संध्याछाया भिववीती ह्रदया : भाग १ #सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६

अकोल्याची ६ वर्षाची टपोऱ्या डोळ्यांची नयन जोशी आणि ७ वर्षाचा सुखदेव पांडे ह्यांची अगदी बालपणाची पक्की दोस्ती. काही खाताना , पिताना , अभ्यास करताना, मस्ती करताना ही जोडगोळी नेहमीच एकत्र. दोघांच्या आवडीनिवडी सुद्धा सारख्या . सगळ्या मोहल्ल्यात त्यांना नयनसुख म्हणूनच ओळखत होते.

दोघांचीही एक वाईट खोड होती . ज्याच्या त्याच्याशी पैज लावायची . कुणा तिसर्‍याशी पैज लावली की नयनसुख एका बाजूला असायचे. नयनचे नशीब एव्हडे भारी असायचे की प्रत्येक वेळी ती जिंकायचीच. आणि मग ते दोघे खूप खुश व्हायचे आणि तिसर्‍या व्यक्तीला सळो की पळो करायचे. आजूबाजूचे लोकही लहान मुले म्हणून मजा घ्यायचे. त्यामुळे नकळत पणे हे दोघे बेडर होत होती.

कोणीच नाही मिळाले की ही दोघे एकमेकात पैज लावत . आश्चर्य म्हणजे सुखदेव नेहमीच हरत असे. स्वभावाने मवाळ असल्यामुळे सुखदेव हसत हसत आपली हार मान्य करत असे.

दिवसामागून दिवस सरत होते . ना त्यांच्या मैत्रीत खंड पडला ना त्यांच्या पैज लावायच्या स्वभावात. फरक फक्त एकच झाला की त्यांना अजून एक मैत्रीण मिळाली दर्शना. ती नावाप्रमाणेच ह्या दोघांच्या कृत्याची शांत दर्शक होती . सुखदेवशी ती फार कमी बोलत असे. मात्र नयनची ती जिवाभावाची मैत्रीण होती.

आणि एक दिवस बातमी आली सुखदेवच्या बाबांची मुंबईला बदली झाली. दुसर्‍या दिवशी लगेच त्याचे कुटुंब मुंबईला निघून गेले. घाईगर्दीत नयनचा कसाबसा निरोप घेऊन सुखदेव मुंबईकर झाला.

नयनने दर्शनाशी पैज लावली तो नक्की वापस येणार.

नवे जग, नवे मित्र, करियरचे नव्याने कळलेले महत्व ह्या सगळ्या व्यापात सुखदेव भूतकाळ विसरत चालला होता. तो इंजिनियर झाला . अमेरिकेत गेला. मोठ्या पगाराची नोकरी . सगळेच मस्त चालले होते. आई बाबांनी त्याला आता भारतात येण्याची गळ घातली . त्याचे लग्नाचे ही वय झाले होते. २८ वर्षांचा झाला होता तो आता . पण त्याच्या मनाजोगी मुलगी त्याला मिळेना.

आपण नेमके काय शोधतोय हे त्याचे त्यालाच कळेना . एक दिवस आईने त्याच्या टेबल वर एक फोटो ठेवला . त्या फोटोतील मुलीचे टपोरे डोळे त्याला फार भावले . ह्या मुलीला भेटायला तो तयार झाला .

मुलगी नागपूरला एका सी.ए. कडे नोकरी करत होती . गोबर्‍या गालाची, गोर्‍या रंगाची, केसांची बॉयकट केलेली ती मुलगी त्याच्या मनात रुजली. खूप ओळखीचा चेहरा वाटत होता पण कुठे पाहिले ते आठवत नव्हते.

मुलगी लेडिज होस्टेलला राहत होती. मुला मुलींचे विचार एकमेकांना पटले तर मोठे लोक दाखवायचा प्रोग्राम करणार होते.

ठरलेल्या वेळेत एका निवांतशा हॉटेल मध्ये भेटायचे ठरले . नयनने त्याचा फोटो पाहूनच त्याला ओळखले होते आणि मनोमन होकार देऊन ही दिला होता . आता तिला पहायचे होते की हा आपल्याला ओळखतो का ?

प्रथम दर्शनीच सुखदेवच्या मनाने कौल दिला. येस हीच ती आपल्या मनातली . हिला कुठे तरी पाहिलय ? कुठे ? आठवेना ?

