आजही त्याला उशीरच झाला. सकाळी निघताना तो सांगून गेला होता - आज सहा वाजेपर्यंत परत येईन. पण इन्स्पेक्शन सुरु होते. त्याला थांबावे लागले.
बँकेत इन्स्पेक्शन प्रकार म्हणजे त्रासच. त्यात मॅनेजर रजेवर गेलेला. हे मद्रासहून आलेले इन्स्पेक्टर. त्यांना दुसरे काम कुठले. हॉटेल मधून १० वाजता येतात, आणि रात्री आठ आठ वाजेपर्यंत हे दाखवा, ते दाखवा करत राहतात. कर्मचारी ठरल्या वेळी गुड नाईट म्हणत चालू लागतात. त्या रावला विचारत होते " व्हाय इस यौर अकौंटंट वॉण्टस टू लिव्ह इन हरी?" राव एक नंबरचा डँबीस. युनियन सेक्रेटरी, म्हणाला, “सर, जस्ट मॅरीड… विंटर टाईम …” वर जाता जाता मोठ्या आवाजात त्याला हिंदीत बोलला, “जाओ सर, भाभीजी इंतजार कर रही होगी.” मग त्यानेच त्या मद्रास्याला सांगितले, " आय मस्ट गो सर. मला बाजारात जायचे आहे, मग घरी. उद्या लौकर काम सुरु करू."
जानेवारी महिन्याचा गारवा. रात्र उमलून त्याच्या मनांत रंग उधळू लागलेली. नव्या नवलाईचे दिवस आत्ता कुठे सुरु झालेले. महिनाभरच झाला होता त्याला लग्न करून जबलपूरला येऊन. ती त्याची वाट पहात असणार. त्याने घराजवळच्या दुकानातून एक कॅडबरी घेतली. रुसवे फुगवे काढण्याचा एकच उपाय, एक कॅडबरी दोघांनी मिळून चघळणे. गेट उघडून त्याने स्कुटर आत घेतली. त्याने दाराकडे पाहिले. दार बंदच होते. एरवी स्कुटरची चाहूल लागताच ती दारात येऊन उभी राहत असे. त्याने दाराची कडी वाजवली तसे तिने दार उघडले आणि पटकन वळून आतल्या खोलीत निघून गेली.
त्याने खिशातल्या वस्तू कपाटात ठेवल्या, कॅडबरी टीपॉयवर ठेवली.
तो ताजातवाना होऊन आला तर टीपॉय वर पाण्याचा पेला आणि चहाचा कप ठेवलेला. ती गायब. कुठे गेली ही ? त्याला प्रश्न पडला. जेमतेम अडीच खोल्यांचं घर. थंडी वाढू लागलेली, अशा वेळी ती घर मालकाच्या मुलीशी गप्पा मारत असेल ही शक्यता कमीच. त्यातून एरवी ती आतुरतेने वाट पाहत असायची. तरी तो बाहेरचा दरवाजा उघडून मालकाच्या घरापर्यंत पाहून आला.
हा कुठला नवा खेळ शोधून काढला हिने आजच्या साठी असा विचार मनात येत असतानाच दुसरीकडे त्याला जरा काळजी देखील वाटू लागली. तो पुन्हा घरात शोधू लागला तर किचन मधून मुसमुसण्याचा आवाज आला. अंधारात भिंतीला टेकून ती गुडघ्यात डोक ठेऊन रडत होती.
" अरे, काय झालं ? रागावलीस? अगं उशीर झाला खरा पण तुला ठाऊक तर आहे सध्या इन्स्पेक्शन सुरु आहे. आणि उशीर होणार हे सांगून तर गेलो होतो" त्याने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. तिने तो उधळून लावला. त्याने दिवा लावला, तिच्या समोर बसला आणि म्हणाला " काय झालं सांगशील?"
“मला घरी जायचंय”
"अचानक? संक्रांतीला जाणारच आहोत ना? आणखी आठवड्याने.
“मला उद्याच जायचंय?”
“कसं शक्य आहे? मला रजा घेता येणार नाही. सोमवारी गोयल साहेब आले की रजा टाकेन मी”
" मला गाडीत बसवून द्या. मी जाईन एकटी" ती काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
" ओके. पण मला कळू तर दे, झालं काय? त्या शिवाय मी तुला जाऊ देणार नाही"
ती उठली आणि बेडरूम मध्ये गेली. तो मागोमाग गेला. तिने एक लिफाफा त्याला दाखवला आणि विचारले " हे काय आहे? ही मुक्ता कोण?"
त्याला आश्चर्य वाटले. “कुठे सापडले हे तुला?”
" ते महत्वाचं नाही. तुमचं हे असं काही असेल मला ठाऊक नव्हतं. तुमच्या घरच्यांनीही काही सांगितलं नाही "
तो हसू लागला. हसता हसता त्याला उगाचंच वाटलं ती त्याला निर्लज्ज म्हणाली. क्षणभर तो चिडला. पण त्याने स्वत:ला सावरले.
" तुला असं वाटतंय का की माझं काही लफडं होतं ?"
" हो. नाटकवाल्यांची लफडी असतातच !" ती ठामपणे म्हणाली.
