मेरा भारत महान #सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६

माझ्या तरुण विद्यार्थी मित्रानो नमस्कार ,

स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झालीत. खरंच आपल्याला आपल्या देशाचा इतिहास माहिती आहे ? चला तर भारताचा झगमगता इतिहास जाणून घेऊया .

विद्यार्थी मित्रांनो , तुमच्याकडे कडे पाहून मी अभिमानाने फुगून जाते. तुमच्या सळसळत्या उत्साहाला , कार्यनिपुणतेला खरोखरीच सलाम. तुमच्या बरोबर वावरताना कुणालाही आपल्या वयाच्या विसर पडावा. विविध विषयातील तुमचे नैपुण्य वाखाणण्या जोगेच आहे. नवे पंख लावून आभाळात भरारी घेताना मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगाविशी वाटते..

"नका विसरू देशाते,

नका विसरु देवाते."

"कष्ट सोसा देशासाठी,

काही पुण्य जोडा गाठी."

नेहमी प्रमाणे तुम्ही विचारणारच .. कां ?

ऐका ..

तुमच्यातील कित्येकांनी मोठी मोठी स्वप्ने पाहिली आहे. कुणी डॉक्टर, कुणी इंजीनिअर, कुणी आय ए एस होणार.

कुणी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणार. तिथल्या सुखसोईंना भाळणार आणि आपल्या माणसांना विसरून तिथेच स्थायिक होणार.

अर्थातच तुम्ही सुखसोयीं चा त्याग करा असे मी म्हणणारच नाही . पण जरा विचार करा …

ज्या भूमीत तुम्ही जन्म घेतला , जिच्या अंगाखांद्यावर खेळलात, मोठे झालात, तिचे ऋण फेडणे हे तुमचे आद्य कर्तव्य नाही काय?

तुम्ही म्हणाल , "काय ठेवले आहे ह्या भूमीत? "

चला तर मी आज स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वाढदिवशी तुम्हाला ह्या भूमीची नव्याने ओळख करून देते…

चला तर पाहू या माझ्या महान भारतभूला. प्रथम तिला वंदन करू या

"नमो मातृभूमि जिथे जन्मलो मी ।

नमो आर्यभूमि जिथे वाढलो मी ।।

नमो धर्मभूमि जियेच्याच कामी ।

पड़ो देह माझा सदा ती नमीन मी ।।"

भारत माझा देश आहे आणि तो खरोखरीच खूप महान आहे. ह्या देशाला खूप मोठी भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.

प्रथम आपण तिचा भौगोलिक विचार करू या…

भौगोलिक दृष्ट्या विचार करता आपल्या लक्षात येईल की हा एक अतिविशाल देश आहे.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात सातव्या स्थानावर आहे.

भारताची सीमा शेजारील सात देशांना स्पर्श करते.

गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा ह्या सारख्या अनेक पवित्र नद्या ह्या भूमीचे सिंचन करतात. म्हणूनच ती सुजलाम सुफलाम आहे.

एव्हडेच नव्हे तर अरबी समुद्र , बंगालचा उपसागर माझ्या मातृ भूमीचे पद क्षालन करताना अजिबात थकत नाही.

उंच व विशाल हिमालय पर्वत एखाद्या जबाबदार पाठीराख्या भावा प्रमाणे सीमेवर उभा राहून ह्या माझ्या मातृ भूमीचे रक्षण करतो आहे.

आपल्या ह्या मोठ्या भावाच्या कर्तृत्वावर आश्वासित होऊन विंध्य पर्वतराजी सह सह्याद्री, सातपुड्यानेही आपले हात पाय ऐसपैस पसरविले आहे. केवळ उंची वा रुंदीचा मोठेपणा ही पर्वत राजी मिरवीत नाहीत. ह्यानी आपल्या अंगाखांद्यावर अनेक वृक्षांना थारा दिला आहे. नाना प्रकारच्या औषधोपयोगी वृक्षांची वने ह्या ठिकाणी आहेत . हा वारसा इतर कुठल्या देशाला मिळाला असण्याची शक्यता फार कमी आहे. वने-उपवने, जंगले वैविध्यपूर्णतेने नटले आहेत.

गहन, अति गहन होता होता ह्या वनानी आपल्या अंतरंगात तितक्याच विविध प्राण्यांना आणि पक्षांना सामावून घेतले आहे. हे वृक्ष , हे प्राणी , हे पक्षी एकत्रितपणे आमच्या देशाच्या वातावरणाचा समतोल सांभाळून आहेत.

विविधतेतील एकतेचे हे ज्वलंत उदाहरणच म्हणावे लागेल.

एव्हढ्यात कंटाळला काय? असे कसे चालेल? चला थोडे वेगळे बोलू या.

चला चला आपल्या भारत मातेची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणण्याचा प्रयत्न करू या .

पुराण तत्त्ववेत्या कडून मिळालेल्या माहिती नुसार आदि मानवाने ७०,००० वर्षा पूर्वी भारतात प्रवेश केला.

कळतोय का अर्थ?

म्हणजेच भारत भूमीला ७०,००० वर्षाचा इतिहास आहे .

साधारण पणे ९००० वर्षा पूर्वी भारतातील मानव ग्रामीण व शहरी वस्त्या करून राहू लागला होता. त्यानंतर सिंधू संस्कृती चा उदय झाला. काही कालखंडा नंतर सिंधू संस्कृती लयास गेली.

