कहाँ चलोगे बाबू, कहाँ चलोगे लाला , मैं रिक्षावाला

आपल्या सहिष्णुतेची परीक्षा पहाण्यासाठी रिक्षावाल्याचा अवतार झालेला असावा असे मला नेहमीच वाटत असते. ह्यातले बरेचसे अवतारी तर no means no हे आत्मसन्मान दर्शक तत्व पाळताना दिसतात. अर्थात अशाच वेळी एखादा दुसरा वेगळ्या (विचार) धारेचा गडी " या काका, बसा . कुठे सोडू तुम्हाला ? " असे आग्रही निमंत्रण देताना आढळतो आणि मी अपवाद आणि नियम ह्यातील वैश्विक सत्य पुनर्प्रत्ययाला आल्याचा आनंद साजरा करत “अजून माणुसकी तेवढी काही नासकी झाली नाही” असे स्वतः:ला बजावत त्याच्या वाहनात विराजमान होतो. बहुतेक वेळा हे सेवाभावी रिक्षावाले स्वतः:च्या जीवनपटातील काही मार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक आणि अपवादाने राजनैतिक अनुभव उत्साहाने तुमच्या बरोबर शेअर करतात.

प्रत्येक गावातल्या रिक्षावाल्यांची एक संस्कृती असते. या संस्कृतीचे पहिले दर्शन गावातल्या रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॅन्ड इथे होते. गावात येणारा माणूस आपले देणे लागत असल्या सारखे ते भाडे सांगतात. तीस वर्षांपूर्वी चेन्नई रेल्वे स्टेशनहुन वेस्ट मांम्बलम चे भाडे ते बिन्धास १०० रुपये मागत. मी अनेक वेळा अशा रिक्षावाल्याला अय्यप्पा मानून वाकून नमस्कार केलाय, मात्र त्याने दर वेळी मी पाखंडी असल्यासारखा तुच्छ भावच दाखवला. प्रत्येक मेट्रो शहरातून रिक्षाला मीटर फार पूर्वीपासून असायचे. मात्र प्रत्येक मीटर सोवळ्यात असल्यासारखे “please do not touch” असे भेद ठेवणारे. चेन्नईत एकदा एका रिक्षा वाल्याशी वैचारिक चर्चा केली , म्हटले " I pay by meter" तर तो म्हणाला " No meter". मी म्हटले " government गिविंग meter, then why no meter?" त्याचे उत्तर मजेदार होते " मीटर गव्हर्नमेंटका, ऑटो मेरा " !!!

रिक्षावाले सहसा परंपरावादी असतात म्हणजे दिशा परिवर्तनास तयार नसतात. त्यांच्या वाहनाचे तोंड ज्या दिशेला असेल ते त्याच दिशेची ‘सवारी’ घेणार. उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये ऐंशीच्या दशकात ऑटो रिक्षा नसत, सायकल रिक्षा असत. अलाहाबाद- म्हणजे प्रयागराज - शहरातला सायकल रिक्षावाला स्वस्थ पणे गमछा तोंडावर घेऊन आपल्या रिक्षात पहुडलेला असला आणि त्याला विचारले " चलोगे ?" तर तो गमछा दूर करून विचारणार " हाँ हाँ … किधर?" … “दारागंज” तर लगेच हाताचा उपयोग करून नकार देणार आणि पुन्हा गमछा तोंडावर घेणार, कारण ह्याच्या रिक्षाचं तोंड मीरापूर च्या दिशेला. साधारण असाच अनुभव लखनऊ, मुजफ्फरनगर ह्या गांवात आलेला. लखीमपूर हे गांव तसे लहान, माझी स्कुटर सुद्धा मी कधी काढत नसे. माझ्या मोठ्या मुलीचा शैक्षणिक प्रवास ह्याच गांवात सुरु झाला, डॉन बास्को शाळा तशी गांवाबाहेर, त्यामुळे ती सायकल रिक्षाने जात येत असे. शाळेत जाणं सुरु होण्यापूर्वी मी तिला कधीतरी सायकल रिक्षातून फिरवून आणत असे, एका रुपयात गांवाला फेरी मारून होई.

