बघणे आणि दिसणे - काय फरक?

बघणे आणि दिसणे

आता वर्षाच्या वर दिवस झाले होते. अंथरुणावर होतो. बाहेर जाणे म्हणजे कुठे तर हाॅस्पिटलला. वैतागलो होतो.

“असे किती दिवस काढायचे? दुसर्‍यांच्या आधाराने? आणि कशाला? झालोय आता मी मोकळा! सर्व जबाबदारीतून”

“सर, तुम्ही फार विचार करता. जरा विचारांवर नियंत्रण ठेवा”

“तूही समजाव मला. तूच तेवढा उरला होतास.” मी किंचित चिडून बोललो.:

“तसं नाही सर. मी लहान आहे. तुमच्या घरातला नाही. तुम्ही माझ्य समोर मन मोकळं करता, म्हणून बोललो.”

नरेंद्र हा माझ्या देखभाली साठी चोवीस तास ठेवलेला स्वास्थ्य सेवक. मी सध्या माझ्या मुलीकडे असतो, बायको बरोबर. त्यांची होत असलेली तडतड बघून मला त्रास होत असतो. खूप अपराधी वाटतं. खूप भावनाविवश होतो. अशा वेळी मी मन मोकळं करतो.
नरेंद्रशी बोलताना मी असच बोलून गेलो,

" अरे माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास होतोय. हे संपवायला हवं, तुही बघतोयस ना.. मुलाची शाळा, त्याला नेणं-आणणं, त्याचा बंडपणा सहन करत, त्याला न चिडता शिस्त लावणं, माझ्याबरोबर हॉस्पिटलला येणं, माझी औषध, माझे मूड सहन करणं…"

"बघतोयना, सगळं बघतोय " मला मधेच थांबवून नरेंद्र म्हणाला.

" मग असं कसं म्हणतोस? कसं ठेवू विचारांवर नियंत्रण?"

" सर, रागवू नका. मी तेच बघतोय जे तुम्ही बघताय. पण तुम्हाला जे दिसतय ते मला दिसत नाही. मला वेगळच दिसतं, जाणवतं."

“काय?”

" मला सांगा, तुमच्यामुळे त्रास होतोय असं कुणी बोललं तुम्हाला? ताई, आई, पाहुणे? … नाही ना? म्हणजे हा विचार तुमचा. त्यांचा नाही. आणि हा विचार तुम्ही मनात सारखा घोळवत रहाता"
मी बराच सावरलो. त्याला विचारले,
" मला सांग, तुला काय वेगळं दिसतं?"

" मला दिसते ती ताईंची माया, आईंच प्रेम, पाहुण्यांना वाटणारी तुमची काळजी, आणि तुम्ही लौकर बरे व्हावे, ही सर्वांची इच्छा आणि तशी खात्री "

माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले, हे कुणीही बघणारा सांगू शकला असता. मात्र माझे मन स्वच्छ झाले हे साऱ्यांना दिसलेच असेल असे नाही.

लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक ९ जानेवारी २०२६

सुरपाखरू #३०दिवस३०लेख #प्रवास२०२६