सेवा क्षेत्र: उत्कृष्ट सेवा अनुभव २

सेवा क्षेत्रात, सेवा देणाऱ्या व्यक्तिचे महत्व तर आहेच, पण सेवा देणाऱ्या एकूण व्यवस्थेचे, तिच्या मांडणीचेही आहे. सेवा देणाऱ्या संपूर्ण साखळीतील एक कडी जरी कमजोर असली तर … अपघात ठरलेला! मग सेवाभाव भक्त एक घोषणा होते, आचरण नाही.

​आणीबाणीच्या वेळी संपुर्ण व्यवस्था कशी सेवा-तत्पर होते हा अनुभव आला सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवासात.

​मी फिलिपिन्सला निघालो होतो, मनिलाला. मुंबईहून सिंगापूरला गेलो, तिथून मनिलाची फ्लाईट पकडायची होती. ती पकडली, विमानाने आकाशात भरारी घेतली. साधारणपणे दोन अडीच तासाचा प्रवास होता, पण पाऊण तासानंतर वैमानिकानं सूचना दिली की विमानात थोडासा तांत्रिक बिघाड जाणवला आहे आणि त्यामुळे आपल्याला विमान परत सिंगापूरला न्यावं लागेल.

​मी म्हटलं देवा! आता काय होणार, कसं होणार, या चिंतेत होतो. थोड्याच वेळानंतर वैमानिकानं सूचना दिली की तुम्ही उतरल्यावर तुम्हाला तुमच्या पुढच्या विमानाची वेळ, बोर्डिंग डोअर, या सगळ्याची माहिती मिळेल, तुम्ही त्याबाबत काळजी करू नका. घाबरू नका.

तासाभरानंतर आम्ही सिंगापूरच्या एअरपोर्टवर उतरलो. गेटपाशीच बाहेर निघाल्यानंतर सिंगापूर एअरलाईन्सच्या ज्या कर्मचारी असतात त्या प्रत्येक प्रवाश्याच्या हातात एक लिफाफा देत होत्या आणि एक बॉक्स. सारे काम शिस्तबद्ध. शांतपणे. कळेना तो कसला लिफाफा आहे , बाॅकस मधे काय आहे? त्याच वेळी दुसऱ्या कर्मचारी महिलेने सांगितलं या शेजारच्याच खोलीमध्ये तुमच्यासाठी नाश्त्याची, चहापानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मनिलामध्ये तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना तुम्हाला या उशिराबद्दल माहिती द्यायची असेल तर तुम्ही आमचा फोन वापरून त्यांना तशी सूचना देऊ शकता आणि तुमच्या पुढच्या फ्लाईटचा बोर्डिंग पास तुम्हाला थोड्याच वेळात देण्यात येईल.

​बाहेर निघालो लिफाफा उघडून बघितला तर त्यात सिंगापूर एअरलाईन्सकडून झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणारं एक पत्र होतं आणि त्या बॉक्समध्ये एक लेदर वॉलेट होतं आणि पत्रात हे ही लिहिलं होतं, या त्रासाचं कॉम्पेन्सेशन करण्यासाठी सिंगापूर एअरलाईन्सकडून तुम्हाला ही अल्पशी भेट देण्यात आलेली आहे.

​त्या दुसऱ्या खोलीत व्यवस्थित न्याहारीची व्यवस्था होती, सर्वांनी व्यवस्थित तो अल्पोपहार घेतला. ठरल्या गेटपाशी बोर्डिंग पास घेऊन उभे राहिलो आणि परत नव्या विमानात बसलो आणि पुढचा मनिलापर्यंतचा प्रवास फार सुकर झाला.

​भारतातील एअरलाईन्सची अवस्था बघता हा अनुभव स्वर्गातल्या अनुभवासारखा वाटला. कुठेही आरडाओरड नाही, काही नाही, काही नाही, त्या तेवढ्या नेमक्या वेळात एअरलाईन्सकडून दिलगिरीचं पत्र, एक भेट, खाण्यापिण्याची व्यवस्था आणि मनिलाला आपल्या नातेवाईकांना संपर्क करण्यासाठी फोनची व्यवस्था…

भारतीय एअरलाईन्समध्ये ही अशी सेवा मिळायला आणखीन किती वर्ष लागतील हे मला सांगता येत नाही.

​लेखक श्रीधर जहागिरदार

दिनांक १६ जानेवारी २०२६

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६

1 Like