माझं वाचन आता खूप कमी झालं आहे. त्यामुळे पुस्तकं विकत घेऊन वाचणं बंदच आहे. होती नव्हती ती पुस्तकं मी वाटून टाकली. मात्र तरीही एक पुस्तक मी विकत घेतलं. त्याबद्दल वर्तमानपत्रात वाचलं त्यानंतर.
“हे सांगायला हवं” लेखिका - मृदुला भाटकर, ग्रंथाली प्रकाशन,
प्रथमावृत्ती १५ मार्च २०२२ किंमत रु २००
लेखिकेबद्दल : मृदुला भाटकर या निवृत्त न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालय, २००९ ते २०१९. त्यांनी एकूण २६ वर्षे न्यायदानाचे काम केले. त्या आधी त्या मुंबईत सेशन जज्ज आणि त्या आधी कोल्हापुरात जिल्हा न्यायाधीश होत्या. त्यांनी न्यायदान केलेल्या खटल्यात जळगाव सेक्स स्कँडल आणि मुंबई बॉम्ब स्फोट खटला हे गाजलेले खटले. प्रस्तुत पुस्तकात न्यायदानाचे काम करताना येणारी आव्हाने, कधी व्यवस्थेकडून येणारे दबाव, निष्पक्ष राहण्यासाठी न्यायाधीशांना पाळावी लागणारी मर्यादा, सामाजिक जीवनात राखावी लागणारी अलिप्तता, तसेच वरील दोन्ही खटल्यात आलेली आणि पेललेली आव्हाने विस्तृत पणे वाचायला मिळतात.
पण "हे सांगायलाच हवं " असं लेखिका म्हणते ते म्हणजे … असा एक खटला जो त्यांना व्यक्तिगत आयुष्यात मानसिकरित्या लढावा लागला आपल्या पतीचा बचाव करताना, त्याच्या मागे दृढतेने उभी राहताना. न्यायाधीश असल्यामुळे त्यांना जाहीर बचाव करणे शक्य नव्हतं.
सुप्रसिद्ध अभिनेते कै रमेश भाटकर आणि मृदुला भाटकर यांचा प्रेमविवाह. दोघेही संसारात आनंदी होते, एकमेकांना करिअर बनवण्यात साथ देत होते. अशातच २००७ साली रमेश भाटकर आणि इतर दोघांवर एका तरुणीने बलात्काराची फिर्याद केली. हे पुस्तक एक मनमोकळं कथन आहे ह्या सात वर्षाच्या काळाचं. दोन भूमिका, न्यायाधीश आणि पत्नी, यातील मानसिक संघर्षाचं, न्यायाधीश आणि आई, या भूमिकांमधील तणावाचं. कुटुंबातील एकमेकांवरील विश्वासाच. त्याचवेळी न्यायव्यवस्थेवरील दृढ विश्वासाचं.
रमेश भाटकर यांची सत्र न्यायालयातून निर्दोष सुटका झाली. पण सरकारनं या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केलं. तिथेही २०१४ साली त्यांची निर्दोष म्हणून सुटका झाली.
रमेश भाटकर यांचे निधन झाल्यावर मृदुलजींचं एक वाक्य मनाला वेदना देतं : रमेशचं निधन दोनदा झालं, एकदा त्यांच्यावर हा आरोप झाला त्यावेळी नंतर २०१९ मध्ये कॅन्सरने. अशा गोष्टींचा मनावर प्रचंड ताण येतो. त्याची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. मृदुलाजींनी डॉक्टरला कन्सल्ट केल्यावर त्यांनी हेच निदान केले. हा ताण सैल करायचा, मन मोकळं करायला हवं. मग हे पुस्तक दीड महिन्यात लिहून झाले, आधी इंग्रजीत आणि नंतर मराठीत.
आपण सामान्यजन, वाचतो ऐकतो त्या फक्त बातम्या, पत्रकारांच्या नजरेतून लिहिल्या गेलेल्या, फिर्यादीच्या पाठीराख्यांनी पुरवलेल्या. कुणाच्या मागे कुठल्या भ्रष्ट,राजकीय शक्ती काम करत आहेत याचा मागमूस नसणारे आपण सामान्यजन. कुठल्या उद्देशाने आरोप होत आहेत हे ठाऊक नसलेले.
हे पुस्तक वाचावे, इतरांना वाचायला द्यावे. वाचायला वेळ नसेल तर त्यांची “आरपार” कार्यक्रमात आलेली मुलाखत खालील लिंकवर ऐकावी.
https://youtu.be/hL6l6Taz4QY?si=5sndSUSqeA8_4sTu
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक १३ जानेवारी २०२५