नयन त्याच्या कडे टक लावुन पहात होती. काय हँडसम दिसतोय हा ?

दोन मिनिटे स्तब्धतेत गेल्यावर , नयननी वेटरला सांगितले , दोन कॉफी, साखर कमी पण मलाई जास्त.

आपली आवड हिला कशी कळली ? तो म्हणाला , तुला काय माहित मी कॉफी घेतो की नाही घेत ते ?

लावतो पैज ? झाले … आदत से मजबूर ..

सुखदेव एकदम ओरडला , नयन तू ?

“येस मीच ती . तू येशील ह्याची मला पूर्ण खात्री होती . फक्त माझ्याशी लग्नाचा विचार करून तू येशील असे मला वाटले नव्हते.” … इति नयन

अग केव्हढी बदललीस तू . मला तर तीच लहान, दोन घट्ट वेण्या बांधलेली , सतत तोंडात च्युईंगम चघळत राहणारी आणि ज्याच्या त्याच्याशी पैज लावणारी नयन आठवतेय. तू इतकी स्मार्ट राहू शकतेस हा विचारच कधी मनात नाही आला .

उद्या आता दर्शना कडून पार्टी उकळणार मी … नयन पुटपुटली .

म्हणजे ती पण इथेच आहे नागपूरला ? लग्न नाही केले तिने ?

हा प्रश्न तिला सुखदेव कडून अपेक्षित नव्हता तरी नयनने उत्तर दिले ..

हो .

दर्शना बद्दल त्याने अजून काही विचारू नये म्हणून तिने घाईघाईने विषय बदलला . कारण तिला माहिती होते दर्शना तिच्यापेक्षा रूपाने उजवी, स्वभावाने शांत आहे. ह्याने तिच्यात गुंतू नये. तसेच तिला त्याला गमवायची तयारी नव्हती. म्हणून तिने आपला निर्णय सांगून टाकला…

मला तू पसंत आहेस . तुझे काय म्हणणे आहे ?

आता सुखदेव च्या मनात तिची फिरकी घेण्याचे आले. तो म्हणाला , "पाहतो , आई - बाबांचा विचार घ्यावा लागेल. त्यांना तर लांब केसांची , सणवार सांभाळणारी , साडी नेसणारी मुलगी सून म्हणून हवी आहे ".

ती खुदकन हसली . सुख, मी तुझे मत विचारले . आई - बाबांचे नाही.

सुखदेव थोडा ओशाळला.

ह्म्म हिच्या पुढे आपले काहीच चालणार नाही. आपली बाजू सावरत तो म्हणाला , "अग पण मी हो म्हणालो आणि त्यांनी नकार दिला तर ? "

“चल लाव पैज , तुझे आई-बाबा मला नाही म्हणणार नाही”.

सुखदेव तिचा आत्मविश्वास पाहून थक्क झाला .

आता नकाराचा काही प्रश्नच नव्हता. त्याचा होकार पदरात पाडून घेऊनच नयन शांत झाली.

तसेही सुखदेवला तिला नकार द्यायचाच नव्हता . त्याने तिथूनच आईला फोन लावला आणि आपला होकार कळविला .

नयन चल आता दर्शनाला फोन लाव. तिला आपण सरप्राईज देऊ. …सुखदेव म्हणाला .

नयनला ते फारसे रुचले नाही. पण ती सुखदेवच्या होकार ने इतकी सुखावली होती की आत्ता तो जे म्हणेल ते ऐकण्याची तिची तयारी होती .

तिने लगेच दर्शनाला फोन केला .

दर्शु , अग लवकर आपल्या नेहमीच्या हॉटेल मध्ये लगेच ये. तुझ्यासाठी एक मोठ्ठ सरप्राईज आहे. लवकर ये .

तिचा उत्तेजित स्वर ऐकून दर्शना म्हणाली, " अग, हो , हो येते . पण त्यासाठी तुला फोन तर ठेवावा लागेल ना ? "

ठेवते ग…पण तू लवकर ये . बाय… म्हणत नयन ने फोन ठेवला.

आता तिलाही दर्शनाला केंव्हा ही गोष्ट सांगते असे झाले होते. आणि तिला अचानक जाणवले अरे आपण आई बाबांना काहीच कळवले नाही . ते आपल्या फोनची वाट पहात असतील.

