याला “जीवन” ऐसे नाव!

याला “जीवन” ऐसे नाव!!
:writing_hand:हेमंत नाईक
१९. ०१. २०२६

मुलाच्या घराजवळ असलेल्या ऑकलंड येथील डोळ्याचे पारण फेडणाऱ्या तमाकी नदीकाठी क्षितिजावर एकटा मावळणारा सूर्य पाहतो आहे…आणि मी पण आज एकटाच बाकावर बसलो आहे थोड्या अंतरावर एक चायनीज बॅगपायपर या वाद्याने सुंदर धून वाजवत असताना माझे मन मात्र मागे भूतकाळात रेंगाळते आहे.
सर्व काही अगदी कालच घडल्यासारखं वाटतय सार!!
ते रम्य बालपण..
मामाच्या गावी झुकझुक गाडीतून जातांना येणारी मज्जा..
शाळेचा तो पाहिला दिवस..
शाळेतील निरोप समारंभ..
कॉलेजातील सच्ची मैत्री..
व्यवसाय नोकरीत यशस्वी
होण्याची धडपड..
आणि
मग आमच्या दोघांचा गृहस्थाश्रमात एकत्र प्रवेश..
वडील म्हणून मुलाना बिनधास्त उडण शिकवण..
त्यांची सातासमुद्रापार उंच भरारी पाहून मनातल्या मनात खुश होणारा मी ,आता आजोबा या गोड नव्या नात्यात केव्हा पोहोचलो, हेच कळले नाही.

  आयुष्यात  आता हे झालं की संपलं..असं प्रत्येक वेळी वाटत खरं..पण पुढे गुंतण सुरूच असत. अगदी शेवटापर्यत!

 निवृत्तीनंतर ऑफिसमध्ये गेलो तर तुमची जागा कुणी दुसऱ्याने घेतली असते धंदयातही नकळत तुम्ही रिप्लेस होत असतात.  'Change is the life!" हे जाणूनहीअगदी सहस्त्रचंद्र दर्शन झालं तरी जीवनाचा मोह सहजासहजी सुटत नाही.

  बहुतेक सर्वजण जीवनाला गृहीत धरत असतात इथं पुढच्या क्षणाची गॅरंटी नसते  आणि अमरपट्टा घेऊन  आल्यासारखे सर्व वागत असतो. भांडण करायला तर क्षुल्लक कारणही पुरते. 

 ऑफिसमध्ये गरज असते म्हणून विचित्र स्वभावाच्या खडूस बॉसशी जुळवून, "हा..हा..हि..ही..हू..हू.." करत खिदळणारे, घरी मात्र सख्ख्या नात्याशी, जन्मदात्यांशी जुळवून घेऊ शकत नाही. हे जीवनाच कटूसत्य अनेक वेळा दिसते. कदाचित जीवन किती छोटे आहे... याची जाणीव नसते त्यावेळी. ज्यावर त्यांना अभिमान वाटतो ते तारुण्य  कधी न कधी ओसरणार याची जाणीव असली पाहिजे. उगवणारा सूर्य मध्यान्हाला काही काळच असतो मग मावळतीचा प्रवास नक्की सुरु होतो.

 अगदी उच्च पदावर विराजमान असले तरी त्या पदाची त्याची साथ सदाकरिता  नसते.. अगदी जीवनाचे तसच असत!! जीवन आणि मरण यात अगदी एका श्वासाच अंतर असताना माणूस बऱ्याच वेळा स्वार्थाने अंध होऊन वागत असतो.

 कुणाला आपल्या संपत्तीचा तर कुणाला बुद्धीचा, आपल्या प्रसिद्धीचा, लोकप्रियतेचा, किंवा रूपाचाही गर्व असतो आणि त्यामुळे नकळत अहंकार बाळगून असतो पण शेवटी हे सर्व इथेच राहून जाते याची जाणीव फक्त्त शेवटास होते. जमिनीवर येतांना खाली मूठ बंद करून आलेला, आयुष्यभर कमवण्यासाठी धावधाव धावतो आणि जाताना ती मूठ देखील खुली ठेवून जावं लागणार आहे हे मर्त्य जीवनाच सत्य आहे. गेलेल्याच्या परिवाराच्या शोकास आवर घालण्यासाठी, आणि जीवनाची नश्वरता सांगण्यासाठी "राम नाम सत्य हैं..बाकी सब गत्य हैं l " हा मंत्रही अंतिम यात्रेत म्हणतात. 

