२६, जानेवारी…अर्थात प्रजासत्ताक दिन

ll२६, जानेवारी…
अर्थात प्रजासत्ताक दिन ll

:india::india::india::india::india::india::india:

:writing_hand:हेमंत नाईक
२६. ०१. २६

जनैः जनहितार्थाय जनानाम् एव निर्मितम्।
लोकतन्त्रं भारतस्य वसुधायां विराजते॥

सत्ता प्रजेची सांगणारा,
आजचा हा सुदिन असे..
चिरायू तो नित्य रहावा,

ही सर्वांमनी भावना वसे..१

संविधान स्वतंत्र भारताचे
लागू २६ जाने.१९५०ला
सत्यात्तरावे वर्ष तयाचे
आनंद भारतात उसळला..२
चित्ररथ संस्कृती प्रगतीचा,
राजपथा दिमाखात निघे..
मिग राफेल जग्वार उडे नभी
सेना सामर्थ्य आमुचे दिसें..३
तिरंगे असंख्य घरी फडकले,
जसे उंच राष्ट्रपतीभवनावरी..
देशप्रेम सर्वाचे आज दिसें
विषय तोच आज मंचावरी..४
प्रगत भारत देशासाठी,
जाज्वल्य देशभक्ती रुजो ..
सीमेवरच्या जवानांसम
सर्वस्व त्यागवृत्ती असो ..५
क्रांतिवीरांच्या बलिदानाने
स्वातंत्र्य प्राप्त जाहले..
वंदूनी स्मरता त्या सर्वांना
अश्रू दोन ते ढळले रे..६
अखंड राहो देश आमुचा
चंद्र सूर्य गगनात जो वरी..
शुभेच्छा आजच्या सर्वांना
“निरंतर आपुली व्हावी प्रगती..८”

सर्वाना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. २६ जानेवारी पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना लागू होऊन भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले. प्रजेची सत्ता असा शब्दश: अर्थ होत असला तरी प्रत्यक्षात आज ७७ वर्षानी मात्र चित्र वेगळे दिसते आहे निवडून आलेल्यांची सत्ता असे म्हणावे लागेल.

२९ ऑगस्ट १९४७: घटना मसुदा समिती नेमली, तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, तर या समितीचे इतर सदस्य के.एम.मुंशी, मोहम्मद सादुलाह, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाळ स्वामी अय्यंगार, एन. माधव राव , टी.टी. कृष्णामचारी ही सर्व जाणकार मंडळी होती. धर्मनिरपेक्षता,न्याय , समता, व्यक्तीस्वातंत्र्य, बंधुत्व जोपासणारी आणि लोकतांत्रिक असे भारतीय प्रजासत्ताक २६ जानेवारीला अस्तित्वात आले.

१९५४ पासून प्रजासत्ताकदिनी भारतात नागरी पुरस्कार दिले जातात. हे विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी भारत सरकारकडून दिले जाणारे सर्वोच्च सन्मान आहेत. यामध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा क्रमांक लागतो. हे पुरस्कार कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात.भारतीय संस्कृतीची ओळख दर्शवणारे सर राज्यांचे, सरकारी संस्थाचे चित्ररथ आणि लष्कऱी सामर्थ्य दर्शवणारी शस्त्र सामुग्रीची परेड हे एक प्रमुख आकर्षण असते.राष्ट्रपती या दिवशी राष्ट्रास उद्देशून भाषण करतात आणि तिन्ही सेनादलाकडून सलामी स्वीकारता.

७७ वर्षे प्रजासत्ताक दिनास पूर्ण झाले असली तरी राजकीय गोंधळ सर्वत्र वाढतो आहे.. घटनेचा सोयीस्कर अर्थ काढणारे स्वार्थी राजकारणी पाहिले की मन उद्वीग्न होते.

घटनेच्या अंमलाची घटना
झाली ७७ वर्षाची आज..
किस त्या घटनेचा काढतात,
रोज देशाच्या न्याय मंदिरात .१
अर्थ बाबासाहेबांच्या घटनेचा
जरी साधा सोपा अन सरळ..
लावुनी अन्वयार्थ स्वार्थासाठी,
न्यायमंदिरी नेते ओकती गरळ..२
नेत्यांची होते पळवा पळवी
कोण कुठे , ही कठीण कोडी..
आता तर पक्षही जातात पळवले,
बरोबर नेतात जुनी ती चिन्हे ..३
सत्ताकारण मानूनी ते राजकारण
धुरंधर नेते विसरले समाजकारण
पक्ष माझा की पक्ष हा तुमचा
वादात पेटले या भूमीवर रण.. ४
मुकी गरीब जरी आज जनता
ओळखे ती आपुल्या नेत्याला..
पाच वर्षातून तिचे राज्य ते एकदा
त्या दिनी हिशोब होतो सर्वं चुकता..५
असे हिशोब अनेक वेळा झाले
सत्तेत नेते परत तेच अन ते राहिले..
गुण दोष जोखणे बाजू सारे सरले
विजयांचे कसेही फक्त्त महत्व राहिले..६
हीच सत्ता म्हणता का प्रजेची?,
राज्यघराण्याजागी सत्तेची घराणी..
नेतेराजे नवे आले उदयी ,
प्रजा गायी लोकशाहीची विराणी..७

क्रांतिकारकांच्या त्यागाने, बलिदानाने मिळालेले प्रजासत्ताक म्हणजे स्वैराचार नाही. लोकशाही म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नव्हे. जेव्हा सत्ताधारी, विरोधी असे विभाजन होते,तेव्हा सत्ता प्राप्ती साठी रस्सीखेच अविरत सुरु राहते. त्यावेळी सर्व विसरतात सारी निवडणुकीतील आश्वासन, समाजकारणही बाजूला पडते , सुरु होते फक्त्त सत्ताकारण. मग एकमेकांचे सर्व पक्ष खच्चीकरण करण्यात गुंतले असतात. लोक आणि त्यांच्या समस्याही बाजूला रहातात.