सुखदेवला ती म्हणाली , " एक मिनिट हं, मी आईला फोन लावते. …"

तिने फोन लावला आणि पुढच्याच क्षणी आईने फोन उचलला आणि म्हणाली ,

"काय ग नयु , किती वाट पहायला लावते ? भेटली का तू त्या मुलाला ? कसा वाटला तुला ?

तुझे केंव्हा लग्न ठरते असे झालेय मला .

उगीच काहीतरी बारीकसारीक खोड्या काढू नकोस त्या मुलात .

फोटो वरून तर खूपच स्मार्ट वाटत होता.

शिकला सवरलेला आहे , लठ्ठ पगाराची नोकरी आहे .

फॉरेन मध्ये राहूनही निर्व्यसनी आहे, असे त्या गोखले काकूंनी निर्वाळा दिला आहे. त्यांचा दूरचा नातेवाईकच आहे तो…"

आईने तिला बोलायची एकही संधी न देता प्रश्नांची सरबत्ती चालू केली.

शेवटी नयन म्हणाली , " आई , मला बोलू देते का ? की ठेऊ फोन?.."

आणि आईची सरबत्ती थांबली.

“अग फोन नको ठेऊ . हं सांग तू , काय झाले ते ?”

आईने संधी देताच नयन उत्साहाने बोलली, " आई माझे लग्न ठरले …"

दोन मिनिटे तिच्या आईला काहीच बोध झाला नाही. जेंव्हा तिच्या लक्षात आले की नयन काय म्हणतेय तेंव्हा जवळपास ती किंचाळली, " अग काय बोलतेस तू ? "

आई, आई, जरा शांत हो तू . ऐक अकोल्याला आपल्या शेजारी पांडे राहात होते आठवताय का तुला ?

हो . त्यांचा मुलगा आणि तू फार मस्ती करायचे . मला तेंव्हा फार राग यायचा तुमच्या दोघांचा . अग पण त्यांचे काय इथे ?

अग तोच सुखदेव पांडे आहे हा .

अगबाई हो का ? त्याच्या प्रोफाईल वर फक्त सुख पांडे लिहिले होते त्यामुळे लक्षात नाही आले माझ्या .

बर पण तुमचे सगळे बोलणे झाले का ? पुन्हा तुझी भुणभुण नकोय मला. जे काही विचारायचे असेल ते आत्ताच बोलून घे .

हो ग आई. मी होस्टेल वर पोहोचली की करते तुला फोन. आत्ता दर्शु आली की मग आम्ही दोघी बरोबरच निघू.

एक सुस्कारा सोडून आईने फोन ठेवला .

नयन ने फोन ठेवत दाराकडे पाहिले आणि तिच्या तोंडावर हास्य फुलले . दारातून दर्शना येत होती.

सुख , बघ कोण आलय ? तिने नजरेनीच दर्शना येत असलेली दाखवले.

सुखदेवनी वळून पाहिले . एक गौरांगना , दाट लांब केसांचा शेपटा वेळावत येत होती. तो स्थिर नजरेनी तिकडेच पहात होता.

नयन ते पाहून जरा गडबडली.

तोवर दर्शना तिथे पोहोचली. नयनने घाईघाईने सुखदेवची ओळख तिचा होणारा नवरा म्हणून करून दिली.

दर्शना हात पुढे करत म्हणाली , हॅलो सुखदेव .

तिचे ते वाक्य ऐकताच नयन आणि सुखदेव दोघेही अवाक् झाले. कारण नयनने अजून त्याचे नाव सांगितलेच नव्हते .

त्यांना तसेच सोडून तिने वेटर ला आवाज दिला.

नयन-सुख अजून तसेच स्तब्ध उभे होते. दोघांनाही दर्शनाचे हे रुप नवीन होते.

त्यांना तसेच उभे असलेले पाहून दर्शना हसून म्हणाली , “अरे असे भूत पाहिल्यासारखे काय उभे आहात ? मी सुखदेवचे नाव घेतले म्हणून इतके चमकला का ? मी जर ह्याला एकटा पाहिले असते ना , तर कधीच ओळखले नसते. ते काकूंनी मला फोन केला म्हणून मी ओळखले ह्याला.”

"आता तुमची शंका मिटली असेल तर या बसा "

तुमच्या आवडीचे चीज बर्गर आणि मलाईदार कॉफीची ऑर्डर दिली आहे. बरोबर चॉकलेट क्रीम बिस्किटे पण आहेत.

