मरण स्पर्श -भाग तिसरा

दादानी या आधी कधी अंथरूण धरल्याचे मला आठवत नाही. आता कोर्टात जाणे बंदच होते. अशिलांना बोलावून त्यांच्या केसची फाईल सुपूर्त करत होते. फी दिल्याशिवाय फाईल देणार नाही असा त्यांचा स्वभाव नव्हताच. शक्यतो ते आपसी में राजीनामा करलो असाच सल्ला देत. आता ते घरातल्या घरात हिंडत होते. मी रजा घेऊन भेटायला गेलो. त्यांना सांगितले मला काबूलला आठवड्यासाठी जायचे आहे. जाऊन ये, नोकरी म्हटली की जबाबदारी टाळता येत नाही. सांभाळून रहा. मी त्यांना हात धरून फिरवत होतो. खिडकीपाशी उभे राहून ते राजकुमार मिल्स ओव्हरब्रिज न्याहाळत होते. मी त्यांना म्हणालो, “दादा, लहानपणी तुम्ही मला पाठीवरून फिरवत होतात. आज मी तुम्हाला हात धरून हिंडवतोय.” त्यांनी आता एकेक कामं हातावेगळी करायला सुरुवात केली होती. मला म्हणाले," तुझं गोडबोले कॉलनीतलं घर विकायचंय ना? सांगून ठेवलंय मी. हवी ती किंमत मिळाली की काढून टाकू." “तुम्ही कशाला ती जबाबदारी डोक्यावर ठेवताय?” “तू परत येईपर्यंत घराचा सौदा करून ठेवतो.”

काबूलहून परतलो जुलै २०२५, मुंबई पाण्यात बुडाली त्यानंतर. आल्यावर आधी इंदौरला घरी फोन लावला. दादा म्हणाले “आलास सुखरूप. बरे झाले. मुंबईत सर्व ठीक होते हे कळवलं होतं सर्वांनी. तुझ्या घराचा सौदा झाला आहे. कधी येतोस कळव.”

आता त्यांचे सारे पलंगावरच करावे लागत होते. ते तिथून सगळ्या सूचना देत.

त्यांनी आणखी एक ऋण जाण्या आधी फेडले. आमच्या ज्या काकांनी त्यांना शिकायला मदत केली होती, त्यांच्या धाकट्या मुलाला पैशांची तातडीने गरज होती. त्याला त्यांनी माझ्या हातून पैसे दिले. मला म्हणाले, “त्याला म्हणा जमेल तितक्या लौकर परत कर.” तो ही उत्तरला " अंकल, ठीक है. लौकर परत करतो." तो गेल्यावर मला म्हणाले, " त्यानी परत केले तर ठीक. त्याच्याकडून मागू नका."

दादांची तब्येत ढासळत होती. आम्हा भावंडांना नोकरी, व्यवसायामुळेफार दिवस सलग थांबता येत नव्हतं, . ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचा भाऊ गेला इंदौरला. तो महिन्याभरात गेलेला नव्हता. त्याने डॉक्टरला विचारले, दवाखान्यात भरती करायचं का? डॉक्टरने स्पष्ट सांगितले, नको. आता प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्याचा बोनस दिवस आहे. त्याने आम्हा दोन्ही भावंडांना एसेमेस केला. नवरात्रीचे दिवस होते.भावाची काही कामं अडली होती. ११ ऑक्टोबरला तो अवंतिका एक्सप्रेसने मुंबईला परतायला निघाला.चार दिवसांनी कामं उरकून येतो सांगून. १२ ऑक्टोबरला दसरा होता. सकाळी आई त्यांना चहाचे विचारायला गेली. ते शांत झाले होते…

बहिणीने सात वाजता सारीकडे कळवले. घरी नातेवाईक पोहोचू लागले, आम्हा भावंडांसाठी थांबायचे की काय करायचे, विचारू लागले. आईने निर्णय घेतला. आले तरी संध्याकाळच्या आधी कुणी पोहोचू शकणार नाही. आज सणाचा दिवस आहे. कुणाचा खोळंबा नको. आत्ताच नेणार आहेत असे कळवा…

दादांचा धर्मकांडावर विश्वास नव्हता. विद्युत दाहिनीत दहन करा. दिवसाचे विधी करायचे नाहीत. त्यांनी शेवटच्या दिवसात हे सांगून ठेवले होते.

मी रात्री पोहोचलो, फ्लाईटने, माझ्या मुंबईतल्या आते बहिणीबरोबर. दिल्लीतला भाऊ दुसऱ्या दिवशी आला. मुंबईचा भाऊ देखील गेल्या पावली परत आला. ओंकारेश्वरला नर्मदेत अस्थी विसर्जन केले. घरी अंगणात शांती सभा ठेवली.

(क्रमशः)

लेखन श्रीधर जहागिरदार

दिनांक २१ जानेवारी २०२६

#सूरपाखरू ३०दिवसात३० #प्रवास२०२६