प्रेमांकुर! हृदयस्थ प्रेमाचे बीज

प्रेमांकुर!

जाणवतंय… कुठे तरी बरसतो आहेस…
प्रेमांकुराच्या आशेत…
तुला कधी कळेल?
जिथे बीज हृदयात रोवलेलं असतं…
तिथेच बरसावं लागत असतं…

त्यावर्षी पावसाने चांगलीच वाट बघायला लावली होती. शेतकऱ्यांचे हाल बातम्यांमधून कळत होते…त्यांचे हाल बघवत नव्हते…
आणि एक दिवस वादळ आलं…सगळं आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेलं…पावसाचा प्रचंड सुगंध दरवळला होता पण पावसाचे थेंब नव्हते. पाऊस दूर कुठेतरी बरसत होता… ते दृश्य बघून माझ्या मनात वरील ओळी आल्या…
ह्या ओळी पावसाला जितक्या समर्पक आहेत तितक्याच मानवी जीवनाला पण आहेत. अनेकदा आपल्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी आपल्या पासून त्यांच्याच कसल्यातरी गैरसमजामुळे दुरावतात… ते अश्या लोकांना जवळ करतात ज्यांच्या बद्दल आपल्याला जाणवत असतं कि ती माणसं ह्यांच्या वर प्रेम करणारी नाहीत, मतलब पूर्ण होण्या पूर्ती ह्यांची जवळीक साधलीये आणि त्यांच्या पासून ह्यांना निरागस प्रेम मिळणार नाहीये… अशा वेळी मनापासून आपण सांगायचा प्रयत्न करत असतो पण त्यांना कळत नाही… ते प्रेमांकुराच्या अपेक्षेत तिथेच बरसत राहतात… आणि साहाजिकच एक दिवस अपेक्षा भंग होतोच… महत्वाचं हे आहे कि हे सगळं घडत असताना आपल्या मनात जे प्रेमाचं बीज निसर्गाने रोवलेलं आहे ( म्हणजे आपला प्रेमळ स्वभाव) ते खोरून टाकायचं कां? पृथ्वी तर असं नाही करत… तिला विश्वास असतो… पाऊस कधी तरी येईलच आणि तिच्या हृदयातलं बीज कधी तरी अंकुरित होईलच! तसंच आपण देखिल आपला प्रेमळ स्वभाव बदलू नये.. निसर्गाने मानव जन्मच मुळी प्रेम करण्यासाठी दिला आहे. इतकी समज इतर कुठल्याही प्राण्यात नसते.
आजकाल समाजात जे डायव्होर्सचे प्रमाण, किंवा इतरही नात्यांमधे थोडा गैरसमज झाला तरी लगेच बदला घेण्याचे जे प्रमाण वाढले आहे त्या मागे हेच कारण आहे कि थोडं ही कुणाला वाटलं कि समोरची व्यक्ती दुरावली आहे तर लगेच मनातलं प्रेम संपवून टाकतात. लगेच त्यांचं वाईट करायला निघतात… त्यांना जास्तीत जास्त समजावून सांगावं बाकी त्यांना त्यांच्या नशीबावर सोडून द्यावं. आपण आपली शांती आपला मूळ स्वभाव कधी सोडू नये. त्या व्यक्तीला कधीतरी तुमची किंमत कळतेच. आणि ती तुमच्या जवळ येतेच पण तोवर तुम्ही तुमच्या मनातलं प्रेमाचं बीज संपवून टाकायचं नसतं.
ह्या ओळी जीवनातील अजून एका अनुभवा साठी समर्पक आहेत ती म्हणजे तुमच्यातली प्रतिभा आणि मिळणारी संधी…कधी कधी कितीही प्रतिभा असली तरी संधी न मिळाल्याने किंवा इतरही काही अडचणींमुळे त्या प्रतिभा तुमच्यात दबलेल्या राहून जातात. माझ्या नशीबातच नाही, मला संधीच मिळत नाही म्हणून हताश होऊन त्यांना पूर्ण पणे संपवून नका टाकू. त्या प्रतिभेला धार देण्याचं काम करत राहावं. ती दैवी देणगी असते. कधी तरी तिचा समाधानकारक उपयोग करण्याची संधी मिळतेच.
तर असा हा दूर बसणारा पाऊस कधीतरी तुमच्या हृदयस्थ प्रेमाच्या बीजाला अंकुरित करतोच. तो पर्यंत बीज जपून ठेवा!

सई देशपांडे
28.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026