आता दोघेही खुशीत आली आणि बसली .

नयन म्हणाली , " दर्शु , तू ग्रेटच आहेस. मला वाटले तू ओळखलेस सुखला ."

छे ग, इतक्या वर्षानंतर भेटल्यावर कसे ओळखणार ? तू तरी ओळखले का माझ्या जीजूला पाहिल्या क्षणी ? … दर्शु ने विचारले.

हो , मी तर त्याला फोटो पाहूनच ओळखले होते. आता स्तंभित होण्याची दर्शनाची पाळी होती.

अग, काय सांगतेस ?

दर्शना , आठव मी तुझ्याशी पैज लावली होती , तो येईलच म्हणून . आठवतय का ?

हो आठवतय की. अग मी तर ते गमतीवारी नेले.

त्या दोघींचा वार्तालाप ऐकून सुखदेव थक्क होत होता. म्हणजे नयन आपल्याला कधीच विसरली नाही.

ओ गॉड , मी मात्र गाव सोडले आणि गावातल्या सगळ्या आठवणी , मित्रमैत्रिणींना सोयीस्कररीत्या विसरून गेलो . ही नयन तेंव्हापासून माझ्या प्रेमात होती की काय ?

छे, छे ,ते वय प्रेमात पडण्याचे नव्हतेच.

जर योगायोगाने आपण भेटलो नसतो तर नयनची प्रेमकहाणी " अधुरी एक कहाणी…" म्हणून राहिली असती . विचाराच्या गोंधळात त्याचा स्वतःशीच प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता .

जर नयनने त्याला हलवून वर्तमानात आणले नसते तर तो अजून किती तरी वेळ असाच विचारांच्या चक्रात गुरफटत राहिला असता.

भानावर येत तो नयनला भारावलेल्या स्वरात म्हणाला , " नयन , सॉरी यार , मी कसा तुला विसरलो ? तू मात्र मला मनात जपून ठेवले."

त्याचा असा भावनिक झालेला स्वर ऐकून नयन नी दर्शना दोघीही आश्चर्यचकित झाल्या .

नयनला तर तोच मस्ती करणारा , आडदांड सुख आठवत होता.

त्यामुळे गडबडून ती त्याला म्हणाली , " ओए, सेंटि व्हायची काही गरज नाही . माझा माझ्यावर पूर्ण विश्वास होता."

आता मुद्द्यावर ये. पुढे काय कसे ठरवायचे ? तुझा भविष्यातील काय प्लॅन आहे ?

इथेच भारतात राहणार की पुन्हा फॉरेनला जायचे ? तिथेच नेहमी साठी राहणार का ?

सावरलेला सुखदेव म्हणाला , " नयन तुला कुठे रहायला आवडेल भारतात की यू. एस. ला ?"

बघ, तुझ्या बरोबर मी कुठेही रहायला तयार आहे. मी फक्त ह्यासाठी विचारते आहे की त्याप्रमाणे मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी कळवावे लागेल.

मला ना माणसांची एलेर्जी ना जागेची . तुझ्या आईबाबां बरोबर मी सहज जमवून घेईन . तेही त्यांच्या भावना न दुखावता .

फक्त एकच माझ्या आई बाबांची मी एकुलती एक मुलगी आहे. आज नाही तरी पुढे मागे त्यांची जबाबदारी माझ्यावरच असणारं आहे. तेंव्हा मात्र तुला आणि तुझ्या घरच्यांना ऑब्जेक्शन असायला नको.

वेडी आहेस का तू ? अग तुला होकार देऊन मी फक्त तुला स्विकारत नाहीये. उलट तुझ्यासकट तुझे कुटुंब ही माझे होणार आहे. तुला शब्द देतो मी त्यांच्या उतार वयात मी त्यांना कधीही अंतरी देणार नाही.

चला आता तुम्हा दोघींना तुमच्या होस्टेलला सोडतो . बराच उशीर झालाय. बाकीच्या गोष्टी आता मोठ्यांना ठरवू दे. त्यांनाही आपले लग्न एन्जॉय करायची संधी द्यायला हवी.

