गोदावन्संचं लग्न झालं तेव्हा जेमतेम दहा वर्षे वय असावं.अजून न्हाणंही सुरु झालं नव्हतं.तारूण्यसुलभ भावना अजून जन्माला यायच्या होत्या गोदाच्या.तरी हसत्या खेळायच्या वयात पंचविशीतील नवरोबाची नवरी म्हणून मिरवल्या होत्या. मी लग्न करून आले मालवणच्या घरात तेव्हा गोदा सहासात वर्षाची असेल.आणि मी विशीतील. त्यामुळे गोदा माझी मुलगी, मैत्रीण जास्त आणि वन्स कमी होती.तरी आमच्या आईंचा खाक्या होत्या गोदाला मी वन्स म्हणूनच संबोधायचं.गोदा आणि मी दुपारी पडवीत बसून खूप गप्पा मारायचो.मी तिचा अभ्यास घेई.गोष्टी सांगे. आम्ही झोपाळ्यावर झुलत असू.मी मुंबईत राहिलेले.कोकणात छोट्याशा गावात कोंडल्यासारखं वाटे तेव्हा गोदा मला फिरायला घेऊन जाई.ती नेहमी म्हणायची वहिनी मला मुंबईतला नवरा पाहिजे.आणि खरंच चार वर्षांत अण्णांनी गोदासाठी मुंबईतील उत्तम स्थळ आणलं.घरातील सगळ्यांनाच पसंत होता मुलगा पण माझं म्हणणं होतं की अजून पाच वर्ष तरी गोदाचं लग्न पुढे ढकलण्यात यावं.तिला शिकायचं होतं.पण माझं आणि गोदावन्संचं कोणीच ऐकलं नाही.शेवटी गोदावन्स मुंबईत जायचं या आनंदात लग्नात सजून धजून नऊवार लुगडं, नथ,दागदागिने लेवून बोहल्यावर चढली.मला बिलगून खूप रडली. गोदाच्या लग्नानंतर मला घर खायला उठत होतं.सतत परकर पोलक्यातील गोदा दारामागून डोकावतेय असे भास होत.देवाला माझी अवस्था कळली आणि एक दिवशी मी गरोदर आहे हे मला कळलं.मला दिवस गेल्याच्या बातमीने संपूर्ण घर आनंदलं. गोदाला पत्र टाकलं.ती सासरी रूळत होती पण माहेरी यायला आसुसली होतीच.तीचं पत्र आलं .जावई तिला आठ दिवस आणून सोडणार होते.मग काय गोदावन्स आल्या.आम्ही दोघी कडकडून भेटलो. गोदावन्स आत्या होणार म्हटल्यावर भारी खुश होती.गोदावन्स तशी नवर्याबरोबर खुश होती.तिने माझं ऐकून शिक्षण सुरू ठेवलं होतं. नऊ महिने भरले आणि अचानक रात्री मला प्रसृती वेदना सुरु झाल्या. सुईणीला निरोप गेला, सासूबाईंची लगबग सुरु झाली.तेवढ्यात शहराकडून दोघेजण निरोप घेऊन आलेली बातमी ओझरती कानावर पडली. बाळाच्या रडण्याने मी भानावर आले.माझ्या पदरात बाळ होतं. मला मुलगा झाला होता.सुईण सांगत होती पण आजूबाजूला माझा नवरा, सासू सासरे मंडळी काहीच दिसेना.नोकर बायका दोघी होत्या. गोदावन्सच्या यजमानांचा गंभीर अपघात झाला होता असं मला सांगण्यात आलं.सगळी मंडळी तातडीने मुंबईला रवाना झाली होती.दोन दिवसांनी सासू सासरे परतले.सोबत गोदावन्स होत्या.कपाळावरील कुंकू पुसलेले.मला बघताच हंबरडा फोडला गोदाने.तिला माझ्याजवळ न येऊ देता सासूबाई अडगळीतील खोलीत घेऊन गेल्या.मी समजून चुकले.जावई गेले होते. मागे राहिली होती एकटी एवढीशी गोदा त्यांची ऐन तारुण्यात येऊ पाहणारी बायको. मी गोदाला केव्हा भेटायला मिळेल याची वाट बघत असताना सासऱ्यांनी फर्मान काढलं.सवाष्ण बाईवर गोदाची एका विधवेची सावली पडता कामा नये.माझी पायाखालील जमीन हादरली.मी गयावया केली तिला भेटण्यासाठी.पण घरचा शिरस्ता मोडाल तर याद राखा म्हणून मला रागवण्यात आलं. गोदाचं केशवपन करणार कळल्यावर मी नवरा, सासू यांना खूप विनंती केली.पण रूढीविरूध्द जायला त्यांचं मन कचरत होतं.अखेर व्हायचं तेच झालं गोदाचा एकदिवशी जोरात रडण्याचा आवाज आला.माझ्या मांडीवर बाळ रडत होतं, मी रडत होते.गोदाला गोड पदार्थ वर्ज्य करण्यात आले,खोलीबाहेर प्रवेश नाही. रंगीत कपडे, हसणं, बोलणं सगळं सगळं थांबलं होतं गोदाचं.मी मूकपणे हे बघणे मला दिवसेंदिवस त्रासदायक होत होतं. माझं बाळ सहा महिन्याचं झाल्यावर हळूच घरातील मंडळींची नजर चुकवून मी बाळाला घेऊन गोदाकडे गेले.खूप रडली बिलगून मला.मी बाळाला तिच्याकडे दिलं.तिला खायला मेव्याच्या लाडूचा डबा दिला.आणि लवकरच आपण तोडगा काढू.तुला असं राहू देणार नाही म्हणून मी शब्द दिला.मी आणि यजमानांनी गोदाचं घरच्या घरी शिक्षण पुढे सुरु करण्यासाठी सासरेबुवांकडे परवानगी मागितली.दोन महिन्यांनी अखेरीस होकार मिळताच मी माझ्या भाचाला तिच्या शिकवणीकरता घरी पाचारण केले.गोदाचा हळूहळू का होईना पुनर्जन्म होत होता.ती हसू लागली, घरभर फिरू लागली.गोदावन्स बघता बघता ग्रॅज्युएट झाली.सासूसासरे अंथरुणावर होते.कधीचेच वयोमानानुसार निवळले होते. गोदावन्स साठी नवे आभाळ पंख पसरून होते आणि गोदावन्स भरारी घेण्यासाठी….
©️®️श्रध्दा(इरावती)सुदामे
७जानेवारी२०२६