लोकलमधील गाणं ऐकता ऐकता निकीता भूतकाळात कधी शिरली तिलाच कळलं नाही. ती दोघंसुध्दा अशीच पावसात भिजली होती वीस वर्षांपूर्वी नखशिखांत चिंब प्रेमात. निकीताचा शेखरशी प्रेमविवाह झाला होता आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला होता.ठाण्यात आलिशान बेडरूम फ्लॅट.दोन वर्ष प्रेम करण्यात भुर्रकन उडून गेले आणि घरात चिमुकलं बाळ आलं.निकीता शिकलेली एम.बी.ए.झालेली पण तिला बायको आणि आता आई हे रोल करायला मनापासून आवडत होतं.पैशाची कमतरता नव्हती.त्यामुळेच निकीता आपल्या बाळाबरोबर छान वेळ घालवत होती, त्याचे भरपूर लाड करत होती,शेखरला मस्त पदार्थ करून खाऊ घालत होती.वीकेंडला मूव्ही, शाॅपिंग, हाॅटेलिंग असं भारी सुरू होतं. बघता बघता बाळ मोठ्ठं झालं, त्याची नर्सरी स्कूल मग प्रायमरी स्कूल, टिफीन, होमवर्क असं निकीताचं काम वाढलं.आता सकाळी लेक आणि नवरा लवकर घराबाहेर पडू लागले.आणि सारा दिवस निकीता एकटी घरात कोंडून घेऊन काय करणार? नवरा म्हणाला हरकत नाही नोकरी करणार असशील तर मन रमेल शिवाय शिक्षणही वाया जाणार नाही.निकीतालाही हे पटलं होतं आणि लगेचच इंटरव्ह्यू देऊन तिने फार्मा कंपनीत नोकरी मिळवली देखील.पण तिला चर्चगेटला जावे लागणार होते.अर्थात शेखर स्टेशनला कारने सोडणार म्हटल्यावर पुढे लोकल ट्रेन सोपं होतं. उत्साहात निकीताने नवीन भूमिका स्वीकारली होती.एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात दिसू लागला.संध्याकाळी ऑफीसमधून परत आलं की तिघांचा रात्रीचा स्वयंपाक करताना नवरा बर्यापैकी मदत करे.लेक पण हुशार होती त्यामुळे अभ्यास स्वतःहून करत होती.आणि एक दिवस शेखरचं प्रमोशन झालं.घरातील त्याच्या मदतीची अपेक्षा करणं चुकीचंच होतं.लेकीचा अभ्यास वाढला आणि याचा निकीतावर नकळत भार वाढला.सुरूवातीला घड्याळामागे धावणं इतकं सवयीचं झालं होतं पण चाळीशी ओलांडल्यावर मन आणि शरीर साथ देईनात.ऑफीसचं टेन्शन असायचंच की तिलादेखील.हार्मोनल संतुलन ढासळलंय कळत होतं.निकीताला वाटत होतं की सोडावी नोकरी आणि छान आराम करावा.पण लगेचच विचार यायचा तिच्यासाठी आता कुणालाच वेळ नव्हता.घराच्या भिंती खायला उठतील.ती काही टिपिकल किटी पार्टी टाइपच्या बायकांच्या ग्रुपमध्ये रमणारी नव्हती. मन म्हणत होतं ब्रेक घे गं जरा.वेळ दे स्वतःला. आजूबाजूला दिसणार्या बायका जिम, योगा करतात. स्पा, पार्लर रेग्युलर करतात.जगून तर बघ तूही एकदा ..पण नुसतं होममेकर म्हणून जगायचं नोकरी सोडायची हे निकीताला पटेना त्यामुळे कसरत करत निकीताची नोकरी चालूच होती.उदया शनिवार रविवार सुट्टी .लोकलमधून बसल्या बसल्या निकीताने कामांची लिस्ट नोट पॅडमध्ये लिहिली.शेखरच्या शर्ट्सना बटन्स शिवणे, लोणी कढवणे,लेकीच्या ट्यूशन्स क्लासला मिटींग,कामवाल्या काकूंकडून कपाटं आवरून घेणे…एकदम निकीताची विचारांची मालिका थांबली “ लगी आज सावन की फिर वो झडी है” गाणं कधीचंच संपलं होतं.
©️®️श्रध्दा(इरावती) सुदामे
१२जानेवारी२०२६
क्रमशः