एच आय व्ही सोबत जगणे-एक अनुभव
भाग २
मास्टर क्लास - प्रशिक्षिकांचे प्रशिक्षण
कंपनीच्या गरजेनुसार ज्यावेळी नवीन प्रशिक्षण रचले जाते जे कंपनीतील इतर प्रशिक्षक राबवणार असतात, तेंव्हा साऱ्या प्रशिक्षकांसाठी एक मास्टर क्लास भरवला जातो. नवीन प्रशिक्षणाचे उद्देश, गरज,रचना, प्रत्येक ऍक्टिव्हिटी कशी सुरु करायची हे शिकवले जाते. प्रशिक्षक आता सहभागी होतात.
ओबेराय हॉटेल मध्ये हा मास्टर क्लास घेतला गेला कारण मास्टर प्रशिक्षक परदेशातून आले होते. त्यांच्या शिवाय एचआयव्ही विषयाच्या तज्ञ, मुंबईतील एक डॉक्टर देखील हजर होत्या. दुसऱ्या दिवशी आम्ही लोकांनी दोघादोघांनी मिळून एकेक सत्र शिकवण्याचे काम केले. त्यावर प्रतिक्रिया, सुधारणा अशी कमी झाली. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. मला विषयाबद्दलच्या माझ्याच धारणा बदलाव्या लागल्या.
-
एक ऍक्टिव्हिटी होती ज्यात काही लोकांचे फोटो दिले गेले. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील. साऊथ आफ्रिकेतील. कोण बाधित असतील ते ओळखायचे होते. काही बरोबर ओळखले, काही नाही. एक व्यक्ती जीचा फोटो अबाधित म्हणून निवडलेला तो बाधित होता, सुप्रीम कोर्टातील जज!
-
एचआयव्ही होऊ नाही म्हणून काय करायला करायला हवे? त्यासाठी करायच्या गोष्टींची एक यादी होती. अति आवश्यक, बऱ्यापैकी आवश्यक असे. अति आवश्यक मध्ये उत्तर दिले नो सेक्स. ब्रह्मचर्य. हे सर्वांना शक्य आहे का? असा थेट प्रश्न आला मास्टर ट्रेनर कडून. मग दीर्घकाळ घरापासून लांब असणाऱ्यांनी काय करायचे? अर्थातच हा खूप वादग्रस्त प्रश्न होता. पण प्रिव्हेंशन हा शब्द ऐकल्यावर खसखस पिकली. एके काळी एचआयव्ही चे वाहक म्हणून भारतात ट्रक ड्रायव्हर्सची सुद्धा गणना होती.
-
संरक्षण म्हणून कंडोमचा वापर. मला त्या कार्यक्रमात पहिल्यांदा कळले की स्त्रियांसाठी देखील कंडोम उपलब्ध आहेत. फसक्लास दाभाडे! हा अलीकडचा मराठी चित्रपट पाहताना मला आठवले, की या प्रशिक्षणात पुरुषांचे कंडोम व्यवस्थित चढवण्याचे डेमो असायचे. अर्थात या साठी एक लाकडी मॉडेल वापरले जात असे. आम्ही स्टाफसाठी हा कार्यक्रम राबवायला सुरुवात केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, स्त्री कर्मचारी खुलेपणाने डीस्कशन मध्ये सहभागी होतहोत्या. कंडोम डेमो मध्ये देखील.
कार्यक्रमात एक गेस्ट होती. तिशीतली स्त्री आणि तिचा सहा वर्षांचा लहान मुलगा. ती दोघे पॉसिटीव्ह होते. त्याचा समवेत लंच घेणे हा देखील 'अनुभव ’ होता. वेगळ्या प्रकारच्या धाडसाचा.
मी स्वतंत्रपणे वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली, तेंव्हा सुरुवातीलाच एक प्रयोग करायचो. पार्टीसिपंटस U शेप मध्ये बसायचे. (मला ही व्यवस्था जास्त आवडते.) टेबल नसत. मी फिरत फिरत गप्पा करत, एका नंतर एक उपस्थितांशी ओळख घेत फिरत होतो आणि अचानक म्हणालो " व्हॉट इफ आय टेल यु द्याट आय एम एचआयव्ही पॉसिटीव्ह?" असे म्हणत मी शेकहॅण्ड साठी माझा हात पुढे करत एका समोर उभा राहिलो. त्याने क्षणात पुढे केलेला हात मागे घेतला… मी म्हटले “छूने से ये बीमारी नही होती, सिर्फ प्यार बढता है” …
लंच नंतर आम्ही तीन तीन च्या गटात तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाची रंगीत तालीम करायला गेलो. आमचा गट समुद्र किनारी टॅक्सी स्टॅन्ड जवळ फुटपाथवर पोहोचला. तिथे सामान मांडून तयारी करायला लागलो. बघता बघता अवती भवती पसंत माणसे कुतूहल म्हणून गोळा झाली. आम्ही फिल्मी स्टाईल मध्ये “आईये आईये, कुछ गपशप हो जाये.” म्हणून सुरुवात केली. आप कहाँ से है, गांव कब जाते हैं … रात कहाँ जाते हैं … हं बस आपको बताने आये हैं कुछ नुसखे समझदारीके. सगळ्यात शेवटी सांगितले अगर आप अधिक जानकारी चाहते है, टेस्ट करवाना चाहते है, इस नंबर को फोन करे. आश्चर्य वाटलं जेंव्हा पाच लोकांनी सेंटरचा नंबर मागून घेतला. शेवटी माझा एक सहकारी म्हणाला, एक बात याद रहे - दुर्घटना से सावधानी अच्छी !!!
एका चांगल्या क्लब ने आपल्या सदस्यांसाठी रक्तदान शिबीर ठेवले होते. एक रक्तदानाचा नमुना एचआयव्ही पॉसिटीव्ह होता. काय केले त्याचे या प्रश्नाला उत्तर मिळाले फेकून दिले. त्या सदस्याला कळवला रिपोर्ट? नाही !!!
बँकेने अनेक स्वयंसेवकांची टीम उभी करून, कॉलेज, हॉटेल स्टाफ अशा ठिकाणी शेकड्याने अशी वर्कशॉप केली. वर्षांनंतर आणखी एक आठवले. बँकेच्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मी वर्कशॉप केले त्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याने ज्याने या कामाला वेस्ट ऑफ टाइम म्हटले त्याने म्हटले, वेल डन !!
As per the recent India HIV Estimations 2023 report, over 2.5 million people are living with HIV in India, but thanks to concerted efforts, the adult HIV prevalence is at 0.2 % and estimated annual new HIV infections are at around 66,400.
लेखक : श्रीधर जहागिरदार
दिनांक ७ जानेवारी २०२६
सुरपाखरू #३०दिवस३०लेख प्रयोग२०२६