१ फेब्रुवारी २०१०
“सर, एक प्रॉब्लेम झालाय.”
“काय झालं? सगळं चांगलं चाललंय, प्रोग्राम चांगला झाला. फीडबॅक चांगला आलाय?”
“ते बरोबर. पण मला कळत नाही काय करू”
“काय ते पटकन बोल. मला मीटिंगला निघायचंय”
“तो ढाक्याचा प्रोग्रॅम मलाच करायला सांगताहेत.”
“मग?”
“माझ्या आईची तब्येत बरी नाही. मला घरी जायला हवं”
“मग जाऊन ये.”
“पण हा प्रोग्रॅम? मी एकटाच लाइसेंन्सड ट्रेनर आहे, या ट्रैनिंग साठी”
“ग्रुप मध्ये आहेत आणखी ट्रेनर. त्यातल्या कुणाला बोलावून घेऊ”
“…”
“श्रीधर. काही निर्णय ज्याचे त्यानी घ्यायचे असतात. दुसरा कुणी घेऊ शकत नाही. तू ठरव. असा निर्णय घे ज्याचा तुला पश्चाताप होणार नाही. माझ्यापेक्षा तू जास्त जाणतोस.”
“ओके.”
“कळव मला उद्या”
*
मी घरी फोन लावला, बहिणीला विचारलं. तिने सांगितलं. आता बरी आहे. डिस्चार्ज देणार आहेत उद्या.
*
२ फेब्रुवारी २०१०
“नील, आई घरी आली आहे. मी ढाक्याला जात आहे. थँक्स .”
“
ऑल द बेस्ट”
*
४ फेब्रुवारी २०१०
" शुभदा, मी श्री बोलतोय. मला ढाक्याला जावं लागतंय. १९ ला परत येईन. आल्यावर फोन लावीन. गरज पडली तर फोन कर. "
*
११ फेब्रुवारी २०१० ते १९ फेब्रुवारी २०१०
ढाका माझा या देशातील शेवटचा ट्रेनिंग कार्यक्रम. चांगला झाला. काही जुने मित्र भेटले. काही नवे मित्र झाले.
*
२१ फेब्रुवारी २०१०
उल्हासचा फोन आला. सकाळी.
“श्री, आलास का परत ढाक्याहून ?”
“हो. काय रे? काही गडबड?”
“गडबड अशी काही नाही. आईला पुन्हा हॉस्पिटल मध्ये ठेवलय. सलाईन वर आहे. येऊ शकत असशील तर ये.”
" निघतो उद्याच"
*
" नील, आय एम बॅक. प्रोग्रॅम अच्छा रहा. "
" आय गॉट द फीडबॅक. कल बात करते हैं ऑफिस में "
“मी येत नाही. उद्या इंदौरला जातोय? आई परत हॉस्पिटल मध्ये आहे. सिरियस.”
" कोई बात नहीं. टेक केअर"
*
२२ फेब्रुवारी २०१०
सकाळच्या फ्लाईट ने इंदोरला पोहोचलो. घरी गेलो शुभदाने सगळं वृत्तांत दिला. म्हणाली, डॉक्टर म्हणाले, त्यांना घरी घेऊन जा. आपल्या माणसात राहतील. मुकुंद आणि भाऊ, वहिनी आधीच आले होते. दवाखान्यात होते. स्नान करून मी ही डॉ. मोघ्यांच्या दवाखान्यात गेलो.
मुकुंद ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करायला गेला होता.
मी गेलो. आई शुद्धीवर होती. डॉक्टर तिला सांगत होते.
“आजी, तुम्ही आता घरी जाऊ शकता. सगळे आले आहेत भेटायला.” त्यांनी माझ्याकडे पाहिले.
" मी आलोय आलोय आई, श्रीधर."
त्यावर तिने मोठ्या आवाजात जे सांगितले, त्याने मी क्षणभर भांबावलोच… काळजातला सल तीव्र बोचला.
" मला घरी जायचं नाही. यांच्या पैकी कुणी घरी राहणार असेल तरच मी घरी जाईन. नाही तर नाही."
“आई कुणी कुठे जात नाही. मी सुट्टी घेऊन आलोय. भाऊ आला आहे, मुकुंद आलाय. कुणी कुठे जात नाही”
*
घरी आलो. तिला ऑक्सिजन मास्क लावला. ती खूप मरगळली होती. मामा मंडळी येऊन तिला भेटून जात होती. काही गमतीशीर बोलून घरातला गंभीरपणा कमी करत होती.
मी ऑफिसला फोन लावून आठवडाभर तरी येणार नाही सांगितले. माझ्या सर्व कमिटमेंट संपल्या होत्या. जून अखेरीला निवृत्त होणार होतो.
आईला सूप हेच डाएट सांगितले होते. कधी मामी आणून देत होती. कधी वहिनी घरात बनवत होती.
आई आता निपचित पडून असायची. सूप दखल दोन चमचे घेतले की हातानेच नको सांगायची.
*
२८ फेब्रुवारी २०१०
आज होळी होती हुताशनी. दादा होते ते होळी पेटवायचे. घरात आता सणवार कमीच साजरे होत. लहान मुलं असली तर सणांची गंमत. दिल्लीहून शुभंकर, भावाचा मुलगा आणि त्याची पत्नी सान्वी आणि दोन वर्षांचा मुलगा कुशाग्र आले होते. एक दिवसासाठी. भेटायला. मामींनी पुरणपोळी धाडली होती. त्याच बिल्डिंग मध्ये मामा रहात असल्याने आईला खूप आधार होता.
