काबुल मधे भेटलेल्या धाडसी स्त्रीया

अफगाणिस्तान हा शब्द उच्चारताच काय चित्र येतं डोळ्यांपुढे? दहशत, तालिबान,अल-कैदा, बॉम्बस्फोट, चौकात फाशी देणारा रानटी समाज, स्त्रियांना स्वातंत्र्य नसलेला देश वगैरे वगैरे. हे खोटे आहे की खरे? दोनीही. ज्याला जे सोयीचे त्याने तसे रंगवावे, तसे पहावे.

राजनैतिक दृष्टीने सुद्धा जेंव्हा जसे सोयीचे तसे कुठलाही देश दुसऱ्या देशाला रंगवत बसते. काल पर्यंत भारत तालिबान्यांच्या सत्तेला मान्यता देत नव्हता, आता तालिबानी सरकारचे शिष्टमंडळ भारतात येते.

क्रिकेटच्या दृष्टीने आपल्या देशातले क्रिकेट प्रेमी अफगाणिस्तान क्रिकेट संघाला चिअर करते. आयपीएल मध्ये त्या खेळाडूंना विकत घेते.

एकूण जसे सोयीचे तसे आपल्याला त्या देशाचे चित्र दिसते. तरीही उद्या तुम्हाला काबूलला जावे लागणार असा आदेश निघाला तर तुम्ही काय करणार? मला विचाराल तर मी आधी एक चांगला डॉक्टर पाहून त्याला पाचेक हजार रुपये देऊन “तब्येतीच्या कारणामुळे त्यांना प्रवास करणे झेपणारे नाही” असे प्रमाणपत्र घेऊन येईन.

असे असताना मला भेटलेल्या तीन स्त्रिया २०-२२ वर्षांपूर्वी काबुल शहरात पोस्टिंग मागून गेल्या होत्या हे थोडे नवलच. मी २००५, २००७ आणि २००८ साली काबुल शहराला भेट दिली होती, ऑफिसच्या कामाने.

IMG_20171121_215148025.jpg

पहिल्या भेटीनंतर मी दिल्लीला ट्रेनिंग करत असताना पंचविशीतल्या एका मुलीने, गीतांजली नायरने मोठ्या कुतूहलाने काबुल बद्दल चौकशी केली. म्हणाली " मी काबूलला पोस्टिंग साठी प्रयत्न करते आहे" मी दचकलोच ! तिचे वडील तिथे अफगान सरकारात सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. तिला तिथल्या जीवनाचा अनुभव घ्यायचा होता. ती गेलीही, तीन महिने होती, वडील परत आले तेंव्हा परत आली.

दुसऱ्या भेटीत तिथे ग्राहक सेवा प्रबंधक म्हणून आलेली नेपाळची नीलम भेटली. तिचा माझा जुना परिचय. तू इथे कसं काय पोस्टिंग घेतलं म्हणून तिला विचारल. तिचं उत्तर मला एक वेगळाच दृष्टीकोन दाखवून गेला. जीवनात वेगवेगळ्या वळणावर असणाऱ्या प्राथमिकता माणसाला काही धाडसी निर्णय संधी म्हणून घ्यायला उद्युक्त करतात. काबुल पोस्टिंग हे विशेष पोस्टिंग म्हणून एक वेगळा घसघशीत भत्ता, दर तीन महिन्यांनी १५ दिवसांची घरी जायला मिळणारी विशेष सुट्टी हा एक भाग.. तिच्याच शब्दात “ह्या सुट्टीमध्ये मी कुटुंबाबरोबर वेळ घालवू शकते, काठमांडूत काम करताना शनिवार रविवार सुद्धा कधी कधी काम करावं लागतं, शिवाय जवळ जवळ दररोज रात्री उशिरापर्यंत काम असतंच”.

दुसऱ्या भेटीत तिथल्या सीईओ ची भेट होऊ शकली नाही, ती तिसऱ्या भेटीत झाली. बांगलादेशहून आलेली नसरीन. तिने इथे येण्यामागचं कारण जरा वेगळच. ढाक्यात काही कारणानं तिचं मॅनेजमेंट बरोबर पटेना. तिने बँकेत बरीच वर्ष नोकरी केलेली, आपल्या कर्तबगारीनं अनेक प्रमोशन घेतलेली. काबुल मधल्या जुन्या सीईओचा कालावधी संपल्यावर तिला त्या जागेसाठी विचारणा झाली. ही एक सुंठी वाचून खोकला घालवायची क्लृप्ती होती. मात्र तिने हे आव्हान स्विकारलं आणि ती काबुलला आली. आपल्या दोन वर्षांच्या कालावधीतल्या अनुभवांवर आधारलेलं एक पुस्तक तिने लिहिलं - My Kabul Story. अफगाणिस्तानातील आणि कार्पोरेट जगातील अनुभव शब्दांकित केले आहेत.

आजची स्त्री अनेक धाडसी निर्णय विचारपूर्वक आणि खंबीरपणे घेते. ते कार्यान्वयीत करण्यात येणारे अडथळे वेळ पडली तर न्यायालयात दाद मागून दूर करते आणि पुढे जाते.

लेखक : श्रीधर जहागिरदार 

दिनांक ५ जानेवारी, २०२६

सुरपाखरू #३०दिवस३०लेख प्रयोग२०२६