अनेक कोटींचे घोटाळे करून, न्यायालयात शिक्षा घेऊन,समर्थक ,त्या नेत्याचे सुटकेची दिवाळी मनवतात. घरोघरी पेढे वाटले ढोलताशात जल्लोष होतो, सुवासिनी दारोदारी तिलक लावून ओवाळतात आणि तो अजून मोठे घोटाळे करण्यासाठी निवडून येतो,आणि म्हणतो, “लोकांच्या न्यायालयात न्याय मिळाला, फारच विदारक चित्र आहे, भारतीय लोकशाहीचे!”

विसरलोआपण तत्व आणि सारे विचार सर्व काही! निवडणुकीत बरोबर मत मागून, एकत्र लढून जिंकल्यावर कुण्या दुसऱ्याबरोबर संसार मांडून खुशाल सत्तेचे गणित मांडले जाते.
ना आम्हास कोणते सोयरेसुतक, नाही लज्जा, लोकमतांचा, भावनांचा मात्र उडवतो फज्जा!!
कोण आता बरोबर राहील किंवा कोणा संगे जाईल? याची साक्षात ईश्वरही आता ग्वाही देऊ शकणार नाही.कोणास झाकावे नी कोणास काढावे? हा सुद्धा प्रश्नच आहे.

राजकारण,फक्त आणि फक्त तडजोड नव्हे.नेते म्हणतात, “राजकारणात ना मित्र ना शत्रू!”
असे म्हणून, ते काहीही गोंधळ घालू शकतात.खरंतर, मित्रता किंवा शत्रूत्वता ठरवणारी
राजकारण म्हणजे वैयक्तिक बाब कदापी नव्हे किंवा वारसाने मिळणारी वांशिक, राज्यसत्ताही नव्हे .
असं म्हणता, “Every thing is fair in love and war!”"
पण राजकारण, ना युद्ध आहे ना आंधळं पुत्रप्रेम राजकारणात., शिस्त आणि तारतम्य नक्की हवेचं..राजकारण आहे, सहकार..मैत्रीचे फक्त समाजकारण! स्वतः ला विसरून, निस्वार्थीपणे सर्व समाज उन्नत्ती साठी, सर्वांनी प्रामाणिकपणे केलेला सामूहिक प्रयत्न!!

आज सर्व नेमके हेच विसरले आहेत..त्याचीच ही आजच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला पुन्हा एकदा आठवण!!

सध्या राजकारण सत्ताकारण झाले असले तरी यात आपण सर्व बदल घडवू शकतो. वाईट वृत्तीला निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायला पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो. फक्त्त तीव्र इच्छा शक्तीची गरज आहे. हा आशावाद माझ्या सकट आपल्या सर्वांच्या मनात आहे.

तिच “मनिषा” या रचनेत लिहून थांबतो.

ll मनिषा ll

चंद्र सूर्य नभात जो वरी
सदैव सत्ता राहो प्रजेची..
देशप्रेमाची ती ओथंबलेली,
मनामनात सर्वत्र लाट दिसें..१
नाही कुणी हो सत्ताधारी,
नसेल कुणी असे विरोधी..
समाजाच्या उन्नत्ती साठी
ध्यास फक्त मनी असे..२
नसेल महत्व कुणी पदाला,
सर्व जपतसे लोकहिताला..
उमेदवारही तो जिंकणारा,
हरणाऱ्याचा खरा मित्र बने ..३
प्रत्येक कामास लाभे प्रतिष्ठा,
सरली जावो सारी विषमता..
सुखदायी दिन येवो सर्वांना,
जे वांछील ते सर्वकाही मिळे..४
बलसागर देश इच्छा आमुची,
खाण त्यात आहे बुद्धिवंतांची..
कोण कशाला जाई परदेशीं,
स्वर्ग भुतली इथेच असे ..५
संस्कृतीचा आम्हा वारसा
जपा अनमोल त्या परंपरा
अनुकरण्या सर्व जगताला
दिपस्तंभ आमुचे राष्ट्र असे..६
मुल्ये आदर्श मानवतेची ..
सदा जपा हो या देशाची,
नेतृत्व जगाचे करेल भारत
तो दिन आता दूर नसे ..७
राहा सर्व गुण्या गोविंदे,
सोडा सर्व ते भांडण तंटे..
हद्दपार जात करा हो,
राष्ट्रधर्म एकच “भारतीय” असे..
फक्त सर्व "भारतीय " असे..८

“मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
सुर की नदिया हर दिशा से
बह के सागर में मिले
बादलों का रूप ले कर
बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा
तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा!!”

:india::india::india::india::india::india::india:
:india::india::india::india::india::india::india:
:folded_hands::folded_hands::folded_hands::folded_hands::folded_hands::folded_hands::folded_hands:
:writing_hand:हेमंत नाईक
२६. ०१. २०२६
सुरपाखरू#३०दिवसात ३०#, प्रयोग२०२६

1 Like

रोखठोक मनातले मांडले. अभिनंदन.