हवेली ची आत्मकथा

हवेली ची आत्मकथा

मोठ्ठा जाडजूड दोन पल्ल्यांच्या दरवाजा, त्यातल्या एका पल्लयात एक खिडकी ती पण बऱ्या पैकी मोठीच. दरवाज्या बाहेर दोन्ही कडे मोठ मोठ्या देवड्या (मोठ्ठे मातीचे सारवलेले ओटे) देवड्यांवर चढायला एक एक पायरी… आजीचा हात पकडून ह्या मोठ्ठ्या दरवाजातून आत जातानाचं दृश्य माझ्या नजरेसमोर अजूनही ताजं आहे. आत मोठं अंगण आणि मग तीन मजली हवेली. पाच पायऱ्या चढून हवेलीत गेलं की मोठा चौक, देवघर, माजघर, स्वयंपाकघर,स्नानघर, लांबणी, भांड्यांची खोली, आजोबांची ध्यान करण्याची खोली. वरच्या मजल्यावर झोपण्याचं माजघर, त्याच्या वरच्या मजल्यावर आधी असलेली लायब्ररी पण आजोबा गेल्या नंतर शेतीचं सामान - नांगर, पाण्याच्या मोटी इत्यादी ठेवलेल्या पण कपाटांमधे अजूनही लायब्ररी असल्याची खूण सांगणारी पुस्तकं … काळ पुढे सरकला तशी हवेली रिकामी व्हायला लागली… गावात फक्त सणावारांनाच परिवार एकत्र येतो. त्यामुळे हवेलीचा पाहिजे तसा रखरखाव शक्य नव्हता शिवाय 200 वर्ष जुनी इमारत.. त्यामुळे पडझड सुरू झाली आणि वरचे मजले उतरवावे लागले. आता खालचा मजला तसाच आहे पण जेव्हां कधी मी सायखेडला जाते असं वाटतं ह्या हवेलीच्या भिंती, खांबं, झरोके, कोनाडे… हे सगळे माझ्याशी संवाद साधताहेत… ह्या हवेली ला काही तरी सांगायचं आहे.. ही माझ्या माहेरची सायखेडकरांची, बैतुल जिल्ह्य़ातील सायखेड ह्या गावातली हवेली. तिला काय सांगावसं वाटतं बघुया…

मी एक जुनी मालगुजारांची हवेली आहे. काळाच्या कपाळावर उमटलेल्या सुरकुत्यांसारख्या माझ्या भिंती आजही ताठ उभ्या आहेत. माझ्या अंगाखांद्यावरून पाच पिढ्यांनी आपली पावलं उमटवली आहेत. काळ बदलला, माणसं बदलली, पण मी मात्र सगळ्यांना तसंच कवेत घेऊन उभी आहे… न बोलता, न तक्रार करता.

माझ्या अंगणात कधीकाळी घोड्यांच्या टापा घुमायच्या. सनई-चौघड्यांचा आवाज, पगडीधारी मालगुजारांचा रुबाब, त्यांच्या घोड्यांवरून उतरताना पडणारी भारदस्त पावलं… हे सगळं मी अनुभवलं आहे. माझ्या देवड्यांवर बसून न्यायनिवाडे होत असत, चौकात निर्णय घेतले जात असत. लोक आदराने वाकून माझ्या दरवाज्यात पाऊल टाकायचे. त्या काळात मी सत्तेचं, वैभवाचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक होते.

हळूहळू काळ पुढे सरकला. घोड्यांच्या जागी बैलगाड्या आल्या, आणि मग गाड्या /कारी आल्या. आज माझ्या दरवाज्यातून कारी येऊन थांबतात. बदललेली कपड्यांची फॅशन, मोबाईलमध्ये गुंतलेली माणसं, वेगवान आयुष्य… हे सगळं मी शांतपणे पाहते आहे. तरीही माझ्या अंगणात खेळणाऱ्या लहानग्यांच्या हसण्याचा आवाज मात्र तसाच आहे. तोच निरागस, तोच आपुलकीचा!

पाच पिढ्यांच्या सुख-दुःखांची साक्षीदार मी आहे. जन्म, लग्न, सण-उत्सव, आणि अंत्यसंस्कार… सगळे विधी माझ्याच छायेत झाले. कधी आनंदाच्या जल्लोषाने माझ्या भिंती न्हाऊन निघाल्या, तर कधी दुःखाच्या शांततेने मी स्तब्ध झाले. माझ्या दरवाज्यांतून गेलेली प्रत्येक पिढी काही आठवणी मागे ठेवून गेली, आणि काही नवीन स्वप्नं घेऊन पुढे गेली.

आज माझ्या भिंतींवर भेगा आहेत, रंग फिकट झाला आहे पण माझं मन अजूनही आपुलकीनं भरलेलं आहे. काळाच्या ओघात झिजले असले तरी माझी ओळख मात्र अजून जिवंत आहे. घोड्यांवरून येणाऱ्या मालगुजारांपासून कारने येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत, सगळ्यांना मी एकसारख्याच मायेने सामावून घेतलं आहे.

मी हवेली आहे… दगड माती वर पिढ्यानपिढ्यांच्या प्रेमाचं लिंपण असलेली, आठवणींची, परंपरेची आणि बदल स्वीकारणाऱ्या काळाची साक्ष देणारी. आणि जोपर्यंत माझ्या अंगणात माणसांची पावलं पडत राहतील, तोपर्यंत माझी आत्मकथा नवनव्या पानांनी लिहिली जात राहील.

माझ्या समोरच असलेल्या परिवाराच्या राममंदिरात बसलेले राम लक्ष्मण सीतामाई आणि मारूतीरायानी सदैव माझ्या परिवाराला त्यांच्या छत्रछायेत ठेवलं आहे पुढेही माझ्या परिवारा वर सदैव त्यांची कृपा राहो हीच रामाचरणी प्रार्थना!
सई देशपांडे
29.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026