आपले संगोपन करून आपल्याला जीवन वाटांवर चालण्या योग्य करणाऱ्या आपल्या आईवडिलांप्रती आपली काही कर्तव्ये पार पाडून एक प्रकारे आपण ऋणमुक्त व्हावे असा एक धार्मिक/अध्यात्मिक संकेत आहे. अजून तरी बहुसंख्य अपत्ये तो पाळत असल्याचे दिसते. धर्मात जरी ही कर्तव्ये वडील मुलाने पार पाडावीत असे लिहिले असले तरी आता मुलीदेखील हे कर्तव्य पाळताना दिसतात. या कर्तव्यात, वृद्धापकाळी त्यांना सांभाळणे, त्यांना ते परावलंबी आहेत असे जाणवू न देणे, त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहून किंवा सांगून ठेवल्या प्रमाणे त्यांच्यावर असलेल्या ऋणांची फेड करणे येतात. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिव शरीरावर शेवटचे संस्कार करणे हे देखील कर्तव्य असते. हल्ली देह दान, अवयव दान करण्याची ईच्छा बऱ्याच व्यक्ती करतात. मला वाटते समाजाची भीड न ठेवता त्यांच्या अपत्यांनी त्या इच्छेचा मन ठेवायला हवा.
माझे वडील, त्यांना आम्ही दादा म्हणत असू, आणि आई आता हयात नाहीत. मी स्वतः आता वयाच्या अमृतकालात असल्याने या बाबींचा सारखा विचार सुरू असतो.
*
दादा आणि आई विचारांनी प्रगतिशील. त्यांनी प्रेम विवाह केला. नोंदणी पद्धतीने. आम्ही चार भावंडं. तीन भाऊ एक बहीण. वडिलांनी माझ्या जन्मानंतर सरकारी नोकरी सोडून वकिली सुरु केली. त्यांच्या आर्थिक स्थितीची जाणीव देत त्यांनी आमच्या मनाप्रमाणे आमचे शिक्षण पूर्ण केले. नोकरी व्यवसायासाठी आम्ही तिन्ही भावांनी जन्म गाव इंदौर सोडलं आणि तीन दिशांना उडून गेलो. बहीण? तिने विशेष मुलांना शिकवण्याचा वसा घेतला आणि इंदौरलाच राहिली.
आम्हा भावांचे संसार सुरु झाले,जबाबदाऱ्या आल्या. वडील वकिलीत अधिक व्यस्त राहू लागले. आमचे इंदूरचे घर भाड्याचे. १९५३ सालच्या सुमारास घेतलेले. दुसऱ्या मजल्यावर सहा खोल्या आणि बाथरूम. संडास खाली उतरून मागच्या भागात. तिथल्या गैरसोयी वाढतच राहिल्या. शहराची लोकसंख्या वाढली तास पाण्याचा त्रास सुरु झाला.. कुणास ठाऊक कां वडिलांनी भाड्याने दुसरे घर घेण्याचे किंवा स्वतःचे घर बांधण्याचे कधी मनावर घेतले नाही. मात्र आम्ही आपापली घरे विकत घेतली त्यावेळी ती घरे बघायला आणि कौतुक करायला येऊन गेले. त्यांना खूप वेळा वकिली सोडा आणि आमच्या बरोबर राहायला या असा सल्ला देऊन झाले. पण त्यांनी हा सल्ला कधीच मानला नाही. त्यांनी आयुष्यभर स्वाभिमान बाळगला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांनी त्यांचे शिक्षण बारके सारके व्यवसाय करून आणि चुलत भावाच्या मदतीने पूर्ण केले होते. लग्न जातीबाहेर केले होते. साऱ्या नातेवाईकांशी संबंध चांगले होते. आपल्या आईला त्यांनी कधी आपल्यापासून दूर केले नाही. तिचा फोटो त्यांच्या ऑफिसात त्यांच्या खुर्ची समोर भिंतीवर लावून ठेवला होता. दादा स्वतःबद्दल फार बोलायचे नाहीत.