  अंत्ययात्रेत स्मशानात गेल्यावर सर्व इथंच सोडून जायचे आहे या भावनेने सर्वांनाच क्षणिक स्मशान वैराग्यही येते पण तेथून परत घरी आल्यावर लागलीच या जीवनाच्या मोहाच्या मायाजालात माणूस परत गुंततो... तो त्याच्या स्वतःच्या अखेरपर्यंत!!

 आपल्या मर्त्य जीवनावर प्रकाश पाडणारी आणि अहंकार नको हे  जीवनाचे सत्य सांगणाऱ्या या ओळी लिहिल्यात. 

“तेजस्वी उगवता सूर्य..
निस्तेज होऊन मावळणार!!”

तारुण्यावर नका करू गर्व
अंत नक्कीच त्याचा जाण
तेजस्वी उगवता तो सूर्य
निस्तेज होऊन मावळणार.. १

येथे एक तू प्रवासी
चार दिवसाचा पाहुणा..
जाण यांची ठेव नित्य
जीवन क्षणिक जगताना..२

ना जमीन..ना संपत्ती
ना साथीला जोडीदार
रिकामाच आला तू रे
अगदी तसाच तू जाणार.. ३

जाणुनी हे सर्व काही
अजाण का तू बनतोस
मर्त्य खरे हे जीवन
अमर का तू समजतोस?.. ४

मिळते ते नक्की जाते
त्रिवार हे सत्य आहे..
प्रिय ते ही दुरावेल
मन घट्ट करुनी जाण..५

मिटणाऱ्या जीवनाचा
का तुला उगा गर्व..
राजा जरी इथे कोणी
अश्रू तो ही ढाळणार..६

गुंतले इथे सर्वंसारे
चिंतेच्या दाट गुंत्यात..
जीवनी शेवटपर्यंत
गुंत्यातच राहणार..७

समजण्याची ही संधी
नाही ती परत येणार..
गैरसमजात झोपलेले
नक्की धोका खाणार..८

मृत्यू कधी ना येईल
हा विचार आहे खोटा..
कुणाचीहीं नाही मात्र
मृत्यू पासुनी सुटका..९

श्वास शेवटचा जाता
नाते प्रिय सर्वं तुटणार..
आप्त मित्र मुलं पत्नी
सारे दूर दूर जाणार..१०

पुत्र मित्र आप्त फक्त्त
स्मशानी साथ येणार..
एकट्याचा प्रवास मात्र
इथूनच नक्की सुरु होणार..११

चितेवर तुला झोपवून
उरी जड लाकडे रचणार..
पुन्हा न दिसण्यासाठी
आप्त तुला झाकणार..१२

नाव तुझे ते मागे गेले
विसरले तुझे आप्तमित्र ..
किती सुंदर नाव तुझे ते
तुला डेड बॉडी म्हणणार..१३

अग्निडाग देऊनी त्वरेने
चिता उंच उंच भडकणार..
स्मृति सर्वं साऱ्या तुझ्या
बेचिराख होऊन जाणार..१४

ओमशांतीचा शांतिमंत्र
ओठी सर्वं पुटपुटणार..
लगबगिनेच सर्वं परत
दिनकार्या ते लागणार.१५.

मुठ बांधून जगती आला
खुल्या हाताने तू जाणार..
भौतिक संचित तू रे केले
दुसऱ्यांसाठी ते राहणार ..१६

जे पुण्यकर्म केले तू रे
तेच साथीला येणार ..
जन्मी या जरी ना मिळाले
फळ नक्की ते मिळणार .१७.

सुख दुःख आहे ते एक
सांगे गीतेत श्री भगवंत..
जशी करणी तशी भरणी
तसा तुला मिळेल लोक..१८

वाग जीवनी निर्मळतेने
दुखावू नको तू कुणास..
मोक्षप्राप्त नक्की तुलारे
स्वर्गलोकी तू स्थिरावणार..१९

तारुण्यावर नका करू गर्व
अंत नक्कीच त्याचा जाण
तेजस्वी उगवता तो सूर्य
निस्तेज होऊन मावळणार.. २०

   टीप : मूळ कल्पना अजीज नाझा  यांची गायलेली जीवनसत्य सांगणारी अर्थपूर्ण कव्वाली "चढता सुरज धीर धीरे ढलताही जायेगा " यावर आधारीत आहे..

:writing_hand: हेमंत नाईक
१५ जानेवारी २०२६
सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६