हळूहळू वैदिक संस्कृती जोर धरू लागली होती. पण भारत भूमीला आक्रमणाला सामोरे जावे लागत होते . त्यात इथली संस्कृतीही होरपळली जात होती.

अलेक्झांडरचे आक्रमण, मौर्य साम्राज्य, सम्राट अशोकाच्या राज्य विस्ताराची लालसा , त्यावेळी झालेला नरसंहार आणि त्या नंतर पश्चाताप दग्ध सम्राट अशोकाला ह्याच भूमी ने पाहिले .

अशोकाच्याच कालखंडात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार वेगाने झाला. अशी अनेक स्थित्यंतरे ह्या भारत भूने अनुभवली. अनेक कटू प्रसंग पचवीले.

हळूहळू बौद्ध धर्माचा पगडा कमी होत गेला. वैदिक धर्माची पुनर्बांधणी झाली. साहित्य , गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली. व्यापारी दृष्ट्या ही भारत तेंव्हा अतिशय पुढारलेला देश होता. स्थापत्य क्षेत्रातील प्रगतीही स्तुत्य होती. त्या काळातील कित्येक बांध कामाचे विश्लेषण आजही तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या देश विदेशातील स्थापत्य शास्त्रज्ञांना करता येत नाही.

हा काळ भारताच्या ऐतिहासिक काल खंडातील सुवर्ण काळ होता. म्हणूनच आपण अजूनही म्हणतो, " यहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती थी बसेरा, ये भारत देश है मेरा . "

सोन्याचा धूर निघणार्‍या ह्या देशाचा आता सगळीकडे बोलबाला होऊ लागला होता. म्हणूनच की काय इतर खंडातील अनेक देशांची वक्र दृष्टी आपल्या देशाकडे वळली. भारत भूमी संकटात सापडली.

इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी धडपडू लागले . आपापसात ही लढू लागले होते.

त्यापूर्वीही मुगल राजांनी भारत भूमीला आणि भारतवासीयांना व्यथित केले होते. परंतु छत्रपति शिवाजी महाराजांच्या कालखंडात मुस्लिम कारवायांना लगाम लागून मराठा साम्राज्याचा विस्तार झाला.

त्यानंतर पेशवाई आली ती आसेतू हिमालया पर्यंत राज्य करण्याचे स्वप्नं घेऊनच. परंतु बंड, भाऊबंदकी, फितुरी अशा अनेक घटनांना सामोरे जात पेशवाईचा अंत झाला.

ह्याचाच फायदा घेऊन आधीपासूनच व्यापाराचे कारण घेऊन भारतात शिरलेल्या इंग्रजांनी भारताला गुलामगिरीच्या खाईत लोटले. भारत माता व्यथित झाली. गुलामगिरीच्या शृंखलेत जखडल्या गेली . इंग्रजांचा लाल बावटा दिमाखाने फडकू लागला.

इतकी स्थित्यंतरे पाहणारा हा एकमेवच देश असावा.

तरीही मित्रांनो ही भूमी रक्तबंबाळ होत असतानाही ताठ उभी होती. कारण तिचा तिच्या सुपुत्रांवर आणि सुकन्यांवर ठाम विश्‍वास होता.

माझ्या प्रिय तरूण तरुणींनो अगदी अशाच विश्वासाची आजही गरज आहे . असो.

“बंदीत माय भू ही आम्ही खुले कशाला?”

असे म्हणत म्हणत तिचे वीर पुत्र एक एक करत स्वातंत्र्य यज्ञाच्या बलि वेदीवर हसत हसत चढत होते. लहान , मोठे, बाल ,वृद्ध ,स्त्रिया कोणीही मागे सरायला तयार नव्हते. कोणी घरात राहून कोणी समरांगणात जाऊन रक्ताची आहुती देत होते. राणी लक्ष्मी बाई , तात्या टोपे, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्य वीर सावरकर किती किती जणांची नावे सांगू?

विद्यार्थी मित्रानो , ह्या सर्वानीच आपल्या रक्ताची शिंपण करून भारत मातेला स्वतंत्र केले.

टिळक -गोखले- आगरकर- रानडे ह्यानी सतत समाज जागृतीचा यज्ञकुंड पेटता ठेऊन देश भक्तीच्या प्रखर भावना युवकांमध्ये जागत्या ठेवल्या.

ह्या अशा नमूद केलेल्या आणि अनेक अनाम वीरांच्या बलिदाना पुढे इंग्रज सत्तेला हार मानावी लागली. भारतातून इंग्रजांची उचल बांगडी झाली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. कृतकृत्य झालेला तिरंगा अभिमानाने फडकू लागला .

विद्यार्थी मित्रांनो , अशा नर रत्नांची खाण असलेली ही भारत माता महानच आहे.

अनेक वर्षांपासून किंवा शतकापासून आपल्या परंपरा , रिवाज सांभाळून ठेवून पुढच्या पिढीकडे हा वारसा सहजतेने दिल्या जातो. त्यांचा सांभाळ करा .

स्वातंत्र्य संग्रामातील आपल्याच बांधवांचे चरित्र आठवा. त्यांचे गुण आत्मसात करा.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या संस्कृतीचा ठेवा जतन करा . सत्यम शिवम सुंदरमचा आग्रह धरा . वाईटाची कास धरू नका .

भारत देशाचे विश्वगुरू होण्याचे स्वप्न पूर्णत्वा

स न्या आणि मोठ्या अभिमानाने गर्जना करा “मेरा भारत महान” . “भारत माता की जय”

जयहिंद

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६