संगीत - जीवनाचं अमृत!

हा माझा आजचा सुरपाखरू ह्या उपक्रमातला शेवटचा लेख! ह्या सुरपाखरू च्या थव्यात अनेक सोबती होते. सगळ्यांनीच खूप छान लिखाण केलं. मला स्वतःला वाटलं नव्हतं मी सतत तीस दिवस लिहू शकेन पण लिहिणं सुरू केल्यावर लक्षात आलं मनात बरंच काही आहे जे अभिव्यक्त होणं जरूरी आहे आणि विषय सापडत गेले. अजूनही विषय संपले नाहीतच. आता तर उलट अजून जास्त विषय सुचताहेत. ह्या उपक्रमामुळे ‘कथा लेखन’ हा नवीन प्रकार मी पहिल्यांदाच लिहिला आणि तो वाचकांना आवडला देखिल.

‘सुरपाखरू’ ह्या उपक्रमाची संकल्पना श्री तुषार जोशी ह्यांची आहे. अतिशय शिस्तबद्ध प्रकारे, मेहनतीने त्यांनी सगळ्या लेखकांचे हात लिहिते केले त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.वाचकांचेही अनेक अनेक धन्यवाद तुमच्या उत्साहवर्धनामुळे मला नवनवीन विषय सुचले आणि लिहायचा हुरूप आला. आता रोज जरी लिहिणार नसले तरी अधून मधून लिहेनच. आजचा शेवटचा लेख लिहिताना उपक्रम पूर्ण झाल्याचा आनंदही आहे पण उद्या काही लिहायचं नाही ह्याचं दुःखही आहे. तरी पुन्हा भेटूच!

आजचा लेख समर्पित!

संगीत - जीवनाचं अमृत!

विकल मन आज झुरत असहाय…

सकाळची सहा ची वेळ. तानपुरा काळी पाच च्या स्वरात लावून माझा नाट्य गीताचा रियाझ सुरू होता. संख्या जाणवण्या इतपत पक्षी लागूनच असलेल्या बेलाच्या झाडावर येऊन बसत होते. आधी मला वाटलं विशेष काही झालं असेल पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाणवलं, हे रियाझ सुरू केल्या केल्या घडतंय. वेळ कुठलीही असो…मुद्दाम वेळ बदलून पण बघितली पण दृश्य तेच!

बरेचदा हॉल च्या बे विंडो मधे बसून रियाझ करते. लागूनच बेलाचं झाड आहे. घर चवथ्या मजल्यावर असल्याने झाडाच्या वरच्या फांद्या खिडकी जवळ येतात. रियाझ सुरू झाला की वेगवेगळे पक्षी, लगेच झाडावर येऊन बसतात. तानपुऱ्याच्या तारा स्वरात लावताना तर माझा हा नेहमीचा अनुभव आहे. चारही तारा स्वरात लागायला लागल्या की पक्ष्यांची हालचाल जाणवते. तेही स्वरात स्वर मिळवायचा प्रयत्न करताहेत कि काय असं वाटतं. हे बघून संगीताची शक्ती जाणवते. संगीताची शक्ती आपल्या वेदांमधे सिद्ध झालेलीच आहे, तरी असे काही अनुभव आपल्याला स्वतःला येतात तेव्हा आपण संगीता समोर नत मस्तक होतो.

संगीत हा मानवी जीवनातील एक अतिशय सुंदर आणि सकारात्मक अनुभव आहे. शब्दांपलीकडे जाऊन भावना व्यक्त करण्याची शक्ती संगीताकडे आहे. आनंद, दुःख, शांतता, उत्साह, भक्ती… मनातील प्रत्येक भावाला योग्य सूर देण्याचं काम संगीत करतं. म्हणूनच संगीताला जीवनाचं अमृत म्हटलं जातं.

सकाळची भक्तिगीते मनाला शांतता देतात, प्रवासातलं संगीत थकवा विसरायला लावतं, तर आनंदाच्या क्षणी गाणं मनाला अधिक उंच भरारी घ्यायला मदत करतं. संगीत माणसाला एकटेपणातून बाहेर काढतं आणि स्वतःशी जोडून घेतं. कुठलेही शब्द न बोलता ते थेट हृदयाशी संवाद साधतं.

संगीतामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि सर्जनशीलतेला चालना मिळते. स्केचिंग, पेंटिंग करताना किंवा ड्रायव्हिंग करताना संगीत ऐकणे मला स्वतःला अतिशय आवडतं. अभ्यास करताना हलकं संगीत मन स्थिर करतं, तर ध्यानधारणेत सूर श्वासासोबत मनाला खोल शांततेकडे नेतात. अनेक वेळा व्यक्त न होणाऱ्या भावना संगीताच्या माध्यमातून मोकळ्या होतात आणि मन हलकं होतं.

संगीत माणसाला माणसाशी जोडतं. भाषा, प्रांत, वय याच्या सीमा ओलांडून ते सर्वांना एकत्र आणतं. लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत किंवा आधुनिक संगीत सगळे प्रकार आपापल्या परीने जीवनात रंग भरतात. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली सांस्कृतिक ओळख संगीतामुळे जपली जाते.

संगीत डोळे बंद करून अनुभवल्या जातं तेव्हा नादब्रह्माला भेटल्याचा आत्मिक आनंद अनुभवू शकतो. संगीत आपल्याला संवेदनशील बनवतं, सहानुभूती शिकवतं आणि सौंदर्याची जाण वाढवतं.

संगीत मानवाला मिळालेली, मनोरंजना सोबतच जीवनाला दिशा देणारी, मनाला बळ देणारी आणि आत्म्याला स्पर्श करणारी दैवी देणगी आहे. योग्य सूर, योग्य भावना आणि मोकळं मन असेल, तर संगीत नेहमीच जीवनात आनंद, शांतता आणि सकारात्मकता भरून टाकतं

सई देशपांडे

30.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026