शेकोटी - ऊबदार आठवणींचं जिवंत रूप!
“आई आज आमचं नाइट आउट आहे. सगळे मित्रं आपल्याच घरी वर टेरेस गार्डन मधे बॉन फायर (शेकोटी) एन्जॉय करणार आहोत”…मुलानी सांगितलं.. त्याच्या साठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची पण जय्यत तयारी केली होती मुलांनी… म्हणजे जेन झी मुलांना देखिल शेकोटी ची आवड आहे, बघून मन प्रसन्न झालं!
कुडकुडत्या संध्याकाळी/रात्री अंगावर काटा आणणाऱ्या गारव्यात जेव्हा शेकोटी पेटते, तेव्हा ती फक्त लाकडांची जळणारी रास राहत नाही… ती माणसांच्या मनातली गोठलेली भावनाही हळूच वितळवू लागते. शेकोटी म्हणजे ऊब… पण फक्त शरीराला नाही, तर नात्यांना, आठवणींना आणि संवादांना मिळणारी ऊब!
शेकोटी पेटली की माणसं आपोआप शेकोटी जवळ येतात. कोणाच्याही हाकेशिवाय, कोणत्याही निमंत्रणाशिवाय. हिवाळ्यात आजकाल बऱ्याच हॉटेल्स मधे, रिसॉर्ट्स मधे देखिल ह्याची व्यवस्था असते. हात पुढे करून तळवे तिच्या ज्वालांकडे धरले की, तळव्यांतून ऊब हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. त्या क्षणी काळ थांबतो, कामांची घाई विसरली जाते, आणि वर्तमान क्षण सुंदर वाटू लागतो.
शेकोटीकडे पाहताना तिच्या जर्द केशरी, पिवळ्या अश्या ज्वालांमधे, मधूनच आवाज करत उडणाऱ्या ठिणग्यांमधे नजर अडकते आणि मन नकळत भूतकाळात रमून जातं, आपण आत्ममग्न होतो … लहानपणी शेतावरच्या हिवाळी रात्री, आईबाबांनी आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी… भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा, हिरव्या चन्याचा, हुर्ड्याचा सुगंध… कोळशांवर भाजलेली भाकर, आणि त्या भोवती बसलेली आपली माणसं… कधी पिकनिक च्या वेळी मित्र, मैत्रिणीं सोबत शेकोटी भोवती बसून खेळलेल्या गाण्यांच्या भेंड्या, आग्रहाखातर गायलेली गाणी, गप्पा, हसणं खिदळणं…लग्न झाल्यानंतर एकमेकांची हळूहळू ओळख होत असतानाच्या अनुभवलेल्या बॉनफायर्स … अश्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणी जाग्या होतात.
शेकोटीचा प्रकाश फार झगमगीत नसतो, पण त्या मंद प्रकाशातही चेहऱ्यांवरचे भाव अधिक स्पष्ट दिसतात. संवाद अजून अर्थपूर्ण होतात. न सांगितलेल्या भावना, मनातिल लाजाळू हळवे स्वीकार, शेकोटीच्या साक्षीने हळूच व्यक्त होतात.
जसं शेकोटीत लाकूड जळतं, तसं आयुष्यातील
काही दु:ख, राग, थकवा त्या ज्वालांमध्ये नाहीसे होतात. राख उरते… पण तीही नकारात्मक नसते. राख म्हणजे अनुभवांची, शिकवणीची खूण. शेकोटी शिकवून जाते जळून संपणं नव्हे, तर जळून उजळणं महत्त्वाचं!
आजच्या वेगवान, डिजिटल जगात शेकोटी क्वचितच पेटते. पण जेव्हा ती पेटते, तेव्हा माणूस पुन्हा माणूस होतो. मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा जिवंत ज्वाला आपल्याला जास्त आपल्या वाटतात. कारण शेकोटीत ऊब असते, शांतता असते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणा असतो.
म्हणूनच शेकोटी ही फक्त थंडीवरचा उपाय नाही… ती माणुसकी जपणारी, नात्यांना जोडणारी, आणि मनाला विसावा देणारी एक सुंदर अनुभूती आहे!
सई देशपांडे
19.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
