बस्तरच्या घनदाट जंगलात उभा भारत!

बस्तरच्या घनदाट जंगलात उभा भारत!

घनदाट जंगलं, शांत निसर्ग…आणि प्रत्येक वळणावर देशासाठी सज्ज उभे असलेले जवान! बस्तरच्या रस्त्यांवर फिरताना जाणवलं CRPF आणि पोलिस दलाचं निडर, निःस्वार्थ कर्तव्य!
जुलै 2025 ह्या महिन्यात छत्तीसगढ मधील बस्तर भागात आमचा कामा निमित्त दौरा होता. तिथले दंतेवाड़ा, बीजापुर, सुकमा हे जिल्हे घनदाट जंगलांमधे वसलेले आहेत. छत्तीसगढमधील ही घनदाट जंगलं अप्रतिम निसर्गसौंदर्याने समृद्ध तर आहेतच, पण ती भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या सर्वात कठीण संघर्षाची साक्षीदार देखिल आहेत. ह्या जिल्ह्यांत गेली अनेक दशके नक्षलवादाचा आतंक माजलेला आहे. हा सशस्त्र उठाव सामाजिक अन्याय, विकासातील तफावत आणि राजकीय उपेक्षेच्या मुळांशी जोडलेला आहे. या गुंतागुंतीच्या संघर्षाच्या मध्यभागी उभे आहे केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)!

नक्षल चळवळीची सुरुवात सामाजिक बदलाच्या घोषणांपासून झाली असली, तरी कालांतराने तिने हिंसक आणि अमानवी स्वरूप धारण केले. आदिवासींच्या हक्कांचा आधार घेत नक्षलवादी संघटना स्थानिक भीती, जबरदस्ती, खंडणी आणि सशस्त्र दहशतीच्या जोरावर आपले वर्चस्व टिकवून ठेवतात आणि भारताला आतून पोखरून टाकण्याचा प्रयत्न करतात. शाळा जाळणे, रस्ते उध्वस्त करणे, गावकऱ्यांना धमकावणे आणि सुरक्षा दलांवर हल्ला करणे, हे त्यांचे नेहमीचे धोरण झाले आहे.
आम्ही ह्या रस्त्यांवरून प्रवास करताना जागोजागी, मशीनगन्स हातात घेऊन तीक्ष्ण नजरेने सगळ्या जागेची तपासणी करताना कोब्रा कमांडोज, CRPF चे जवान, पोलीस दलातले जवान दिसत होते. आम्हाला सांगितल्या गेलं होतं की जंगलात शक्यतोवर कुठेही थांबू नये.

आम्ही तिथे होतो त्याच्या काही दिवसांपूर्वीच
नक्षलविरोधी मोहिम राबवल्या गेली होती. आणि आम्ही परत आल्यावर तर बरीच मोठी मोहीम राबवल्या गेली ज्याची कल्पना आम्हाला त्या वेळी नव्हती. पण म्हणूनच खूप जागी सशस्त्र सुरक्षा दलं दिसत होती.
ह्या नक्षलविरोधी मोहिमा, CRPF, राज्य पोलीस दल, इतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर माहिती, इत्यादी सर्वांचं सहाय्य घेऊन राबवल्या जातात.
CRPF भारताच्या लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण करणारे अदृश्य कवच आहे. छत्तीसगढमध्ये तैनात असलेले CRPF चे जवान, विशेषतः CoBRA कमांडो, अत्यंत कठोर प्रशिक्षण घेतलेले असतात. जंगल युद्ध, दीर्घकालीन गस्त, कमी साधन सामग्रीत लढाई आणि सतत मृत्यूच्या छायेत काम करणे, हे त्यांचे रोजचे वास्तव आहे.

प्रत्येक पाऊल टाकताना जमिनीत लपवलेला IED, प्रत्येक वळणावर हल्ल्याची शक्यता, तरीही चेहऱ्यावर निडरता आणि ध्येय ही CRPF जवानांची ओळख बनली आहे.

CRPF च्या अनेक कारवायांमध्ये नक्षल नेत्यांचा खात्मा, शस्त्रसाठ्याची जप्ती आणि प्रशिक्षण तळं उद्ध्वस्त केल्या जातात. आम्ही परतल्यावर झालेली मोहीम बरीच मोठी होती आणि त्यात भरपूर मोठं यश आलं आहे.

फक्त सुरक्षा कारवायांनी नक्षलवाद संपणार नाही, ही वस्तुस्थिती शासनानेही स्वीकारली आहे. त्यामुळे रस्ते, दळणवळण, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
CRPF चे जवान अनेकदा डॉक्टर, शिक्षक आणि मदतनीसाची भूमिकाही बजावतात. आदिवासी गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे, विश्वास निर्माण करणारे उपक्रम आणि मदतकार्य हे नक्षलवादाच्या विचारसरणीला पर्याय देण्याचा प्रयत्न आहेत. आदिवासींच्या ह्या उत्थानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखिल मोलाचं सहकार्य आहे. ह्यांच्या वनवासी कल्याणाश्रम सारख्या संस्थांद्वारे आदिवासींचं शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरण केल्या जातं.

ह्या निसर्गसौंदर्याने समृद्ध भागात नक्षलवाद संपूर्णपणे संपावा ही मनोमन प्रार्थना आहे, कारण या संघर्षाची सर्वात वेदनादायक बाजू म्हणजे जवानांचे बलिदान. एक शहीद म्हणजे देशाचं खूप मोठं नुकसान असतं शिवाय तो कोणाचा तरी मुलगा, पती, वडील किंवा भाऊ असतो. त्याच्या मागे त्या परिवारात एक पोकळी कायमची राहून जाते, जी कोणत्याही सन्मानाने भरून निघत नाही. माझ्या मनात आपल्या सगळ्या सुरक्षा दलांबद्दल, आणि नक्षलवाद संपवण्यासाठी कार्यरत सगळ्या संस्थांबद्दल अतिशय अभिमान आणि कृतज्ञता आहे!

आम्ही बस्तर भाग सुरक्षितपणे क्रॉस केल्यावर एका ठिकाणी काही पोलिसदलातील जवान उभे होते त्यांना धन्यवाद म्हणायला थांबलो. ते आपल्या जिवावर उदार होऊन आपल्या देशाची सेवा करतात, CRPF जवानांना धन्यवाद म्हणायला सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही थांबू नाही शकलो कारण ते फार कोअर भागात होते. पण इथे थांबलो. त्यांनाही आम्हाला भेटून आनंद झाला.हा फोटो तेव्हाचाच, आठवण म्हणून घेतलेला आहे.

सई देशपांडे
24.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026