माझ्या जन्मगांवच्या - इंदौरच्या - रिक्षावाल्यांची तर मला एक प्रकारची भीतीच वाटायची. कारण त्यांचं बोलणं अरेरावीचं, मीटर हे रिक्षाचं आभूषण म्हणून लावलेलं. कितना लोगे ह्या प्रश्नाच उत्तर मनात येईल तो आकडा. एकदा छावणी चौराह्याहून स्नेहलतागंजात यायला रिक्षावाल्याने चक्क १०० रुपये मागितले. मी रिक्षाला हात लावून नमस्कार केला.त्याच्या पाया पडलो, तो जरा भांबावला, त्याला १० रुपये देऊ केले … “अरे दादा, ये क्या कर रहे हैं आप ?” विचारू लागला. आसपास गप्पा मारत असलेल्या इतर रिक्षावाल्यांना ही गंमत होती, ते गोळा झाले. मी म्हटलं " भियाजी, आपका रिक्षा इस्पेशल लगता है, इसीलिये आप इतना चार्ज लगा रहे हैं, इसीलिये छू कर देखा और ऊसे छूने के दस रुपये आपको दे रहा हूं" तर म्हणू लागला अच्छा साब ८० रुपये दे दीजिए" . मी म्हणालो " शुक्रिया, मौसम सुहाना है, आपने मुझे चलने के लिए प्रेरणा दी. आपने मेरी आँखे खोल दी" आणि मी चालू लागलो. ही अशी नौटंकी मी अधून मधून अजूनही करत असतो.

हे असे अनुभव गाठीशी असताना कुणी परगावचा पाहुणा मुबंईत आला कि इथल्या रिक्षावाल्यांबद्दल भरभरून बोलतो. दोन गोष्टी त्यांना भावतात. एक इथले रिक्षावाले मीटर प्रमाणे पैसे घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आवर्जून रुपया - दोन रुपये परत करतात. आणि या बद्दल तक्रार नाहीच. मात्र परगावाहून येणाऱ्या गाड्या थांबतात त्या स्टेशन वर तुमच्या स्वागताला पुढे सरसावणारा ऑटोवाला खरंतर वेगळ्याच जमातीचा असतो, आपला बकरा हेरून प्रेमाने खिशावर सुरी फिरवणारा. तसेच तुम्ही कुठल्या ठिकाणाहून रिक्षा पकडत आहात त्यावरूनही. माझा एक मित्र इंदौरहून आला होता. अमेरिकेचा व्हिसा इंटरव्ह्यू साठी. त्याला सांगितले रिक्षा पकड आणि जा. शंभर रुपयात काम होईल. तो गेला.

काम झाल्यावर परतला. म्हणाला "यार श्री, मला वाटायचं मुंबईत रिक्षावाले प्रामाणीक असतात. "

“हो, जाताना त्याने मीटर पेक्षा जास्त घेतले का?” मी विचारले.

“नाही, नाही, जाताना तर मीटर प्रमाणेच पैसे घेतले. पण येताना एम्बसी बाहेर रिक्षावाले तीनशे पेक्षा कमीत यायला. तयारच नव्हते यार.”

“दिलेस तू तीनशे ?” मला वाईट वाटले.

तर तो उत्तरला " कसे देईन ? जाताना फक्त ११७ दिले होते मीटर प्रमाणे. मी चालायला लागलो. मागून एक रिक्षा आली, मला विचारले, किधर जायेंगे? मी म्हटलं जुहू स्कीम. तर म्हणे बैठो. मी घाबरलो यार. तो तो होता.. "

मला कळेना, तर सांगू लागला " तो तो टोपीवाला, दाढीवाला होता. मनात विचार आला हा तर नक्की आपल्याला लुटणार."

