लगी आज सावन की फिर वो झडी है
ऑफिसमध्ये आज पोहोचायला उशीरच होणार होता . एवढी घाई करूनही निकीताची सातची फास्ट लोकल चुकली होती बिचारी…रडवेली झाली होती.सुचेनासं झालं तिला काहीतरी विचार केला तिने आणि “रिक्षाऽऽऽ……लिंकींग रोडला चलणार का?..”आज सकाळपासून दिवसभर एकटीनेच ती फिरत होती.चक्क ऑफीसला दांडी मारली होती. गाॅगल, पर्स, आवडता परफ्युम… मोकळेपणाचा आनंद मनमुराद लुटत होती. तिच्या इअरफोनवर आशा गात होती…कतरा कतरा मिलती है..कतरा कतरा जीने दो…जिंदगी है..जीने दो.. आज तिला कुणाचीच परवा नव्हती.मनसोक्त विंडो शाॅपिंग, बार्गेनिंग बिनधास्त एन्जॉय करत होती. हुश्श म्हणून ब्रेक घेत मँगोमस्तानीवर खुशाल चील करत होती.आज ती बर्याच वर्षाने स्वतःला भेटत होती.मराठी नाटक,जुईचा गजरा ..डेटवर ती एकटीच गेली होती.पेंटींग्जच्या गॅलरीतून काही फोटोज कॅमेर्यात क्लिक करून घेत होती.चक्क ओठांचा चंबू करून पोज मध्ये सेल्फी झकास काढत होती.भारी क्षण ती श्वासात भरून घेत होती.कबुतरांचा थवा आकाशात उडाला..ती पण उंच झोका घेत संध्याकाळी चौपाटीवर थोडा खट्टा थोडा मीठा म्हणत पाणीपुरीचं स्वर्ग सुख मनसोक्त अनुभवत होती.रेतीतील लाटांत एकटीच भिजत होती.बट सावरताना हाताने “ अनामिका”असं नाव वाळूत हळूचकन गिरवत होती. वाळूच्या कागदावर जणू वारा झाला होता तिची लेखणी अन् सहजपणे उमटली की तिच्या बोटांनी चारोळी देखणी “मै मेरी फेवरेट हूं..”स्वतःला म्हणत होती. सुंदर नजारा होता.. दूरवर एक नावाडी होडी वल्हवत होता. तिच्या इअरफोनवर गाणं ऐकू येत होतं…“वहा कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहा….” समुद्रात सूर्य अस्त होत होता …आणि तिचा स्वतःच्या आयुष्यातील सुखाचा उदय . आता घरी पोहोचायला आठ वाजणार होते.नुकताच पाऊस सुरु झाला होता. हा मुंबईचा जीवघेणा पाऊस पीछा सोडायचा नाही.कशीबशी येणाऱ्या लोकलमध्ये शिरली निकीता.तिच्या सुदैवाने पुढच्या स्टेशनात जागा मिळाली बसायला. इतकी थकली होती ,साडी पावसात चालून भिजली होती.डोकं फक्त छत्रीमुळे भिजलं नव्हतं.अंग चोरून बसली बर्थवर. समोरच्याच मुलीच्या मोबाईलवर गाणं लागलं होतं “लगी आज सावनकी फिर वो झडी है”
©️®️श्रध्दा(इरावती)सुदामे
११जानेवारी२०२६
क्रमशः