साल २१२६ (आजपासून १०० वर्षानंतर)
कधी नव्हे तो वरूण राजा ७ जूनलाच अवतरला होता . नाही नाही …हस्त नक्षत्र नसतांनाही हत्तीच्या पावलानी धुवाधार कोसळला होता . जणू काय प्रलय आला होता .
सोसाट्याच्या वार्याने बर्याच लहान मोठ्या वृक्षांना जमीनदोस्त केले होते .
दोन उपनगरांना जोडणाऱ्या त्या रस्त्याच्याकडेला एक वटवृक्ष आपल्या परिवारासह शून्य नजरेने ही वाताहात पहात उभा होता.
त्याच्या आश्रयाला असलेले पक्षी आपल्या परिवारा सह त्याचा त्याग करून मोठ्या मोठ्या इमारतीच्या आडोशाला गेले होते .
५ दिवसापासून सूर्य दर्शन काय चिटपाखरू ही नजरेला पडले नव्हते . नदी , नाले , डबकी ओसंडून वाहत होती .
माणसाने मोठ्या प्रयासाने बांधलेला तो सीमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पार चिखलमय झाला होता .
कालपासून पाऊस ओसरू लागला होता . पण अजूनही माणसं घराबाहेर पडली नव्हती.
तसेही आजकाल लोक घराबाहेर पडतच नव्हती. करोनाचा नायनाट करायलाच माणसाला ३० - ४० वर्षे लागली होती.
त्यातून सावरले म्हणून निःश्वास सोडतात ना सोडतात तोच चीनने अजून एका महा विषाणूचा सर्वत्र प्रसार केला . मृत्यूने अक्षरशः तांडव केले होते .
ह्या वटवृक्षा ने तटस्थपणे हा सर्व विनाश पाहिला होता . मनोमन तो फार खचला होता.
एके काळचे ते वैभवशाली नगर आता फक्त सिमेंट च्या घरांचे जंगल भासत होते. माणूस जीवाच्या भीतीने माणसालाच टाळत होता.
तेव्हड्यातच मंगळावर मनुष्याने वस्ती करायला सुरवात केली होती. पैसेवाल्यांने ह्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला होता . पृथ्वी वरची लोकसंख्या बर्यापैकी कमी झाली होती.
पण तोपर्यंत निसर्गाचा पुरेपूर ऱ्हास झाला होता. पण हा वटवृक्ष अनेक संकटाना तोंड देत तिथेच आपला पसारा वाढवीत उभा होता .
तारीख १४ जून २१२६
वटपौर्णिमेचा दिवस
वेळ सकाळची …
तरीही प्रसन्न न वाटणारी …
कशी वाटणार ???
गेल्या काही वर्षात माणसांनी टेक्नॉलॉजीचा एव्हढा उदो उदो केला आणि फार मोठ संकट ओढवून घेतले . स्वतःचा स्वार्थ साधताना आपण निसर्गाचा किती नाश करतोय ह्याकडे लक्षच नाही ना दिले .
काल सुद्धा असच झाले . समोरच्या झोपडपट्टी मधील २-३ मुले धावत पळत आली आणि घाईघाईने वडाच्या फांद्या ओरबाडून निघून पण गेली.
खर म्हणजे मुले आपल्याकडे येताना पाहून झाड खूप सुखावले होते. पण त्यांच्या राक्षसी वृत्तीमुळे झाड खुप दुःखी झाले होते. रात्रभर झालेल्या जखमांनी कण्हत होते.
वटवृक्ष आज खूप आसुसलेल्या नजरेनी त्याच्या टप्प्यात येणार्या सगळ्या इमारती आणि घरांकडे पहात होता. त्याला एकटेपणा नकोसा झाला होता.
कुठे माणसांची हालचाल दिसतेय का ? बायकांची लगबग दिसतेय का ? पण निराशाच त्याच्या पदरात पडत होती .
पाहता पाहता सूर्य माथ्यावर आला पण अजून तिकडे कोणीही फिरकलेच नव्हते . बहुदा भारतीय संस्कृती लोप पावली ,असाही एक भयानक विचार त्याच्या मनात डोकावून गेला.
पुन्हा आभाळात काळे ढग तुरळक दिसू लागले होते . सूर्याला झाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे त्या लांबलचक रस्त्याचा अर्धा भाग अंधारलेला आणि अर्ध्या भागात उजेड दिसत होता.
आता आपल्याकडे कोणीही येणार नाही ह्या विचाराने तो जरासा अस्वस्थ झाला. त्याच्या पानांची सळसळ वाढली. पानांचे ते मधुर संगीत ऐकण्यात त्याने स्वतःला गुंतवून घेतले .
काळ्या ढगांची गर्दी वाढतच होती . त्यामुळे वेळेआधीच संध्याकाळ झाल्याचा भास होत होता . वडाची आशा पूर्णपणे मावळली होती. त्यामुळे रस्त्याकडे लक्ष न देता त्याने पूर्णपणे आपले लक्ष ढगांच्या धावपळीकडे केंद्रित केले होते. आणि म्हणूनच त्याच्याकडे सरकणारी ती धूसर आकृती त्याच्या अगदी जवळ येऊन ठेपली तरी त्याला पत्ता लागला नाही.
