चैन पडे ना आम्हाला
येतो ग मी . त्याने निरोपाचे बोलणे सुरू केले .
अगदी आला त्या दिवशीच सांगितले होते त्याने जायचा दिवस कोणता ते .
" आल्या आल्या काय रे जायची गोष्ट करतोस. जरा निवांत रहा ."
" अग चांगली दहा दिवसाची सुट्टी काढून आलो आहे मी . तुला जेव्हढे लाड करायचे आहे ना माझे तेवढे करून घे . तुझ्या कुठल्याच गोष्टीला नकार देणार नाही मी. आणि हो तेवढ्या दिवसात स्वतःला समजावत रहा की मी ठरल्या दिवशी जाणारच . निरोप देताना डोळ्यातून पाणी नाही आणायचे. "
मग काय त्याला मखरात बसविले, नवीन कपडे , दागिने सगळ्याच गोष्टी नवीन .
लाल फूल, दुर्वा, शमि त्याला आवडतात म्हणून शेजारच्या बंगले वाल्या काकूंची मिनतवारी केली. शमि तोडताना झाडाने चक्क ओरबाडले मला. आणि हा लबाड हसुन म्हणतो कसा,
" अग, झाडाला ओरबाडू नको हो."
रोज त्याला भेटायला नातेवाईकांना आमंत्रण दिले.
ते ही माझ्याच सारखे वेडे . आले धावून . भरभरून मिठाई , लाडू, मोदक , करंज्या. कशा कशाची कमतरता नव्हती. आणि हा हसत हसत सगळ्याचा स्विकार करत होता . अगदी बाजूच्या कुंभार टोळीतील माझ्या कामवालीच्या हातची खोबर साखर सुद्धा तेवढ्याच आनंदाने स्विकारली .
कबूल केल्या प्रमाणे कुठेच आडकाठी नाही केली त्याने.
बाहेर इतके गरम वातावरण होते मी त्याला शेला पांघरला तरी ह्याचा चेहरा हसरा , प्रसन्न. फुलांचे भरगच्च हार ही घातले गळ्यात.
त्याच्या प्रसन्न अस्तित्वाने सारं घर भेदभाव विसरून एक झाले होते. आजूबाजूची पंजाबी, गुजराथी अगदी वस्तीतील खालच्या वर्गातले लोकही सामील होत होते. टिळकांच्या दूरदृष्टीतील भारत माझ्या छोट्याश्या घरात सामावत होता.
पण त्याची जायची लगबग पाहिली आणि मन आवरणे कठीण होऊन बसले .
कोणत्या तर्हेने ह्याला अडवू ह्याचा विचार करत त्याच्या जायची तयारी सुरू केली. दहीभात, बरोबर अडल्यानडल्याला असावी म्हणुन पिठाची छोटी पुरचुंडी, करंजी करताना मुद्दामच मुरड घातली. मुरडले तर येईल कदाचित परतून अर्ध्या वाटेतून , माझी वेडी आशा . डाळ काकडी , नारळ सगळे दिले. अगदी न विसरता.
रोज सारखी संध्याकाळची आरती, नैवेद्य , प्रसाद झाले. पण रोज सारखा जोश नव्हता त्यात . सगळ्यानी घोष केला
गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या .
माझा लहानगा नातू रडक्या आवाजात मला म्हणाला , " आजी , नको ना बुडवू पाण्यात त्याला…"
त्याला समजावण्या च्या नादात माझेही डोळे गच्च भरले.
©️®️ सौ मंजूषा श्रीकांत अपराजित
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६
