‘ज्ञानतत्वाची सजीव अनुभूती’

‘ज्ञानतत्वाची सजीव अनुभूती’

सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी |
विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा ||

लहानपणा पासून रोजच्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेत, शाळेत, कॉलेज मधे, संगीताच्या क्लास मधे किंवा अजूनही
कुठलीही परिक्षा असो किंवा कार्यक्रम असो, चित्रकला असो, लिखाण असो सरस्वती मातेचा हा श्लोक म्हणून तिचा आशिर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे हे गृहित धरूनच पुढचं कार्य करायचं हे ठरलेलं आहे.

जीवनातला प्रत्येक क्षण नवीन असतो तो आपण कसा जगणार आहोत हे आपल्याला माहीत नसतं तरीही विश्वासाने आपण तो हवा तसा जगतो कारण आधीचे आपले अनुभव, आधीचं ज्ञान आणि आपल्या मनातही एक जगण्याची प्रेरणा /जाणीव असते ती आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असते. सृष्टीत प्रत्येक कणात भरून असलेलं हे जे ज्ञानतत्व आहे, जे संपूर्ण ब्रम्हांडाला चलित असण्यासाठी प्रवृत्त करतं ते परम दैवी तत्व म्हणजेच माता सरस्वती!
म्हणूनच कुठल्याही कार्याचा भार तिच्यावर सोपवला तर ती योग्य मार्गदर्शन करतेच.

लग्नं झाल्यावर नागपूरला आले तर कळलं जवळच सरस्वती मंदिर आहे. तशी सरस्वतीची मंदिरं फार कमी असतात. पहिल्यांदा दर्शन घेतलं तेव्हां वाटलं ही माझी आईच आहे. रामनगर महिला समाजाचं हे मंदिर आहे. 50 वर्षापूर्वी ह्या मूर्ती ची स्थापना झाली. महिला समाजात बरीच कार्यक्रमं होत असत… मी भाग घ्यायला लागले आणि मग हे माझं माहेरच झालं. इथल्या सगळ्या सदस्यांनी माझ्या वर खूप प्रेम केलं/करतात.

शारदेच्या नवरात्रापूर्वी सर्व कार्यकारिणीची, सभासदांची लगबग सुरू होते. कार्यक्रम आखल्या जातात, प्रत्येकाला वेगवेगळ्या कामांच्या जवाबदाऱ्या दिल्या जातात. काही कामं माझ्याही सुपुर्द केल्या जातात त्यातलंच एक माझ्या अत्यंत आवडीचं काम म्हणजे देवीला ताजंतवानं करणं!
वर्ष भरात पूजेच्या वेळी अनेक भक्तगणांच्या श्रद्धा तिच्यावर वाहिल्या जातात आणि ती पण त्या स्वीकार करून आशिर्वाद देत राहते. त्या श्रद्धांचा हळदीकुंकवाच्या रुपात, फुलांच्या रूपात तिच्या वर वर्षाव होत राहतो… मग नवरात्र येण्या पूर्वी एक दिवस तिचा अन माझा संवाद असतो. तिला आधीच क्षमा मागून तिच्या शरीरावर कशाचे हट्टी डाग असतील तर ते थिनरने आणि मग ओल्या कपड्याने स्वच्छ करणे… तसं रोज पूजेच्या वेळी वीणा ताई मूर्ती पुसतातंच पण पेंटिंग पूर्वी ही जास्तीची स्वच्छता जरूरी असते… भुवया, डोळे, ओठ हे पेंट करताना असं वाटतं ती मला सांगतेय… “ह्या डोळ्यांनी मला सगळ्यांवर कृपा दृष्टी टाकायची आहे. त्यातून वाहणारं प्रेम माझ्या भक्तगणांच्या हृदयात पर्यंत पोहोचलं पाहिजे… ह्या ओठांवर आश्वासक हास्य हवं… माझ्या भक्तांच्या मनातलं दुःखं माझ्या स्मित हास्यानेच दूर दूर पळालं पाहिजे… ह्या ओठांनी मला भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत…” तिला हवं तसं ती पेंट करवून घेते… इतरही तिचं सौभाग्यलेणं (कुंकू, बांगड्या, नेलपेंट इत्यादी ) पेंट करून झालं की थोडा वेळ आम्ही दोघी तृप्त मनाने एक मेकींकडे बघत राहतो आणि ती आता नवरात्रा च्या भरगच्च कार्यक्रमांसाठी, दर्शनासाठी येणाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ताजीतवानी झाल्याची खात्री पटली की मी तिच्या समोर नतमस्तक होऊन बाहेर पडते.

आज वसंत पंचमीचा मंदिरात मोठा उत्सव असतो. आजही तिनी अनेकांना भरभरून आशिर्वाद दिले असतील. आपल्या सर्वांवर तिची कृपादृष्टी सदैव राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना!

सई देशपांडे
23.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026