आता ती दुखावलेपणातून सावरून संतापलेली वाटली त्याला. ती स्वतः सांस्कृतिक क्षेत्रापासून लांबच राहिलेली. घर आणि कॉलेज हेच तिचे जग. कॉलेज मधल्या तिच्या मैत्रिणींकडून त्याच्या बद्दल तिला माहिती मिळाली होती. त्या रामबाग या भागातल्या. त्याचा अड्डा तिथेच असायचा.
" त्या पत्रात लिहिलंय की तुम्ही दोघे वेगळे झाल्यावर तिला मुलगा झाला आणि एका आजारपणात तो दगावला. हे कळवायला हे पत्र तिने धाडले. मला तुमच्या बरोबर रहायचे नाही, मला उद्या गाडीत बसवून द्या"
त्याला वाटले होते तितकी ती मवाळ नाही, हे त्याला आत्ता समजले. त्याने खिंड लढवत ठेवायचे ठरवले.
" बरं त्या पत्रात माझे नांव आहे? ते मला उद्देशून लिहिलेले आहे?" त्याचा स्वर आता किंचित चिडका झाल्याचं त्याला समजलं . बँकेतल्या त्या इन्स्पेक्शनमुळे तो त्रासला होता. तरीही तिच्या ओढीने तो घरी आला होता.
“त्याची काय गरज? पत्र तुमच्या जवळ आहे म्हणजे तुम्हालाच लिहिलंय.”
" त्या लिफाफ्यावर माझे नांव आहे? नील चिंतामणी असे नांव आहे."
" अशी पत्र नेहमी मित्राच्या पत्त्यावर धाडली जातात. मला ठाऊक आहे. माझी एक मैत्रीण असच करायची."
ती गुलशन नंदाची वाचक होती. त्याच्या कहाण्यांवर आधारलेले चित्रपट तुफान चालतात. तिला सिनिमे बघायला मिळत नसत.
येणारे हसू त्याने कसेबसे दाबले. " पण एक सांग हा लिफाफा तुला सापडला कुठे?"
" त्या हिरव्या पत्र्याच्या पेटीत."
" ती कशाला उघडलीस तू?" त्याचा सूर पुन्हा नकळत जरा चिडका झाला .
" नको होती उघडायला? मग कुलूप लावून ठेवायचं. घर आवरून ठेवावं म्हणून उघडली?"
" अगं ती नाटकाच्या सामानाची पेटी. तुझ्या कामाची एकही वस्तू नाही त्यात."
" हे सापडलं की ! " ती हातात पत्र नाचवत म्हणाली. " मला उद्या गाडीत बसवून द्या. मी माझी पेटी लावून ठेवली आहे.तिने ते पत्र आपल्या पेटीत ठेऊन कुलूप लावायला घेतले.
आता ह्या नाटकावर पडदा पाडायला हवा होता आणि सारा सोक्षमोक्ष लावावा लागणार होता.
" एक मिनिट. ते पत्र पेटीत ठेऊ नकोस." तीव्र स्वरात ती म्हणाली.
" कां? कां? पुरावा आहे तो, तुमच्या लफड्याचा!" ती फुत्कारली.
" ठीक आहे, ने तू. हवे तर त्याच्या दहा वीस झीरॉक्स काढून ने " आता तो ही वैतागला होता.. “पण एक मिनिट थांब.”
त्याने बेड खालून ती हिरवी पेटी खेचून बाहेर काढली. " ये, बस इथे बेडवर. आणि मी काय दाखवतो ते शांतपणे बघ."
पेटीतून त्याने एक पुस्तक बाहेर काढले. " हे पाहिलेस तू?"
"नाही . काय आहे त्यात ? "
" हे श्री ना पेंडसे यांचे चक्रव्यूह नाटक आहे" बोलता बोलता त्याने पुस्तकाची पाने भरभर चाळायला सुरुवात केली. एक पान उघडून तिच्या समोर धरलं आणि म्हणाला,
" मला ठाऊक आहे, तुला मराठी पुस्तकं वाचण्यात रस नाही. पण हे एक पान वाच. आणि ते पत्र वाच. तोवर मी चहा गरम करून पितो. इतक्या प्रेमाने तू केलास, गार झाला असेल."
दिल्लीतील स्पर्धेसाठी त्याने चक्रव्यूह नाटक बसवले होते. त्यातल्या एका प्रसंगात नायकाच्या (नील ते काम करत होता) पूर्व प्रेयसीचे एक पत्र आलेले त्याची पत्नी वाचते. आणि त्याच्या हातात ते देते. तो पत्र वाचत असताना मुक्ताच्या, पूर्व प्रेयसीच्या आवाजात ते पत्र ऐकू येते, असा प्रसंग होता.
गरम चहाचा कप घेऊन तो बाहेरच्या खोलीत आला. दोन घोट घेऊन त्याने कप खाली ठेवला. तो सिगरेट शोधू लागला. तो सहसा घरात सिगरेट ओढत नसे, पण त्याला आत्ता खूप गरज वाटत होती. त्याने कपाट उघडले आणि त्याला मागून किणकिणत्या बांगड्यांच्या हाताचा विळखा पडला.
" सिगरेट शोधतोयस? ही घे" ती म्हणाली.
तो मागे वळला. अर्धी कॅडबरी अलगद ओठात ठेवून ती त्याच्या कडे मान उंचावून अपेक्षेने पहात होती.
लेखक : श्रीधर जहागिरदार