस्पिटल मधून सरळ स्मशान भूमीत नेले. त्याची मुलं लहान होती. सारे संस्कार झाल्यावर त्याच्या घरी गेलो. मी पुर्ण परिवाराला ओळखत होतो. सांत्वन कसे करावे समजत नव्हते. मनात एकच विचार… मी जर आधी ठरल्याप्रमाणे त्या दिवशी भेटायला गेलो असतो तर …

हा आघात उरात घेऊन मी बरीच वर्ष काढली. जर… तर… जर… तर…

(क्रमश:)

लेखक श्रीधर जहागिरदार

दिनांक १९ जानेवारी २०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

1 Like