रस्त्यांनी घडवलेली माणसं!

रस्त्यांनी घडवलेली माणसं!

तर ही गोष्ट आहे धौलपूर, राजस्थानमधील गुर्जर मामाजींची!
आणि जिच्या मी सांगणार आहे ती म्हणजे त्यांची लाडकी म्हणजेच त्यांची गाडी/ट्रक! (फोटोत आहे)
ग्वाल्हेरला जाताना काही वेळ ती आमची हमसफर होती.

मामाजींनी तिला फार प्रेमाने सजवले होते.
आजूबाजूला आणि मागे वेगवेगळ्या अनोख्या रंगांत रंगवलेले कापडांचे झुंबरं.
नजर लागू नये म्हणून समोर काळे, झुबकेदार गोंडे.
प्लॅस्टिकच्या हिरव्या पानांनी आणि फुलांनी सजवलेले आरसे, आणि प्रत्येक मोकळी जागा वेगवेगळ्या रंगांनी भरून काढलेली, कुठे ना कुठे काहीतरी लिहिलेले, जेणेकरून “हिची झलक सगळ्यांपेक्षा वेगळी” दिसावी ( तेही एका जागी लिहिलंय - अपनी झलक सबसे अलग! ) आणि सगळ्यांना मामाजींची स्टोरीही कळावी.

तर हिरो आहेत धौलपूरचे गुर्जर मामा
आणि हिरोईन आहे शुजालपूरची रूपा.
खरं तर मामा अजून कुणाच्यातरी प्रतीक्षेत होते, पण ती जरा उशिरा आली…
म्हणून मामाजींनी तिच्या मैत्रिणीला म्हणजेच शुजालपूरच्या रूपाला सेट केलं! (टायर वरच्या खालच्या दोन पाट्या वाचाव्या)

आता सांगा बरं, मामाजींच्या प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स ला दाद द्यायलाच हवी ना!

अश्या अनेक धमाल गोष्टी ह्या ट्रक्स वर लिहिलेल्या बघायला मिळतात! परवा छत्तीसगडहून येताना अशीच एक भेटली, लिहिलं होतं -
छत्तीसगड की रानी
महाराष्ट्र की दीवानी!
छत्तीसगढ वर किती मोठा अन्याय आहे बरं हा…

ह्यांची लोकांना सूचना द्यायची अदा पण निराळीच असते.. एकानी लिहिलं होतं -
“वाहन चलाते समय सौंदर्य दर्शन ना करें वरना देव दर्शन हो सकते हैं!”
किंवा
“सावधानी हटी खीर पूरी बंटी”
असे एक ना अनेक!

काही शायर/कवी मनाचे पण असतात.ह्यांचे शेर पण त्याच्याच सारखे भन्नाट असतात..

फिक्र रास्तों की होती तो नशा गाडी का ना होता
डर मौत का होता तो नशा ड्रायव्हिंग का ना होता..
किंवा
दिल के अरमां आंसुओं में बह गये
वो उतर कर चल दिये हम गियर बदलते रह गये…

पण कधी कधी खूप सुंदर शेर किंवा कविता पण लिहिलेल्या असतात.
खुदी को कर बुलंद इतना के
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है
अश्या किती तरी!

हायवे प्रवासात ह्या ट्रक वाल्यांचं लिखाण वाचणं माझा आवडीचा टाइमपास आहे.

हे ट्रक जसा मनापासून सजवतात तसेच मनापासून जगतात देखिल. घरापासून दूर किती तरी दिवस रहावं लागतं ह्यांना. देशाची अर्थव्यवस्था ह्यांच्या हातातच आहे म्हंटलं तरी काही गैर नाही. देशाच्या एक टोक ते दुसरं टोक जायलाही हे मागे पुढे बघत नाहीत. विंचवाचे बिर्हाड पाठीवर म्हणतात तसंच ह्यांचा संसार ट्रकच्या त्या छोट्याश्या केबिन मधे असतो. पोचायची घाई नसते त्यामुळे आरामात वाटेल तेव्हा थांबतात. मोठं अंतर चालवणारे ड्रायव्हर्स मात्र खूप नियमाने ट्रक चालवतात हे माझं निरीक्षण आहे. आता रस्तेही छानच झालेत भारतातले. ह्या सगळ्या निडर आणि जिंदादिल ट्रकड्रायव्हर्सचे सगळे प्रवास सुखरूप होवोत आणि घरी वाट बघणाऱ्या परिवारा साठी ‘खुशियों का पिटारा’ घेऊन पोहचत राहोत ही सदिच्छा!
सई देशपांडे
27.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026