घरटं - चोचीत धरलेलं स्वप्न!

घरटं - चोचीत धरलेलं स्वप्न!

लहानश्या मुंग्यांपासून ते आकाशात स्वच्छंद उडणाऱ्या पक्ष्यांपर्यंत, जंगलातल्या रानटी जनावरांपासून ते पाण्यातल्या सूक्ष्म जीवांपर्यंत प्रत्येक सजीवाला आपली एक हक्काची, सुरक्षित आणि आपली अशी जागा हवी असते. त्या जागेला आपण घरटं, बिळ, गुहा, वारूळ, आसरा अशी अनेक नावं देतो. नाव वेगळी असली तरी भाव एकच असतो… जिथे भीती नसेल, जिथे जीव निर्धास्त होईल, जिथे थोडा वेळ तरी आपण “सुरक्षित” आहोत असं वाटेल.

या चित्रात दिसणारा पक्षी (स्केली ब्रेस्टेड मुनिया) घरट्यासाठी चोचीत धागा घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे. तो पतंगीचा केबलला अडकलेला धागा आहे. ते घरटं उभारताना तो आतोनात प्रयत्न करतोय पण त्याच्या मनात कोणतीही स्पर्धा नाही, कोणताही दिखावा नाही. त्याला ते घरटं मोठं करायचं नसतं, भव्य बनवायचं नसतं… त्याला फक्त एवढंच ठाऊक असतं की ही जागा माझ्या पिल्लांसाठी सुरक्षित हवी. कधी माणसाने फेकलेला एखादा धागा, कधी वाऱ्याने आणलेली काडी… जे मिळेल त्यातून तो आपलं घरटं विणतो. त्या घरट्यात ऐश्वर्य नसतं, पण जिव्हाळ्याची ऊब असते.
निसर्गातला प्रत्येक प्राणी गरज असेल तितकीच जागा तयार करतो. मुंग्यांचं वारूळ असो, सशाचं बिळ असो किंवा सिंहाची गुहा सगळीकडे मर्यादेचं भान दिसतं. कारण निसर्गाला “पुरेसं” काय असतं, हे ठाऊक असतं. त्याला साठवणुकीची हाव नाही, उद्याच्या भीतीने आजंच सगळं गोळा करण्याची घाई नाही.
माणूस मात्र इथेच वेगळा ठरतो. त्याचं घर आता केवळ निवारा राहिलेला नाही… ते
प्रतिष्ठेचं मोजमाप बनलं आहे. गरजेपेक्षा मोठी घरं, वापरात नसलेल्या खोल्या, वर्षानुवर्षं रिकाम्या पडलेल्या इमारती… या सगळ्यांत माणसाच्या असमाधानी मनाचं प्रतिबिंब दिसतं. भिंती वाढवल्या की मनातली पोकळी भरून येईल असं त्याला वाटतं… पण तसं होत नाही. उलट घरं मोठी होत जातात आणि मनं अधिक एकाकी होतात.
खरं घरटं हे सिमेंट, वीटा किंवा सजावटीच्या वस्तूंनी उभं राहत नाही. ते माणसाच्या भावनांनी उभं राहतं. जिथे थकलेलं मन विसावू शकतं, जिथे अपयशाचं ओझं विसरता येतं, जिथे आपली स्वप्नं साकारता येऊ शकतात… तीच खरी हक्काची जागा. प्राणी हे सहज समजून घेतात…म्हणूनच त्यांची घरटी लहान असतात, पण त्यात समाधान मोठं असतं.
आज माणसाला पुन्हा निसर्गाकडे पाहण्याची गरज आहे…मर्यादेत समाधान मानायला शिकण्याची गरज आहे. कारण शेवटी, घरटं किती मोठं आहे यापेक्षा त्या घरट्यात किती शांतता, किती सुरक्षितता आणि किती प्रेम आहे, हेच खऱ्या अर्थानं मोलाचं असतं.

सई देशपांडे
17.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026