‘निःशब्द आक्रोश’ (कथा - भाग एक)
सारंगने चपला पायात चढवल्या आणि निघाला. बाहेर धो धो पाऊस कोसळत होता पण त्याने छत्री सोबत घेतली नाही… आज सगळे मित्र जिथे भेटायचे तिथे न जाता मैदानाच्या कोपऱ्यातल्या, पण एका उघड्या, वर झाडांच्या फांद्या नसलेल्या बेंच वर जाऊन बसला. आकाशा कडे चेहरा केला… पावसाचं पाणी चेहऱ्यावर वरून खाली निथळायला लागलं… डोळे बंद होते… हळूहळू डोळ्याच्या कडांतून ऊष्ण अश्रू त्या पावसाच्या पाण्यात मिसळून ओघळायला लागले…
आई, बाबा आधीच दुःखी होते… सकाळ पासून त्याला काही सुचेनासं झालं होतं… आतल्या आत घुसमटत होता तो, पण आई बाबांसाठी शांत राहिला. ते दिवस भर त्याची समजूत काढत होते… बाबा पाठीवर थाप मारत
“अरे मेरा शेर है तू.. अजून काही वय गेलं नाही तुझं”
म्हणून स्वतः पूर्ण पणे खचले असले तरी त्याला मात्र आशेची किरण दाखवायचा प्रयत्न करत होते… आईनी आज शिवणकाम बंद ठेवून पूर्ण वेळ त्याच्याच साठी ठेवला होता… त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला पोटाशी घेताना स्वतःचे अश्रू आवरत त्याचं सांत्वन करत समजावत होती..
“इतक्या छोट्या गोष्टींनी खचायचं नसतं बेटा… जीवन म्हणजे असे सगळे चढ उतार येणारच… आपण पुन्हा मजबूतीने उठून उभं राहायचं असतं… जे होतं त्यात आपलं काही तरी भलं होणार असतं…” म्हणत त्याच्या मनाच्या उभारी साठी आवडीचं करून खाऊ घालत होती..
जुई पण सारखी दादा दादा करत मागे पुढे करत होती… त्याला हसवायचा प्रयत्न करत होती.. तिघांनाही तो असं दाखवत होता कि तो आता नॉर्मल झालाय पण मनातल्या मनात त्याला खूपच असहाय आणि फसवणूक झाल्याची भावना येत होती…
“हा खूप मोठा अन्याय आहे…मला हे मान्य नाही” त्याची अंतरात्मा जोरजोरात आक्रोश करत होती…
तरणाबांड मुलगा, ऊर्जावान, अतिशय उत्साही, मेहनती, मित्रांच्या आणि शिक्षकांच्या गळ्यातलं ताईत… पण… पण आज त्याला कुणीच जवळ नको वाटत होतं… त्याच्या लहानश्या आयुष्यातला हा पहिलाच धक्का त्याला आतून बदलवू पहात होता. एकांतात अश्रू थांबता थांबत नव्हते… मनातली सगळी घुसमट, सगळा आक्रोश डोळ्यांतून घळघळ वाहत होता… आई बाबांनी कष्ट करून, वेळी स्वतःच्या इच्छा बाजूला सारून त्याच्या कडे लक्ष दिलं होतं… त्याला कधीच काही कमी पडू दिलं नाही…आणि आज त्यांची सगळी स्वप्नं धुळीत मिळाली होती… त्यात त्याची पण काही चूक नव्हती त्याला कळत होतं म्हणूनच त्याला अजूनच असहाय वाटत होतं…
“सारंग”… त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात जाणवताच त्याने मागे वळून बघितलं…
“उदित?” तो उठून उभा झाला… उदीत ने लगेच समोर येऊन त्याला मिठी मारली आणि दोघांचे डोळे वाहू लागले… दोघांना काही न बोलता एकमेकांच्या भावना कळत होत्या… पाऊस कोसळतच होता… जणू काही तो ही त्यांचं सांत्वन करत होता…
सारंग च्या आयुष्यात कसलं धक्कादायक वळण आलं होतं?
उदित कोण होता?
दोघेही भावनिक का झाले होते?
पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग वाचायला विसरू नका.
सई देशपांडे
21.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