दर्शना म्हणाली , "नको रे बाबा , मी कबाब मे हड्डी नाही होत . मी माझ्या गाडीने आलीय , माझ्याच गाडीने जाणार. "

जीजु तू हिला मस्त फिरवून आण . गप्पाटप्पा मारा. हव तर डिनर ही बाहेरच होऊ द्या. मी होस्टेलच्या मेसला कळवेन तसे. बाय… म्हणत आणि हात हालवत दर्शना झोकात निघून ही गेली.

दर्शना निघून गेली .

सुखदेव नयनला म्हणाला , " हं, बोला मॅडम, काय प्लॅन करायचा ? "

चल लाँग ड्राइव वर जाऊ मग एखाद्या मस्त हॉटेल मध्ये डिनरला जाऊ. चालेल तुला सुख ?

अग हो. न चालायला काय झाले ?

फक्त मला रात्री ९.३० च्या आधी होस्टेलवर सोड. नियम आहे तसा तिथला .

जो हुक्म मेरे आँका .

त्याच्या ह्या नाटकावर खळाळून हसत नयन उठली आणि त्याच्या हातात हात अडकवून चालू लागली.

त्याच्या नव्या कोऱ्या आलिशान कारचा दरवाजा उघडून आणि तिच्यासमोर झुकून त्याने तिला बसायची खूण केली . हसतमुखाने ती आत जाऊन बसली. तिच्या बाजूचा दरवाजा बंद करत तो ड्रायव्हरच्या सीट वर जाऊन बसला आणि त्याने गाडी चालू केली .

काही तासात नयनच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली होती. त्यामुळे ती काहीशी गोंधळलेली , खूपशी खुष होती. मनाजोगता नवरा, ऐश्वर्य , गाडी , मुंबई सारख्या ठिकाणी स्वतंत्र बंगला . अजून काय हवय ?

तिला अस आपल्यातच गुंग झालेल पाहून सुखदेवला काय बोलावे ते सुचेना. त्याने हळूच तिला साद घातली , नैना.

हे नविनच नाव ऐकून नयन त्याच्यावर जाम खुश झाली.

ती म्हणाली, " सुख , आपण दोघे असताना तू मला ह्याच नावाने हाक मारत जा."

अग आता सांग तरी कुठे वळवू गाडी .

चल सेमिनरी हिल्स नाहीतर फुटाळा. नाही तर चल नुसतेच वर्धा रोडने फिरायला.

ती सांगत होती त्याप्रमाणे तो ड्राईव्ह करत होता . थंडीचे दिवस होते . बाहेर अंधारून आले होते . सुखदेवने हळूच साऊंड सिस्टीम सुरू केली.

तेरे मेरे सपने अब एक रंग है

तू जहां भी ले जाये हम संग है …

स्मितहास्य करत ती म्हणाली, “सुख, मला गाणी ऐकायला आवडतात . पण ह्या घटकेला आपण गप्पाच मारू .”

सुखदेवने पटकन सिस्टम बंद केली. खर म्हणजे त्याला ही तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या.

सुख, तू इथून गेला त्यानंतर खरच काही दिवस मला काही सुचत नव्हते, करमत नव्हते . दर्शना नसती तर तुला स्मृती आड करणे शक्यच नव्हते.

किती तरी दिवस मी कोणाशीच पैज ही नाही लावली. पण माझा मूळ स्वभाव रडण्याचा नव्हताच . त्यामुळे मी मला वेगवेगळया स्पर्धांमध्ये गुंतवत गेली. खरे म्हणजे ह्या सगळ्यामुळे मी स्वतःला घडवत गेली.

हळूहळू शिक्षणाचे महत्व समजत गेले. पुढे जाण्याच्या अट्टाहासापायी पैज स्वतःशीच लावण्याची सवय लागली मला . आणि काही करून पैज जिंकायची. म्हणून खूप मेहनत पण करायची सवय लागली. माझ्या यशाने आई बाबा खुप आनंदी झाले होते.

बी. कॉम., एम. कॉम, कॉम्प्युटर कोर्सेस सगळ्यात अव्वल स्थानावर राहत गेले.

मग नोकरीचा ध्यास लागला . बाबांना फारसे पटले नाही . पण त्यांच्याच मित्राच्या मुलाने ऑफर दिली म्हणून ते तयार झाले .

त्याने नागपूरला मोठ्ठे ऑफिस चालू केले आणि माझीही बदली मग नागपूरला झाली .

