२००१ सालची गोष्ट. टेबलावरचा इंटरकॉम वाजला. बॉसचा फोन. नुकतंच दोन बँकांचे विलीनीकरण पूर्ण झाले होते. माझी नोकरी बचावली होती. तसेही ट्रैनिंग विभागात यायला कुणी उत्सुक नसते. मला दुसऱ्या कुठल्या रोल मध्ये रस नव्हता. बदललं काय होतं तर बॉस. नवी बॉस आली होती. ती विलीन झालेल्या बॅंकेतली. अजून स्थिर स्थावर झालं नव्हतं सगळं. त्यामुळे आम्ही एकमेकांना सांभाळून घेत होतो. गेलो. “कम श्रीधर.” बॉस म्हणाली. माझा सहकारी एड्रियन आधीच येऊन बसला होता. त्याच्या हातात काही कागद होते. “शो हीम” बॉस म्हणाली. एड्रिअन ने माझ्या हातात कागद दिले . त्याच्या चेहऱ्यावर मिस्कील हसू होते.
पत्र वाचलं आणि मी कपाळाला हात लावला. मॅडम आणि एड्रिअन दोघेही हसायला लागले. एड्रियन म्हणाला, “श्रीधर, भूल जाओ बेसिक बँकिंग. अब दुनिया को बचाने के वास्ते एचआयव्ही के साथ जीना सिखावो.” यावर बॉस म्हणाली त्याचा थोडक्यात सारांश हा होता की बँकेनं जिथे जिथे शाखा होत्या तिथल्या वरपासून खालपर्यंतच्या स्टाफ साठी, अगदी CEO पासून चहावाल्यापर्यंत, एक ९० मिनिटांचं सत्र डिझाईन केले आहे ते राबवायचं. नाही म्हणायची सोय नाही. या साठी एक विशेष चमू तयार करायचा, ते देशभरातील शाखांमध्ये हा कार्यक्रम राबवतील. या चमू साठी एक दोन दिवसांचा “दिशा निर्धारण” कार्यक्रम होईल. यात श्रीलंका,नेपाळ,आणि बांगलादेश येथून दोन-दोन स्वयंसेवक उपस्थित होतील. हा कार्यक्रम ओबेराय हॉटेल मध्ये होणार होता. (चला तेवढेच पंच तारांकित जेवण ओरपायला मिळेल.) हे ९० मिनिटांचे सत्र संप्रेषित कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक मिळेल. शंकांचे निरसन होईल.
आमचे ट्रेनिंग कॅलेंडर तयार होते. त्यात हे कसे बसवायचे असे मी विचारले तर त्या म्हणाल्या प्रत्येक ट्रेनिंगच्या शेवटी हे सत्र घ्यायचे.
तयारीला लागलो. कारण संपूर्ण प्रकल्प एका निर्धारित अवधीत पूर्ण करायचा होता. मुंबई बाहेरील शाखांमध्ये हा कार्यक्रम आम्ही नियमित प्रशिक्षण करायचो त्यांना जोडून करायचा होता. त्यामुळे अधिकचा खर्च वाचणार होता. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी लागणारे ट्रेनिंग किट प्रत्येक प्रशिक्षकाला मिळणार होते. मी वरिष्ठ प्रशिक्षक असल्याने मला प्रकल्प प्रबंधनाचे नेतृत्व मिळाले. आणि अर्थातच शिक्षण देखील.
सर्वात आधी मी आमच्या बँकेने असा कार्यक्रम हातात घेण्यामागची पृष्ठभूमी समजून घ्यायला लागलो. ते एवढ्यासाठी आवश्यक होते की जोपर्यंत मी स्वतः उद्देश समजून घेत नाही तो पर्यंत मी कार्यक्रमात हजर असलेल्यांना "हा वेळेचा अपव्यय नाही " हे कसे सांगू शकीन? कुठल्याही प्रकारचे शिक्षण देणे म्हणजे पाट्या टाकणे नाही. हे मी शिक्षक / प्रशिक्षक होतानाच मनात ठसवुन होतो. मुळात अनेक अधिकाऱ्यांच्या मनात कुठलेही ट्रेनिंग म्हणजे वेळेचा अपव्यय. विशेषत: सेल्स वाल्यांच्या. अमुक एक काम कां करायचं हा एक मूलभूत प्रश्न अगदी लहान मुलगा सुद्धा विचारतो. त्याचं एक पटणारं उत्तर पहिल्या अर्ध्या तासात मिळायला हवे असते.
“एचआयव्ही” हा शब्द त्या काळात टॅबू होता. त्याच बरोबर आपल्याला काय त्याचं. हा प्रकार आपण कशाला जाणून घ्यायचा? वेश्यागामी लोकांना होणार हा आजार. आपण नाही त्यातले. बरं हा आजार कुणाला झाला आहे हे जरा जरी ऐकलं तरी त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाचा सामाजिक बहिष्कार ठरलेला. आमच्या बँकेत देखील हा कार्यक्रम अटेंड करणं मँडेटरी आहे असे कळल्यावर एका बिझिनेस हेडने तर मला सुनावलं, कां बँकेचा वेळ बरबाद करत आहात. एवढ समाज कार्य करायचं आहे तर रेड लाईट एरियात करा. मी नुसता हसलो. पण बॅंकभर साधारण हेच मत सर्वांचं होतं. माझ्या लक्षात आलं कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांसाठी बर्फ फोडण्याचं काम (ICE BREAKER) आवश्यक आहे.
पार्श्वभूमी :
एचआयव्हीचा व्हायरस हा आफ्रिकन देशांमध्ये आधी आला, झपाट्याने पसरला. कुटुंबच्या कुटुंब या रोगाच्या विळख्यात सापडली. आमच्या बँकेच्या आफ्रिकेत भरपूर शाखा. बँकेत काम करणारे, त्यांचे कुटुंबीय देखील पॉसिटीव्ह निघाले. शेती, व्यापार, रोजगार सारे जवळपास ठप्प झाले. कुटुंब उध्वस्त झाली. देशांची आणि बँकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा अवस्थेत बँकेने एक निर्णय घेतला. आफ्रिका तर वाचवायचीच त्याचवेळी इतर देशांमध्ये देखील प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबवायचे. कारण एकविसाव्या शतकात एकूणच आंतरदेशीय प्रवास वाढायला सुरुवात झाली होती.
“लिविंग विथ एचआयव्ही” हा कार्यक्रम कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत बँकेने सुरु केला. तेंव्हा काही दिवस बँकेच्या कृपेने एचआयव्ही सोबत घालवावे लागणार होते.
(क्रमश:)
लेखक : श्रीधर जहागिरदार
दिनांक ६ जानेवारी २०२६
सुरपाखरू #३०दिवस३०लेख प्रयोग२०२६