‘निःशब्द आक्रोश’ (कथा - भाग दोन)

‘निःशब्द आक्रोश’ (कथा - भाग दोन)

“यार…सॉरी यार… मला खूप गिल्ट फीलिंग येतंय. माझ्या कडून तुम्हा सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या पण मी त्या लायकीचाच नाहीये…मला जगण्याचा काही हक्क नाही…” म्हणत सारंग ने खिश्यातून पेपर नाइफ काढला आणि तो स्वतः मनगटावर घाव करणार तितक्यात उदित ने त्याचा हात पकडून झटकला आणि त्याला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडून ठेवलं. पेपर नाइफ दूर जाउन पडला… सारंगच्या शरीरातून जसं काही त्राणच निघालं होतं. अतीव दुःखाने त्याने पूर्ण भार उदित वर टाकून डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि त्याचे हुंदके अजूनच वाढले …उदित त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला…
उदित, सारंगचा बालपणीचा मित्र…अभ्यासात फार प्रगती नव्हती पण परीक्षेच्या वेळी सारंग त्याला आपल्या सोबत अभ्यासाला बसवायचा आणि पास होण्यालायक तरी अभ्यास करवून घ्यायचा.कसाबसा बारावी उत्तीर्ण झाला होता.
आज सारंग चा NEET चा रिझल्ट लागला होता. त्याला एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता पण त्याच्या मार्कांवरून त्याला हा प्रवेश मिळेल असं वाटत नव्हतं कारण त्यासाठी 620 च्या वर मार्कं हवे होते…थोडक्यात हा प्रवेश हुकणार होता… खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची फी भरणं त्याच्या आईवडिलांना अशक्य होतं… त्याचं आणि त्याच्या वर विश्वास ठेवलेल्या सगळ्यांचच स्वप्न चूर चूर झालंय ह्याचं त्याला अतिशय वाइट वाटत होतं… प्राण ओतून त्याने मेहनत केली होती…
उदित ने त्याला स्वतःचं उदाहरण दिलं म्हणाला “सारंग, अरे यार माझ्या कडे बघ, मी तर मुश्किलीने बारावी पास झालो… माझे तर आई बाबा दोघेही रागवत राहतात तरी मी हा असा भयानक विचार कधी केला नाही… अभ्यासाचं तू मला शिकवायचा, मी चुपचाप तुझं ऐकायचो, आज आयुष्याबद्दल मी तुला शिकवतो लक्ष देऊन ऐक आणि समजून घे…”
उदितने सारंगचा हात घट्ट धरून ठेवला त्याला बेंच वर बसवलं… त्याच्या डोळ्यांत पाणी होतं, पण आवाजात ठामपणा होता, “सारंग, हे आयुष्य फक्त एका निकालापुरतं नाहीये. आज तू हरलास असं वाटतंय, पण संपलास असं अजिबात नाहीयस. ऐक माझं.”

सारंग खाली मान घालून बसला होता. पावसाचे थेंब आणि अश्रू ह्यात फरकच उरला नव्हता.

“तू डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलंस, कारण तुला लोकांना मदत करायची होती. ते स्वप्न एका वर्षाने, एका मार्गाने, किंवा दुसऱ्या पद्धतीने पूर्ण होऊ शकतं. स्वप्न अपयशी ठरत नाहीत रे, मार्ग बदलतात.” सारंग हळूच बोलला, “पण बाबा… आई… त्यांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलंय. आज त्यांचे चेहरे मला बघवत नाहीयेत…”

उदितने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, "ते तुझ्या मार्क्सवर प्रेम करत नाहीत… ते तुझ्यावर प्रेम करतात. आज ते दुःखी आहेत… पण तू नसतास तर? त्या दुःखाची तुलना तरी होईल का?”
हे ऐकून सारंगच्या अंगातून जणू वीज गेली. त्याने पहिल्यांदाच डोळे उघडून आकाशाकडे पाहिलं. पावसाची धार अजूनही तशीच होती, पण आत कुठेतरी त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती.

उदित म्हणाला, “एक वर्ष ड्रॉप घे. किंवा BSc, BDS, फार्मसी काहीही करता येईल. पुन्हा प्रयत्न कर आणि जर डॉक्टर नाहीच झालास तरी तू माणूस म्हणून मोठा होशील.मला खात्री आहे. ते जास्त महत्त्वाचं आहे.”

सारंग काही वेळ गप्प राहिला…
“मला आज खूप असहाय वाटतंय” तो म्हणाला.उदित हसला, "असहाय वाटणं म्हणजे हार नाही. समोरचा मार्ग बंद असला तर आपण एक क्षण असहाय होतो पण तिथेच थांबायचं नसतं रे… समोर अनेक अदृश्य मार्ग असतात ते शोधून आपली मंज़िल गाठायची असते… तुझ्या मनातला जो आक्रोश आहे त्याला असहायतेत बदलण्यात पेक्षा नवीन मार्ग शोधण्याच्या ध्यासात बदल… सारंग, आयुष्य खूप मोलाचं आहे… त्याला इतकं स्वस्त, छोटं करू नकोस… "

पाऊस थोडा कमी झाला होता. मैदानातले लाईट लागले होते. अंधारातही सारंगला एक आशेची किरण जाणवत होती…

त्या क्षणी सारंगला कळलं आजचा दिवस त्याला मोडून काढायला नाही, तर आतून घडवायला आला होता. जखम खोल होती, पण पूर्ण आयुष्यभर रक्त वाहणार नव्हतं…
पावसाबरोबरच, मनातला निःशब्द आक्रोश देखिल हळूहळू शांत व्हायला लागला आणि दोघांची पावलं घराकडे वळली!

सई देशपांडे
22.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026