लहान गावातून आलेली म्हणून मी पहिल्यांदा जरा गावंढळच होती. आपल्याला प्रेझेंटेबल रहायला हवे हे माझ्या ऑफिस मधल्या मैत्रिणींनी शिकवले.

मी परक्या मुलांसोबत बोलताना बुजत होती. पण माझ्या ह्याच मैत्रिणींनी माझा आत्मविश्वास जागवला.

एक दिवस मला ब्युटीपार्लर घेऊन गेल्या आणि माझा असा मेकओव्हर करून घेऊन आल्या.

माझ्या ह्या रूपावर मीच खुष झाले.

खूप पगार नाहीये माझा. पण मी माझ्यापुरता भागवून दर महिन्यात बर्‍यापैकी बाकी टाकू शकते.

गेल्या तीन वर्षांपासून मी नोकरी करतेय. बाबा आता रिटायर झाले आहे. आईही कष्ट करून थकली. मला मोठे करताना , माझे हट्ट पुरवताना त्यांनी मला कधीही कुठल्याच गोष्टीची झळ लागु दिली नाही.

आता त्यांना माझ्या लग्नाचा ध्यास लागलाय. माझ्यापुढे जेंव्हा त्यांनी हा प्रस्ताव मांडला , तेंव्हा मनाच्या खोल कप्प्यात दडून बसलेला तू, पुन्हा उसळी मारून वर आला. मी तिथून गुपचूप उठली आणि आपल्या खोलीत जाऊन दर्शनाला फोन लावला .

"दर्शु, तुला सुखदेव आठवतोय का ग ? "

ती गोंधळली .

“अग, कोण सुखदेव?”

मग मी तिला आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगितल्या. शांतपणे सगळे ऐकून घेतल्यावर ती म्हणाली , " हं, पण आत्ता मधेच का आठवला तो तुला ?"

मग मी तिला मी आई बाबांचा लग्नाचा प्रस्ताव ही सांगितला.

त्यानंतर ती मला जवळपास रागावलीच.

" नयू , तुला काय म्हणायचेय? आता तुला सुखदेव बरोबर लग्न करायचेय? अग तो इथून गेल्यापासून त्याचा काहीही ठावठिकाणा नाही . त्याने कधी साधी चौकशीही केली नाही. "

“कुठे शोधणार आहेस तू त्याला ? चुपचाप एखादे चांगले स्थळ शोध आणि सुखाने संसार कर. उगाच काका काकूंच्या डोक्याला ताप देऊ नकोस .”

त्यानंतर मी शांत झाले. तिच्या म्हणण्याचा मी विचार केला . ती जे म्हणत होती ते प्रॅक्टिकली बरोबरच होते. पण मन अजूनही कुठेतरी तुझ्या भोवती फिरतच होते . आई बाबांना सांगितले मला थोडा वेळ हवाय.

"तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न चालू करा . पण मी अगदी लगेचच लग्न करणार नाहीये "

"सुख, त्यानंतर मी माझ्या नशिबाशीच पैज लावली आणि सुख , मी पुन्हा एकदा जिंकले. "

सुखदेव मंत्रमुग्ध होऊन तिचे बोलणे ऐकत होता. ती बोलायची थांबल्यावर, तो भानावर आला आणि म्हणाला , " नैना , तुस्सी ग्रेट हो . आय रिअली लव यू. "

चल , तुला आता मस्त हॉटेलात पार्टी देतो .

"सुख , तू तुझ्याबद्दल काहीच नाही सांगणार ? "

मजेत शीळ वाजवत तो म्हणाला , " मॅडम , घड्याळ पहा. भूक पण लागलीय . उद्याची सकाळ फक्त तुझी आणि माझी . उद्या सुट्टी टाक . सकाळी ७.३० वाजता येतो तुला घ्यायला. तेंव्हा बोलुया

. १२-१२.३० पर्यंत मी निघेन मुंबईला जायला . माझेही आई बाबा वाट पहात असतील ."

त्याच्या बोलण्यावर सम्मती दर्शवत ती खुदकन हसली.

… क्रमशः

:white_check_mark::writing_hand::white_check_mark::writing_hand::white_check_mark::writing_hand::white_check_mark::writing_hand::white_check_mark::writing_hand::white_check_mark::writing_hand:

©️®️सौ. मंजूषा श्रीकांत अपराजित

सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६