एक होता चिमणा. बसला होता केविलवाणा.
चिमणी होती रुसली. लांब उडून बसली.
काय होता तंटा?
चिमणी म्हणे उडून जाऊ, चिमणा म्हणे इथेच राहू.
कुणकुण लागता तंट्याची, आला एक कोंबडा, नाव त्याचे चोंबडा.
विचारू लागला चिमण्याला …
: गावातले बारकेसारके पक्षी कमी होत आहेत. आपले ह्यावर मत काय ?
: कुंपणावर बसलेल्या चिमण्याला कसले आहे मत ?
: कां ? सांगा की … आपल्याला विचार स्वातंत्र्य आहे. विहार स्वातंत्र्य आहे.
: विहार स्वातंत्र्य? विहार स्वातंत्र्य असते तर, दाणा आणायला कुठेही जाता आले असते. जिवंत राहता आले असते.
: कुणी अडवले तुम्हाला? एल ओ सी काश्मीर ते कन्याकुमारी आणि इटानगर ते भूज पर्यंत विहार करायचा तुम्हाला संवैधानिक अधिकार आहे. विचारा २६ नोव्हेंबरला …
: तुम्ही कुठल्या झाडाचे हो पाहुणे?
:कां?
:परवा काय झालं ते सांगितलं नाही तुम्हाला वाऱ्याने?
:काय?
:सगळे पारवे लावले की उडवून …
:कुणी?
:शशश
:कुठे गेले सगळे गुटर्रर्रगू?
:गेले उडत..जिथे आयते दाणापाणी मिळत असेल तिथे गेले असतील.
:तुम्हाला नाही ना कुणी उडवत?
:करतात प्रयत्न कधी कधी…
:कोण?
:मला कावकावता येत नाही मग कावळे हाकलतात,
पोपटपंची येत नाही म्हणून पोपट उडवून लावतात,
ताटाखाली जाता येत नाही म्हणून मांजरी झडप घालतात …
कुठल्या कुठल्या गावाची कहाणी सांगू?
: बरं, पण मग आहात तिथून आपलं मत सांगा
: बाबा, आहोत तिथून आणखी कठीण, कारण कुंपणावर बसून फ़ुदकत असतो
त्यामुळे तोंड कधी ह्यांच्या कडे तर कधी त्यांच्या कडे त्यामुळे दोघांना सांभाळून असतो.
मत मांडायचे तर तोंड उघडावे लागणार. आणि मग हे तरी ‘कावकाव’ करत टोचून खाणार
नाहीतर ते तरी चित्कारत सोलून काढणार.
सध्या ‘द्रोही’ घोषित करायला दोन्हीकडचे टपून बसलेत.
त्यातून आम्ही ‘चिमणे’ आधीचअल्पसंख्य होत चाललोत.
तेंव्हा बसूदे आम्हाला चिमणी सारखे तोंड करून
सर्वकालिक विस्थापितासारखे !! चिडीचूप!!! …
तेव्हड्यात म्हातारीचे पोरगे आले टोपले घेऊन, धावले कोंबड्यामागे … ए चोंबड्या बोंबलत … कोंबडं धावतंय … पकपक पकाक
चिमणा चिमणी जवळ आले, … उडाले… फांदीवरच्या पानांमागे सुखरूप विसावले.
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक १७ जानेवारी २०२६