आमच्या आईचे माहेर आमच्या घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर होते. ते घर आजोबांचे, त्यांनी त्यांच्या आराखड्यानुसार दोन मजले बांधून घेतलेले. काही छोटी मोठी कामे करायची राहून गेलेली. दोन बाल्कन्या होत्या त्यांना सुरक्षा कठडे नव्हते. हे घर त्यांनी खूप नंतर बांधले. आधी ते दूरच्या नातेवाईकांकडे रहात होते. आईचे बालपण देखील त्याच घरात गेले. जुना काळ. सर्वांनी गोडीगुलाबीने राहायचे. त्या घरातली सर्व मुले आमची मामा-मावशी. आजही ते संबंध टिकून आहेत. आई सर्वात मोठी. तिच्या पाठचे चार भाऊ. आई कलाकार होती. चित्रे, रांगोळ्या, किल्ले, मातीचे गणपती बनवत असे. मुकुंदाने तिचे हे गुण अंगिकारले. ती गाणे शिकली होती. सुंदर आवाज. साहित्य सभेत वगैरे गात असे. मी लहान असतानाच तिच्या या कला हळू हळू लोप पावल्या. काय कारण असावे? तीनेही कधी सांगितले नाही. आईची आई गेल्यावर,त्या सर्व भावंडांनी त्या घराला पाडून तिथे चार मजली इमारत बांधायचे एका बिल्डर बरोबर ऍग्रीमेन्ट केले. इमारतीतले पाच फ्लॅट ह्या पाच भावंडांचे, उरलेले तो विकणार. दादांना हा सौदा आवडला नव्हता. त्यांच्या व्यवसायात त्यांनी हे असे सौदे आतबट्ट्याचे होतात हे पाहिले होते. आई त्या मोडकळीला आलेल्या भाड्याच्या घराला कंटाळली होती. इतर शेजाऱ्यांच्या मुलांनी आपापली घरे इतरत्र बांधून मुक्काम हलवला होता. मुलं आपापल्या शहरात, आपापल्या मालकीच्या घरात. आपण ही एक दिवस आपल्या हक्काच्या घरात, भावंडांमध्ये जावे अशी तिची ईच्छा असावी. ती बिल्डिंग रखडत रखडत एकदाची तयार झाली. मामा सारे तिथे राहायला आले. मग एक दिवस आईने बहिणीच्या मदतीने आणि माझ्या एका मित्राला हाताशी घेऊन मुक्काम हलवला, सारेच मग ‘सार्थक’ मध्ये राहायला गेले.
दादा एव्हाना थकले होते. ऐंशीं वर्षाचे वय झाले होते. व्यवसाय आवरता घ्यायला सुरुवात केली होती. जुने अशील सोडत नव्हते. दादा मोडी शिकले होते. होळकर कालीन जुने दस्तावेज लिप्यांतरासाठी त्यांच्या कडे येत. ते पूर्वी सायकलवरून कोर्टात जात. आता पायी जाऊ लागले होते. कोर्ट फार लांब नव्हते. कार घेण्याचे त्यांनी स्वप्न देखील पाहिले नसेल. त्यांची होती नव्हती स्वप्ने ते मुलांच्या स्वप्नपूर्तीत पाहत होते का? त्यांनी आम्ही देऊ केलेले पैसे कधी घेतले नाहीत. तुमच्या आईजवळ द्या म्हणत. नव्या घरात ते रुळले होते का ? हा प्रश्न मला विचारताही आला नाही. आई मात्र समाधानात होती. भावंडे नियमितपणे भेटत होती. जुन्या आठवणीत रमत असावीत सर्व भावंडे. आम्हा भावंडांचा कधी मधी चक्कर लागत होता. बहीण तिला जमेल तशी दोघांची काळजी घेत होती. उल्हास, माझा सख्खा मित्र भेटून यायचा. आई त्याला हक्काने काही कामे फोन करून सांगायची.
२००५च्या उन्हाळ्यात दादा कोर्टातच चक्कर येऊन पडले. कुणाच्या तरी मदतीने घरी आले. मग मात्र त्यांनी अंथरूण धरलं.
(क्रमशः)
लेखन : श्रीधर जहागिरदार
दिनांक २० जानेवारी २०२६
#सूरपाखरू ३०दिवसात३० #प्रवास२०२६