आयुष्यातल्या काही भेटी शेवटपर्यंत आपण विसरू शकत नाही. काही नाजूक असतात, सुगंधी असतात काही कायम दरवळत असतात.
अशीच एक कायम दरवळणारी भेट झाली १९७४ साली. तो काळ तसा माझ्या साठी खडतर होता. हातात पदव्युत्तर पदवी मिळायला विलंब झाला होता. नोकरी शोधात होतो. काही मी नाकारत होतो काही ठिकाणी मला नाकारले जात होते. अशा वेळेस मनाला टेकू देत होते ते माझे छंद. नाटक, वक्तृत्व, आणि कविता. इकडच्या तिकडच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत काही तरी करतोय असा आव आणत होतो. अर्थार्जनाच्या साठी शिकवण्या करत होतो. सोबत वाचन सुरु होते अनेक विषयांवर.
महाराष्ट्र साहित्यसभा, इंदूर ही अशी एक जागा होती जिथे नियमित काही ना काही कार्यक्रम असत.
शारदोत्सव हा तिथला वार्षिक मुख्य कार्यक्रम. विविध स्पर्धा महिनाभर आधीपासून सुरु होत. मी काव्यस्पर्धेत नियमितपणे भाग घेत असे. मुख्य कार्यक्रम तीन दिवसांचा असे. महाराष्ट्रातून नावाजलेली व्यक्ती अध्यक्ष म्हणून येत असे. एका वर्षी विद्याधर गोखले आले होते. त्या वर्षी एक एकांकिका सोडली तर माझे कुठेच नांव नव्हते.
१९७४ साली अध्यक्ष म्हणून मंगेश पाडगावकर येणार होते. ते माझे आवडते कवी. आकाशवाणी वरील त्यांची मराठी गाणी, मनोहर मासिकातून नियमित येणारे उदासबोध, जिप्सी, उत्सव, हे माझ्या संग्रहात असणारे संग्रह या मुळे मला कविता लिहिण्याला प्रेरणा मिळाली होती. त्यांना पहायला मिळेल हा माझ्यासाठी उत्सव होता. यंदा काव्यस्पर्धेत मी दोन कविता दिल्या होत्या, त्यातली एक ‘अनिकेत’ या टोपण नावाने.
पहिल्या दिवशी उदघाटन आणि अध्यक्षांचे भाषण. दुसऱ्या दिवशी सकाळी परिसंवाद आणि संध्याकाळी पाडगावकर सरांचे काव्यवाचन.
मला परिसंवादात सहभागी होण्याचे निमंत्रण होते. ‘मराठी साहित्यातील वाढती अश्लीलता’ हा विषय होता. . मी वयानुसार विद्रोही होतो. परिसंवादाचे अध्यक्ष पाडगावकर सर होते. इतर दिग्गज मंडळी होती. यात श्रीमती सुमित्रा ताई महाजन, वसुधा ढवळीकर काकू, ज्या मला गुरुस्थानी होत्या, देखील होत्या. मी भरपूर तयारी करून भाग घेतला. काही संत कवितांच्या साहित्यातले दाखले दिले. काही नाटकांचे उल्लेख केले. एकूण बरे झाले भाषण. संध्याकाळी काव्य वाचन ही म्हणजे मेजवानी होती. जवळ जवळ तासभर ऐकल्या कविता.
तिसऱ्या दिवशी विविध स्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण. काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक होता 'अनिकेत’चा! परीक्षक होते - पाडगावकर सर. मला आकाश ठेंगणे वाटू लागले.
ह्या शारदोत्सवाने माझ्यात एक नवी ऊर्जा भरली.
सर्वात जास्त आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा घराच्या टपाल पेटीत एके दिवशी माझ्या नावाचे त्यांनी पाठवलेले पत्र मिळाले. हे अगदीच अनपेक्षित होते. मोठ्या माणसांचे मन किती मोठे असते याचा प्रत्यय आला.
काही दिवसांनीच माझे मुंबईला जाणे झाले. माझा भाऊ,मुकुंद, मुंबईकर. तो विचारायला लागला “काय रे भेटणार का पाडगावकरांना?” मी म्हटले “नाही रे. ते कुठे मी कुठे, कशाला त्यांना त्रास?” तो म्हणाला “एक काम कर. फोन कर. विचार त्यांना, भेटायला कधी येऊ शकतो ?”
मी लावला त्यांना फोन बुथवरून. घाबरत घाबरत विचारले.
त्यांनी विचारले, " कुठे आहात ? "
" घाटकोपर"
" म्हणजे जवळच आहात. या आत्ता"
मी उडालोच. रात्रीचे साडेआठ झाले होते. " आता?’
" पत्ता आहे ना?"
" हो आहे." माझ्याजवळ त्यांचे पत्र होते.
मी पोहोचलो. त्यांनी चांगले स्वागत केले. मी संकोचत होतो.
कसे आलात? बाबा कसे आहेत ? त्यांनी चौकशी केली. साडे नऊ झाले होते..
" मी निघतो सर, घरी वाट पहात असतील"
" पुन्हा आलात मुंबईत कि या"
नमस्कार करून मी निघालो. समोर हॉटेलमध्ये भाऊ वाट पहात होता. “काय रे, कशी झाली भेट.”
मी म्हटले, " कल्पना नव्हती, इतके आतिथ्यशील असतील."
ह्या भेटीची सर दुसऱ्या कुणाच्या भेटीला नाही.
वाईट एकच वाटते, त्यांच्या आशिर्वादाचे मी सोने करू शकलो नाही. माझ्यातल्या साहित्य गुणांना वाढवू शकलो नाही.
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक ११ जानेवारी २०२६
सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक ११ जानेवारी २०२६
सुरपाखरू ३०दिवसात३० #प्रवास२०२६