अचानक काही तरी धडपडण्याच्या आवाजाने वड दचकला . ती धूसर वाटणारी आकृती एका तरुणीची होती . चिखलामुळे पाय घसरला होता, पण तिने स्वतःला सांभाळले होते.
आता वडाने तिच्याकडे जरा निरखून पाहायला सुरवात केली. पावसाच्या आशंकेने तिने आधीच रेनकोट घालून ठेवला होता .
पण रेनकोटची झिप अर्धवट उघडी होती त्यामुळे तिचा पेहेराव लक्षात येत होता . पोपटी रंगाची हेवी टिकली वर्क केलेली जर्सी, त्याला मॅच करणारी फिक्कट पोपटी रंगाची ओढणी आणि गुडघ्याच्या थोड्या खाली पर्यंत येणारी जीन्स . पायात गुडघ्या पर्यंत येणारे गम बूट . पाठीवर रेनकोटच्या आत एक बॅग. ह्या पेहरावाला तो वृक्ष सरावला होता.
पण तिच्या चेहर्याकडे पाहताच तो आश्चर्यचकित झाला . कपाळावर मोठी लालचुटुक टिकली. तिचा चेहर्यावर ती फार सुंदर दिसत होती तरी तिच्या आधुनिक पेहरावाशी विसंगत वाटत होती.
ती आता बूट काढून वडा भोवती असणार्या पारावर चढली होती . रेनकोट काढून पाठीवरची बॅग तिने पारावर ठेवली . तोच तिचा हिरवागार चुडा किणकिणला. वडाचे झाड आनंद मिश्रित आश्चर्याने तिच्या कडे पाहू लागला. पुढच्या प्रसंगाची त्याला थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती . तिच्या विसंगत वेषभूषेशी आता त्याला काहीच देणे घेणे नव्हते .
बॅग उघडून तिने ताम्हण, पळी, ताट , फुलपात्र काढून ठेवले. पाण्याची मोठी बाटली काढून हात पाय धुवून ती पुढच्या तयारीला लागली . ताटात साग्रसंगीत पूजेचे सामान तिने काढले . एका छोट्या वाट्यात गहू आणि आंबे ठेवले. फुलं, उदबत्ती, कापूर , फुलवात, तूप कशाकशाची कमतरता नव्हती . ती तयारी पाहूनच वटवृक्ष सुखावला होता.
ही सर्व तयारी करताना ती सतत मागे वळून पहात होती . जणू कुणाची तरी ती वाट पहात होती. थोडा वेळ वाट पाहिल्यावर ती आसनावर बसली . फोनच्या काही बटनावर सराईत बोटे फिरवून तिला हवी ती गोष्ट तिने चालू केली .
फोन मधून आता मंत्रोच्चार येऊ लागले होते .
ॐ केशवाय नम: , नारायणाय नम:,…
पूर्ण मन लावून तिने पूजा केली . तेवढ्यात ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती तोच आवाज तिच्या कानी आला . तिचा सहचर वेळेत येऊन पोहोचला होता.
कच्च्या सुताचा गुंढाळा हसतमुखाने त्याच्या हाती देऊन जोडीने वडाला धागा बांधायला दोघांनी सुरवात केली. सात फेरे झाल्यावर दोघांनी एकमेकांच्या मनगटात रेशमी धागा बांधला . सप्त जन्माची साथ निभावण्याच्या आणाभाकांची अत्यंत प्रेमाने देवाण घेवाण झाली.
वटवृक्ष ही अत्यंत तृप्त झाला होता. जाण्यापूर्वी त्या नव्या युगाच्या सत्यवान - सावित्रीने त्या वृक्षाला नतमस्तक होत भाविकतेने हात जोडले . आणि तृप्त मनाने वृक्षानेही भरभरून आशीर्वाद दिला. ते मनोरम दृष्य पाहण्याची तीव्र इच्छा रवी राजालाही आवरली नाही. आपल्या सहस्ररश्मी पसरवत त्यानेही ह्या दोघांना आशीर्वाद दिला .
वटवृक्ष आता निश्चिंत होता. ही परंपरेची पताका नक्कीच युगानुयुगे पुढे सरकत राहणार होती. भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा र्हास होणार नव्हता.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
एक मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे . वृक्ष वल्ली आम्हा सोयरी … असे फक्त पाठ करण्यापुरता नाही आहे. पावसाळा आला की वृक्ष लावा त्याचे पुढच्या पिढीसाठी संवर्धन करा.
तसेच वडाची पूजा करण्यासाठी त्याच्या फांद्यांना ओरबाडू नका . जीव दुखतो हो त्याचाही . त्यापेक्षा तुमच्या घराच्या आसपास मोकळ्या जागेत वटवृक्षाचे झाड लावा . प्राणवायूचा भरपूर साठा तुमच्या परिसरात सतत राहील…
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
![]()
©® सौ मंजुषा श्रीकांत अपराजित सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६