“बरं मग?”

" अरे, तो म्हणाला, मैं उस तरफ नहीं जा रहा. आपको आगे दुसरी रिक्षा में बिठा दूंगा. त्याने कोपऱ्यावर एक रिक्षा होती, त्याला सांगितले, साहेब को जुहू स्किम छोड देना. जाईये साहेब." मला हसू आले. म्हटलं "मग, कसा वाटला हा अनुभव “त्यांचा” …

जून महिन्यात आलेला नवसारी गावातील रिक्षाचा एक असाच अनुभव. मित्राच्या मुलाच्या लग्नाला म्हणून मी नवसारीला गेलो होतो. मित्र खूप जुना, IOB च्या दिवसातला. सेम बॅचचा. लुधियानात आम्ही सहा महिने एकाच हॉटेलातल्या खोलीत बरोबर राहिलेलो. त्याचं इंदौरला पोस्टिंग असतानाच माझं लग्न झालेलं, त्याला तो उपस्थित होता. म्हटलं ३ तासांचा प्रवास आहे जाऊन येऊ. नवसारी स्टेशनला साधारण ११ वाजता पोहोचलो. स्टेशन वरचे रिक्षावाले आणि घाटावरचे पंडे एकाच कुळातले असावे. “आता कुठे जाशी बाळंभट्टा " असं स्तोत्र म्हणत पैसे मागणार. हॉटेलचं नांव सांगितल्यावर MRP Rs 50/- special discount Rs 10 असा सर्वांचा सूर . उन्हाचा तडाखा होता म्हणून मान्य करून निघालो. अंतर साधारण २ किलोमीटर. दुसऱ्या दिवशी जूनाथाना मधील हॉटेल ते तिघ्रा रोड इथल्या कार्यालय पर्यंत रिक्षावाल्याने ३० रुपये मागितले. मग लक्षात आले कि काल आपण जास्तच पैसे दिले. लग्न आणि भोजन उरकून साडे चार वाजता इंटरसिटी धरायची होती.म्हणून सव्वा तीन वाजता निघालो. कार्यालय मेन रोड पासून आत, उन्हाचे दिवस, रस्त्यावर तुरळक माणसे,रिक्षा मिळणार कि नाही अशी धास्ती वाटत होती. सुदैवाने एक रिक्षा मिळाली. स्टेशनला यायला तयार झाला, किती पैसे घेणार विचारले तर मला “२०” ऐकू आले. आश्चर्य वाटलं आणि असही वाटलं कि आपण चूक ऐकलं असणार. तो तीस म्हणाला असणार. इथे रिक्षाला मीटर नाहीत, साधारण शेअर रिक्षा असतात, त्यामुळे ३० हा स्टॅंडर्ड रेट वाटला. त्याने घेतलेली वाट लांबची वाटली , कदाचित कुणी सवारी मिळेल म्हणून असेल. स्टेशनला उतरलो, त्याला ३० रुपये दिले, तर म्हणे “सर २० रुपया ..” मी म्हटलं रखलो भाई, मेरी तरफसे. ऐसी इमानदारी कम दिखाई देती है.” तर तोच मला म्हणाला " अंकल, सब यहीं छोड कर जाना है. बेईमानी से क्या कमाना !!"

तो एरवी इतरांसारखाच वागत असणार असा अनुभवाला न आलेला विचार मी मनातून काढून टाकला. त्या क्षणी एक चांगला अनुभव आला, मन निर्मळ झाले. परतीचा प्रवास आनंदाने व्हायला हवा. मी स्टेशन कडे चालू लागलो, रेल्वे पुलावर नेणाऱ्या लिफ्टने पुलावर पोहोचलो . ..

लेखक : श्रीधर जहागिरदार

दिनांक ८ जानेवारी २०२६

सुरपाखरू #३०दिवस३०लेख #प्रवास२०२६