संध्याकाळी अजून काही मंडळी आली भेटायला. मी आणि मुकुंद आईच्या जवळ बसलो होतो. तो तिला सूप पाजायचा प्रयत्न करत होता. मी तिचा हात हातात घेऊन चोळत होतो. मुकुंदने एक चमचा सूप तिच्या तोंडात टाकले. ते तसेच बाहेर ओघळले. त्याने माझ्याकडे पाहिले. मी त्याच्या कडे. मी आवाज दिला, आई पणतूला भेटून आनंद झाला न? मुकुंदने छातीवर हात ठेऊन चाहूल घ्यायचा प्रयत्न केला. मानेने नकार दिला. आम्ही भाऊला बोलावले. आम्हाला जे वाटले ते त्याला सांगितले. घर जवळ डॉ वत्सला मावशी रहात होती. तिला बोलावले.
भाऊने शुभंकरला सांगितले. तुमची फ्लाईट आहे आठ वाजता. तुम्ही आत्ताच निघा. मग अडकायला होईल. ते निघाले.
डॉक्टर आल्या. त्यांनी, जे आम्हाला कळले होते ते कन्फर्म केले. सर्टिफिकेट बनवून दिले.
दुसऱ्या दिवशी धुळवड होती. इंदौर मध्ये रंग जोरदार खेळतात. मग ठरवले, आजच रात्री अंतिम संस्कार करायचा, विद्युत शव दाहिनीत..तिथे विचारले अस्थी कधी मिळणार, उद्याही मिळू शकतात.
सगळं उरकून घरी यायला साडे अकरा वाजले.
मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केले.
*
१ मार्च २०१०
सकाळी उठायला जरा उशीरच झाला. अस्थी विसर्जन ओंकारेश्वरला आजच करायचे असे ठरवले.
समोरच्या फ्लॅट मधील बंगाली काकीनी चहा आणून दिला. नाश्ता भी आता है. असे म्हणाल्या. तेवढ्यात मामी वर आल्या. नाश्ता बनलाय बरं. आणते मी.
मी ऑफिसला मेल पाठवली. बँकेने नुकतीच सुरु केलेली आठवड्याची शोक-रजा मागितली. नामंजूर व्हायचा प्रश्नच नव्हता.
सकाळी नऊ वाजता ठरवलेली गाडी आली. आम्ही निघालो. स्मशान भूमीत जाऊन अस्थी घेतल्या आणि ओंकारेश्वरला रवाना झालो. अजून शहर रंगायला सुरुवात झाली नव्हती.
बोलता बोलता मी म्हणालो, “आई आईच असते.”
भाऊ ने विचारले ,“म्हणजे रे?”
मी सांगितले हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टरांना काय सांगत होती. “आपण सगळे आठवडाभर तिच्यासोबत होतो. तिला बरं वाटलं असणार. तिने आपल्याला मोकळे केले.”
शहर सोडल्यावर धुळवडीचा त्रास फार नव्हता. ओंकारेश्वरला घाटावरून होडीत बसून आतवर जाऊन विसर्जन केले. परतून घाटावर स्नान केले. परत निघालो, एक चांगले उपहारगृह पाहून गरम गरम खाणे केले.
*
२ मार्च २०१०
आईने ‘मी गेल्यानंतर’ अशा काही इच्छा सांगून ठेवल्या नव्हत्या. होत्या त्या पैशांबद्दलच्या होत्या. तिचा धार्मिक कल बघता अस्थी विसर्जनानंतर दहाव्या आणि तेराव्या दिवसाचे विधी करायचे ठरवले, ज्ञान प्रबोधिनीतील महिलांना बोलावून. त्यांच्याशी संपर्क साधला बोलणी केली. त्यांनी सांगितले दहावा आणि तेरावा,अस्थी विसर्जनानंतर सोयीने कधी करू शकतो.आम्ही दहाव्या दिवशी, म्हणजे ९ मार्चला करायचे ठरवले.
एक लक्षात आले, आपण शास्त्रात खोल शिरून विधींचे ‘नेमकेपण’ समजून घेत नाही. गुरुजी सांगतील तसे करतो. आता काळानुरूप बरेच बदल होत आहेत. गुरुजी मंडळीही यजमानांची सोय बघून कुठलाही विधी करत आहेत.
*
३ मार्च ते ८ मार्च
आईच्या बँक अकाऊंटची कामे उरकली कारण आम्ही भावंडे पुन्हा इंदौरला असे कधी एकत्रित येऊ हे निश्चित नव्हते.
*
९ मार्च २०१०
प्रबोधिनीचा अनुभव खूपच चांगला होता .. विशेषतः चांगल्या आठवणी काढायचा भाग. माझ्या मोठ्या मुलीने आजीच्या आठवणी सांगितल्या त्याचे कौतुक वाटले.
***
१० मार्च २०१०
“श्रीधर, सॉरी टू नो. सब ठीक? क्या उमर थी ?”
“मुझे लगता है … एटी एट”
******
हे सगळे लिहून मला एकदम मोकळे मोकळे वाटत आहे. कुठल्याही, कुणाच्याही मरणाचा स्पर्श मनाला झाला की मनात खूप दाटून येते. ते पूर्णपणे व्यक्त होत नाही. मोकळा वेळ, एकांत मिळाला आणि मनाला शब्दात रिते करण्यासाठी, कागद - पेन किंवा टंकक - मॉनिटर असला की एक प्रकारचा कॅथार्सिस किंवा विरेचन होते. नवी मोकळी ऊर्जा मिळते.
आई-दादा, कदाचित माझ्या तोंडून तुम्ही हे ऐकले नसेल पण आज सांगतो खूप खूप प्रेम!!
(समाप्त)
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक २१ जानेवारी २०२६
#प्रयोग२००६