ठाणे स्टेशनही आलं होतं.पावसाची रिपरिप सुरुच होती.निकीता स्टेशनबाहेर आली.रिक्षाऽऽ तिने आवाज दिला.रिक्षात बसल्यावर थोडं विसावली. दहा मिनिटांत घर आलं.थकलेलं ,घामेजलेलं अपराधी मन पाण्यातून वाट काढत होतं. नाही म्हटलं तरी आज निकीताने ती ऑफीसात गेलीच नाही ही गोष्ट नवरा आणि मुलीला सांगितलं नव्हतं.त्यामुळे काहीसं दडपण हे आलंच होतं. पण एक मात्र होतं की आजची तिची स्वतःबरोबरची डेट लाजवाब होती. कुणी तिला कधी अडवलं नव्हतं खरंतर मजा करण्यापासून. पण वर्षानुवर्षाचं रूटीन तिची आवड विसरायला भाग पाडत होतं.आज ती कसर भरून निघाली. इतक्या वर्षांनंतर एक ब्रेक घेतला होता निकीताने .रात्री स्वयंपाक काय करायचा याचं उत्तर शोधत पोचली निकीता घरी. छत्री कोपऱ्यात स्टॅन्डवर अडकवत निकीताने डोअरबेल वाजवली अन् चक्क लेक नवरा दारात स्वागताला बघून निकीता पुतळ्यासारखी थिजलेल्या अवस्थेत. मुलगी म्हणतेय “आई अगं मी आणि बाबाने आज तुला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं.” निकीताने शेखरकडे न बघताच वाॅशरूम गाठलं.वाॅशबेसीनचा नळ धो धो वाहत होता.निकीता समोरील आरशात बघत होती.तिच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते.तिला आता या क्षणी ती खूप स्वार्थी वाटत होती.किती प्रेम करतायेत आपला नवरा मुलगी आपल्यावर! माझ्यासाठी मला एकटीला काही तास हवे आहेत हे ती दोघं समजू शकली असती का? आणि ..खरं म्हणजे ती आज काही तास एकटी जगली होती स्वतःसाठी… पण ऑफीसात न जाता आणि घरी न सांगता .मुद्दाम नसलं तरी ती चुकली होती.तीचं मन तिला खात होतं. निकीता अगं किती वेळ आंघोळ? ठीक आहे ना तब्येत? शेखरच्या आवाजाने तिची तंद्री भंग झाली आणि ती स्वयंपाकघराकडे जायला निघाली. मुलीने तिला डायनिंग टेबलकडे नेलं. नवरा गरम गरम पावभाजी वाढत होता.आज तो ऑफिसातून लवकर घरी आला होता.येताना भाज्या घेऊन आला होता.मुलीने पाव मस्त बटरमध्ये भाजले होते आणि नवर्याने ओट्यापाशी उभं राहून पावभाजी केली होती.निकीताला आयतं जेवण मिळालं होतं ज्यात मुलगी नवरा यांचं प्रेम ओसंडून वाहत होतं.असं असलं तरी निकीताचा घास अडकला, ठसका लागला..त्यात आतल्या आत गिळलेला आवंढा मिसळला होता. शेखरने निकीतासाठी प्लेन पिवळ्या रंगाची साडी आणली होती.चांदनीतील श्रीदेवीसारखी आणि बॅकग्राऊंडला गाणं लावलं होतं “ लगी आज सावन की फिर वो झडी है”..
©️®️श्रध्दा(इरावती) सुदामे
१३जानेवारी२०२६